'प्रेग्नन्सी' हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात अनेक बदल घेऊन येणारा खास क्षण असतो. याच अनेक बदलांमधील काही बदल आपल्याला आवडतात तर काही अगदीच नकोसे वाटतात, असाच एक बदल म्हणजे वाढलेलं वजन...विशेषतः डिलिव्हरीनंतर महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटावरील वाढलेली चरबी कमी करणे हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर लगेचच बेली फॅट कसे कमी करावे, याचा विचार अनेक महिला करू लागतात. अनेकदा सिझेरियननंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी महिला घाईघाईने कडक डाएट किंवा हेव्ही एक्सरसाइज सुरू करण्याचा विचार करतात. परंतु, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, यातून आपले शरीर आतून पूर्णपणे सावरण्यासाठी पुरेसा वेळ घेते. अशा वेळी चुकीच्या पद्धतीचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते(reduce belly fat after cesarean delivery).
प्रेग्नंन्सी नंतरच्या या काळात अनेक महिलांना पोट सुटल्यासारखे वाटणे किंवा पोटाचा घेर वाढल्याची चिंता सतावत असते. मात्र, घाईघाईने डाएटिंग किंवा कठीण व्यायाम सुरू केल्यास शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो. योग्य काळजी, संतुलित आहार आणि काही सोपे घरगुती उपाय यांच्या मदतीने हळूहळू (Safe ways to reduce belly fat after a C section) आणि सुरक्षित पद्धतीनेही पोटाचा घेर कमी करता येतो. अशा परिस्थितीत, शरीराला कोणताही ताण न देता, सुरक्षितपणे पोटाचा घेर कमी कसा करायचा? हे समजून घेण्यासाठी 'पारस हेल्थ'च्या कन्सल्टंट गायनकोलॉजिस्ट डॉ. प्रीति शुक्ला यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय सांगितलं ते पाहूयात...
सिझेरियन डिलिव्हरीनंतर पोटाची वाढलेली ढेरी कमी करण्यासाठी उपाय...
१. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या :- सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया (Major Surgery) असते, त्यामुळे यातून सावरण्यासाठी लागणारा वेळ 'नॉर्मल डिलिव्हरी'च्या तुलनेत थोडा जास्त असतो. सामान्यतः शस्त्रक्रियेनंतर पहिले ६ ते ८ आठवडे कोणताही जड व्यायाम न करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक महिलेच्या शरीराची रिकव्हरी होण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही व्यायाम किंवा डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला टाके घातलेल्या जागी वेदना, सूज किंवा कोणताही त्रास जाणवत असेल, तर त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
२. वॉकिंग करुन करा सुरुवात :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर काही आठवड्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही हलके वॉक सुरू करू शकता. सुरुवातीला दररोज १५ ते २० मिनिटे संथ गतीने चालावे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, मानसिक प्रसन्नता मिळते आणि हळूहळू कॅलरीज जळण्यास मदत होते. जसा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि शरीर साथ देईल, तसा तुम्ही चालण्याचा वेळ आणि वेग वाढवू शकता. पोटावर किंवा टाक्यांवर कोणताही अतिरिक्त ताण न पडता वजन कमी करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...
नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट...
३. प्रसूतीनंतरचे हलके एक्सरसाइज करा :- सी-सेक्शननंतर लगेचच पोटाचे हेव्ही एक्सरसाईज जसे की सिट-अप्स किंवा क्रंचेस सुरू करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी आपण प्रसूतीनंतरच्या हलक्या एक्सरसाइजने दिवसाची सुरुवात करू शकता. दीर्घ श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमुळे पोटाचे स्नायू हळूहळू अॅक्टिव्ह होऊ लागतात. हे एक्सरसाइज केल्याने ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची अंतर्गत शक्ती सुधारण्यास मदत होते.
भात खाणं सोडू नका, फक्त तांदूळ बदला! वजन घटवण्यासाठी 'व्हाईट' की 'ब्राऊन', कोणता तांदूळ आहे बेस्ट?
४. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या :- सी-सेक्शननंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा 'क्रॅश डाएट' (कठोर आहार) करणे पूर्णपणे चुकीचे आहे, विशेषतः जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल. तुमच्या शरीराला शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी आणि दूध निर्मितीसाठी पुरेशा पोषणाची गरज असते. आपल्या नेहमीच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा.
१. प्रोटीन :- स्नायूंच्या मजबुतीसाठी डाळी, पनीर खा.
२. फायबर :- पचन सुधारण्यासाठी आणि भूक नियंत्रित ठेवण्यासाठी फळे व पालेभाज्यां भरपूर प्रमाणांत खा.
३. हेल्दी फॅट्स :- सुका मेवा आणि ओमेगा-३ युक्त पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात करा.
४. हे खाणं टाळा :- जास्त तेलकट, तुपकट, मसालेदार आणि बाहेरचे जंक फूड खाणे टाळा.
५. पुरेसे पाणी :- शरीरातील आर्द्रता टिकवण्यासाठी आणि विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
५. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या :- नव्याने आई झालेल्या महिलेसाठी झोप पूर्ण करणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आराम नक्की करा. शरीरात झोपेची कमतरता असल्यास संप्रेरकांचे असंतुलन (Hormonal Imbalance) होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. तणाव (Stress) हे देखील वजन वाढण्याचे किंवा पोटावर चरबी साचण्याचे एक मुख्य कारण असू शकते. त्यामुळे, मन शांत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ ध्यान करा. हलके दीर्घ श्वसनाचे व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल आणि रिकव्हरी वेगाने होईल.
६. पोटाच्या बेल्टचा (Abdominal Belt) वापर :- अनेक महिला सी-सेक्शननंतर पोटाला आधार देण्यासाठी सपोर्ट बेल्ट किंवा 'एब्डोमिनल बाइंडर' चा वापर करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ठराविक वेळेसाठी हा बेल्ट वापरू शकता. याचे मुख्य फायदे म्हणजे, हा पोटाच्या स्नायूंना आधार देतो. शरीराची ठेवण किंवा ' बॉडी पोश्चर' सुधारण्यास मदत करतो. बेल्ट घातल्याने थेट पोटाची चरबी कमी होत नाही; तो फक्त तुमच्या पोटाला आणि पाठीला आधार देण्याचे काम करतो. त्यामुळे व्यायामाला हा पर्याय ठरू शकत नाही.
सी-सेक्शननंतर पोटाचा घेरा कमी करणे ही एक सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी संयम आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःच्या शरीराची तुलना इतरांशी करू नका, कारण प्रत्येक स्त्रीची रिकव्हरी वेगळी असते. योग्य आहार, हलका व्यायाम आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन यांच्या मदतीने तुम्ही पुन्हा फिट होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या काळात स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या.
Web Summary : Post-C-section, avoid harsh diets. Consult doctors, walk gently, and do postnatal exercises. Eat protein, fiber, and healthy fats. Prioritize sleep, and consider abdominal belts with guidance. Patience is key to recovery.
Web Summary : सी-सेक्शन के बाद, कठोर आहार से बचें। डॉक्टरों से सलाह लें, धीरे चलें और प्रसवोत्तर व्यायाम करें। प्रोटीन, फाइबर और स्वस्थ वसा खाएं। नींद को प्राथमिकता दें और मार्गदर्शन के साथ एब्डोमिनल बेल्ट पर विचार करें। धैर्य ही रिकवरी की कुंजी है।