Pregnancy : गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. या गर्भनिरोधक गोळ्या नुकसानकारक असतात का? यांचे फायदे काय? गोष्टींवर नेहमीच चर्चा केली जाते. तसेच या गोळ्यांसंबंधी अनेक गैरसमजही महिलांच्या मनात असतात. अनेक महिलांना असाही प्रश्न पडतो की, जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर गर्भधारणा करण्यात समस्या होते का? यात किती तथ्य आहे किंवा असं काही होतं का याबाबत स्त्री रोग विशेषज्ञ डॉ चंचल शर्मा यांनी अलिकडेच एका वेबसाइटला माहिती दिली.
डॉ चंचल शर्मा यांच्यानुसार, आजकाल बऱ्याच महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात, पण अनेकांना याच्या नुकसानाबाबत माहिती असतेच असं नाही. त्यामुळे गोळ्या घेण्याआधी त्याबाबत माहिती घेतली पाहिजे.
डॉ चंचल शर्मा सांगतात की, जर आपण बऱ्याच काळापासून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करत असाल तर आपल्याला गर्भधारणेत समस्या होऊ शकते. पण गर्भधारणेत होणारा हा अडथळा केवळ काही दिवसांसाठीच असतो. गोळ्या घेणं बंद केल्यावर ओव्ह्यूलेशन पुन्हा आपल्या सामान्य सायकलमध्ये येतं. काही महिलांना वय वाढल्यामुळे गर्भधारणेत समस्या होते. म्हणजे काय तर गर्भनिरोधक गोळ्या केवळ अस्थायी म्हणजे काही काळासाठी आपले हार्मोन्स नियंत्रित करतात. जेणेकरून गर्भधारणा होऊ नये. आपण गोळ्या घेणं बंद केल्यावर हार्मोन्स पुन्हा सामान्य होतात आणि आपण गर्भवती होऊ शकता.
डॉ. शर्मा सांगतात की, जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं गर्भवती राहण्यास अडचण होते हा एक मोठा गैरसमज आहे. या गोळ्या अशा पद्धतीनं बनवल्या जातात की, त्या केवळ काही काळासाठी गर्भधारणा रोखू शकतात. याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही जो हे स्पष्ट करेल की, गोळ्या बंद केल्यावरही भविष्यात गर्भधारणेत अडचण येईल. गोळ्या बंद केल्यावर महिलांची मासिक पाळी सामान्य होते आणि त्या गर्भवती होऊ शकतात.