lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

Cervical Cancer : अनेकजणी सामान्य आजार अंगावर काढत, लक्षणं लपवतात आणि जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:44 PM2022-01-17T15:44:26+5:302022-01-17T15:53:48+5:30

Cervical Cancer : अनेकजणी सामान्य आजार अंगावर काढत, लक्षणं लपवतात आणि जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढतो.

Cervical cancer : Don’t ignore these symptoms of cervical cancer and Basic Information About Cervical Cancer | Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

आधुनिक जगातील सर्वाधिक भयावह आजारांपैकी एक म्हणजे कर्करोग. महिलांना होणाऱ्या कर्करोगांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती घेऊन त्यानुसार जागरूक राहून आणि नियमितपणे आरोग्य तपासणी करवून घेत असल्यास शरीरात कर्करोग उत्पन्न होत असल्याचे लवकर लक्षात येते आणि त्यावर यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात. सर्वीकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा, स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. ( Symptoms of cervical cancer)

कर्करोग झालेल्या एकूण महिलांपैकी सर्वीकल कॅन्सर झालेल्या महिलांचे प्रमाण जवळपास २३% आहे. डॉ. योगेश कुलकर्णी  (कन्सल्टन्ट, गायनॅकॉलॉजिक ऑन्कॉलॉजी आणि रोबोटिक सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  (How to prevent cervical cancer)

योनीतुन गर्भाशयात उघडणारा अरुंद भाग म्हणजे गर्भाशयाचे मुख तिथे या कर्करोगाची सुरुवात होते. योनिमार्गातून असामान्य रक्तस्राव, शरीरसंबंधांच्या वेळी खूप वेदना होणे किंवा योनीतून स्त्राव होणे ही याची लक्षणे आहेत. भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुमारे 120,000 नवीन प्रकरणे आढळतात. देशात कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी १०% मृत्यू हे या प्रकारच्या कर्करोगामुळे होतात, भारतात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे हे तिसरे सर्वात मोठे कारण आहे.

पण या गंभीर आजाराच्या संदर्भात एक आशेचा किरण आहे. सर्वीकल कॅन्सर आहे हे जर लवकरात लवकर लक्षात आले तर त्यावर यशस्वीपणे उपचार करणे शक्य आहे. जागरूकता उपक्रम, पॅप स्मियर टेस्ट्स सारखे तपासणी उपक्रम आणि एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण यामुळे या कर्करोगाच्या केसेसचे वाढते प्रमाण रोखता येऊ शकेल. पॅप स्मियर टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅपनिकोलाऊ टेस्ट आणि एचपीव्ही टेस्टमार्फत नियमित तपासणी करवून घेत राहिल्यास पेशींमध्ये घडून येणारे कर्करोग-पूर्व बदल लवकर म्हणजे त्यातून सर्वीकल कॅन्सर उत्पन्न होण्याच्या आधी लक्षात येऊ शकतात. 

महिलांनी वयाच्या एकविसाव्या वर्षापासून त्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीमध्ये पॅप स्मियर टेस्ट नियमितपणे करवून घेतली पाहिजे. पॅप टेस्ट्सच्या बरोबरीनेच एचपीव्हीपासून बचावासाठी लसीकरण हा सर्वीकल कॅन्सरला आळा घालण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. एचपीव्ही लसीकरण १० ते २६ वर्षे वयोगटामध्ये केले जाते आणि ही लस वयाच्या ४६ व्या वर्षापर्यंत देता येते.

सध्या या आजारावर तीन उपचार पर्याय उपलब्ध आहेत - शस्त्रक्रिया, रेडियोथेरपी, केमोथेरपी. यापैकी कोणते उपचार निवडायचे हे रुग्ण महिलेचे वय, आजार वाढण्याचा वेग, ट्युमरचा प्रकार आणि आकार, आजाराचा टप्पा किंवा ट्युमर मायक्रोस्कोपखाली कसा दिसत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन ठरवले जाते. ज्या महिलांच्या केसमध्ये सर्वीकल कॅन्सर खूप आधीच्या टप्प्यावर आहे त्यांच्यासाठी वेर्थिमची रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी हा शस्त्रक्रियेचा प्रमाण पर्याय उपलब्ध आहे. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते, यामध्ये गर्भाशय आणि त्याच्या आजूबाजूच्या टिश्यूज काढल्या जातात. 

या शस्त्रक्रियेमध्ये 'एंडोरिस्ट' उपकरणांसह रोबोटिक यंत्रणा वापरली गेल्यास कर्करोगाने प्रभावित झालेल्या पुरेशा टिश्यूज काढल्या आहेत हे सुनिश्चित करण्यात मदत मिळते. रोबोटिक असिस्टेड अर्थात रोबोटच्या साहाय्याने करण्यात येणारी शस्त्रक्रिया पारंपरिक/लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेइतकीच सुरक्षित आणि प्रभावी आहे, यामध्ये रक्तस्त्राव कमी होतो, रुग्णामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि रुग्ण लवकरात लवकर बरी होऊ शकते. 

सर्वीकल कॅन्सर झालेल्या काही रुग्ण महिलांना त्यांची मूल होऊ शकण्याची क्षमता कायम राहील की नाही याची चिंता असते.  खास करून जर त्यांना अद्याप मुले झालेली नसतील आणि मुले होण्याचे वय असेल तर ही चिंता अधिक गंभीर असते.  लवकरात लवकर लक्षात आलेल्या सर्वीकल कॅन्सरच्या काही निवडक केसेसमध्ये फर्टिलिटी प्रिझर्वेशन अर्थात प्रजननक्षमता टिकवून ठेवण्याची शस्त्रक्रिया (रॅडिकल ट्रेकेलेक्टोमी) हा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो पण यासाठीचे सर्व पात्रता निकष त्या रुग्ण महिलेच्या बाबतीत पूर्ण झाले असणे गरजेचे असते.  या प्रक्रियेमध्ये कर्करोगाने प्रभावित झालेले सर्विक्स अर्थात गर्भाशयाच्या मुखाकडील भाग (ग्रीवा) आणि लिम्फ नोड्स हे एवढेच काढून टाकले जाते.  

गर्भाशयाचा वरचा इतर भाग तसाच ठेवला जातो आणि नंतर तो टाक्यांच्या साहाय्याने योनीशी जोडला जातो.  फार मोठी जखम होऊ न देता (शस्त्रक्रियेसाठी), फार रक्तस्त्राव होऊ न देता रोबोटिक असिस्टेड सर्जरीमार्फत ही प्रक्रिया सुरक्षितपणे करता येते. अशा रुग्णांच्या तब्येतीवर एक वर्षभर बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि त्या काळात जर सर्वकाही ठीक असेल तर त्या महिलेला गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात.  सारांश असा की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झालेल्या प्रत्येक महिलेच्या बाबतीत लक्षणे दिसून येतीलच असे नाही त्यामुळे आजार लवकरात लवकर लक्षात यावा आणि त्यावर यशस्वीपणे उपचार करता यावेत यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहणे आवश्यक आहे.      

Web Title: Cervical cancer : Don’t ignore these symptoms of cervical cancer and Basic Information About Cervical Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.