Join us   

मासिक पाळीमुळे ऐन दिवाळीत पिंपल्सचं टेन्शन? मग हा घ्या त्यावरचा योग्य उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 5:03 PM

पिरेड्सजवळ आले की हमखास काही जणींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आता ऐन दिवाळीत चेहऱ्यावर पिंपल्स म्हणजे डोक्याला ताप. हा त्रास टाळण्यासाठी करून बघा हे काही सोपे उपाय....

ठळक मुद्दे आपला आहार, फिटनेस आणि आरोग्य या गोष्टीही त्यासाठी खूप जबाबदार असतात.

काही जणींना पाळीचा काहीच त्रास होत नाही. त्याउलट काही जणींना मात्र पाळीदरम्यान आणि पाळीच्या आधीही भयंकर त्रास होतो. पाळीमध्ये पोटदुखी तर असतेच. पण त्याशिवाय अनेक जणींना पाळी जवळ येऊ लागली की चेहऱ्यावर अगदी मोठमोठाले पिंपल्स येऊ लागतात. शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्यासोबतच आपला आहार, फिटनेस आणि आरोग्य या गोष्टीही त्यासाठी खूप जबाबदार असतात.

 

आता दिवाळीची सगळी जय्यत तयारी सुरु असताना, मेकअप, कपडे, ज्वेलरी एवढं सगळं व्यवस्थित ठरलेलं असताना तर ऐनवेळी पिरेड्समुळे पिंपल्सनी डोकं वर काढलं तर सगळ्या रंगाचा बेरंग होऊ लागतो आणि आपला सगळा मुडच जातो. यासोबतच पाळी जवळ येताच किंवा पाळी सुरु होताच अनेक जणींचा चेहरा निस्तेज होतो, सुकल्यासारखा वाटतो. पाळीमुळे येणारे पिंपल्स खूप जास्त दुखतात. सगळ्यात मुख्य म्हणजे कोणत्याही कारणामुळे चेहऱ्यावर पिंपल आला, तर पुढील काही महिन्यांसाठी तो चेहऱ्यावर काळा डाग ठेवून जातो. असे डाग वाढत गेले तर चेहराही विद्रूप दिसतो. म्हणूनच तर ऐन दिवाळीत किंवा एरवीही कधी पाळीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नयेत, म्हणून पाळी जवळ येताच काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. 

 

आयुर्वेदानुसार असे सांगण्यात येते की मासिक पाळीच्या आसपास जर चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, तर त्यासाठी आपले खाण्यात काहीतरी चुकते आहे हे लक्षात घ्यावे. कारण चुकीचे पदार्थ पोटात गेल्यास पचनशक्ती बिघडते आणि अपचनामुळे आणि चयापचय क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे चेहऱ्यावर फोड येतात. त्यामुळे मैदा, कॉफी, मसालेदार, खारट, आंबट पदार्थ नेहमीच कमी प्रमाणात खाणे हा त्यावरचा एक चांगला उपाय आहे. या पदार्थांचे सेवन जर मर्यादित असेल तर चयापचय क्रिया आणि हार्मोन्सचे संतूलन या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने राखल्या जातात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येणे कमी होते. 

 

पाळी जवळ येताच..... - तसं तर महिनाभर आपण पौष्टिक पदार्थच खाल्ले पाहिजेत. पण महिनाभर संयम पाळणं शक्य झालं नाही, तर निदान पाळी येण्याच्या आधीचे १०- १२ दिवस तरी आहाराच्या बाबतीत काही पथ्य पाळलं पाहिजे.  - सफरचंद, केळी, अंजीर यासोबतच मोसमी फळे मोठ्या प्रमाणावर खावीत. - पाणी योग्य प्रमाणात प्यावे.

- पत्ताकोबी, भेंडी, पालेभाज्या, वाटाणे यांचा आहारातील सहभाग वाढवावा. - साजूक तूप खाण्याचे प्रमाण वाढवावे. कारण यामुळे हार्मोनल बॅलेन्स राखला जातो आणि तूप त्वचेला आतून पोषण देण्याचे काम करते. - जिरे, बडीशेप, पुदिना, गवतीचहा यांचे योग्य प्रमाण ठेवावे. - आठवड्यातून किमान तीन वेळेस तरी नारळपाणी प्यावे. पाळी सुरु असतानाही रोज एक नारळपाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे.  - दिवसातून १० मिनिटे तरी दिर्घ श्वसन करावे. 

 

हे काही पदार्थ टाळा - चिंच, लोणचे, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा - चायनिय पदार्थांचे अतसेवन केल्यामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. - तिळाच्या तेलाचा वापर टाळावा कारण हे तेल उष्ण असते. - कच्चा कांदा, वांगे खाणे टाळावे. - चहा, कॉफी यांचे अतिसेवन आणि कोल्डड्रिंक्स पिणे टाळावे. 

 

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यब्यूटी टिप्सआहार योजनात्वचेची काळजी