Join us

स्विगीने महिला कर्मचाऱ्यांना दिली 'पिरियड लिव्ह'! काय वाटतं, द्यावी का महिलांना अशी सुटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 14:09 IST

कधी मॅटर्निटी लिव्ह तर कधी पिरियड लिव्ह, सणावारांच्या सुट्ट्या तर असतातच. महिलांना अशाप्रकारे सुट्ट्या द्याव्यात की त्यांना नोकरीवरच घेऊ नये. याबाबात तुम्हाला काय वाटते...

ठळक मुद्दे खासगी आणि सरकारी क्षेत्रात अशाप्रकारे महिलांना विशेष सुट्ट्या देणे कितपत योग्य आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. पाळीच्या काळात मुलींना आणि महिलांना होणारा त्रास अनेकदा शब्दात सांगणे कठिण आहे

ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने नुकतीच आपल्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची पिरीयड लिव्ह लागू केली आहे. स्विगी ऑपरेशन्सचे वाइस प्रेसिडेंट मिहिर शाह यांनी नुकतेच एका पोस्टमध्ये म्हटले की, 'मासिक पाळी दरम्यान, रस्त्याने कोणाकडे डिलीवरीसाठी जाणे महिलांना त्रासदायक ठरु शकते.' यामुळेच हे काम करण्यास महिला धजावत नाहीत. मात्र महिलांना मासिक पाळीशी संबधित अडचणींना सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच या दिवसांमध्ये कोणत्याही प्रश्नाशिवाय महिला डिलीवरी सहकाऱ्यांना महिन्यातून विशेष दोन सुट्या देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.'

मागील वर्षी झोमॅटोनेही अशाप्रकारे महिला कर्मचाऱ्यांना पिरियडच्या कारणासाठी वर्षातून १० अतिरिक्त सुट्ट्या देण्याची घोषणा केली होती. जगभरात अशाप्रकारे पिरियड लिव्हची मागणी होत असताना खासगी आणि सरकारी क्षेत्रात अशाप्रकारे महिलांना विशेष सुट्ट्या देणे कितपत योग्य आहे याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. सगळे जण समान काम करत असताना महिलांनाच ही विशेष सूट का? आम्हालाही आरोग्याच्या अनेक अडचणी असू शकतात, मग मुलींना अशा प्रसूतीसाठी, मासिक पाळीसाठी, सणावारांसाठी किंवा अन्य कौटुंबिक अडचणींसाठी सुट्ट्या द्यायच्या तर त्यांना नोकरीवर तरी कशासाठी घ्यायचे असाही प्रश्न विचारणारा एक गट आहे. 

हे सगळे खरे असले तरी पाळीच्या काळात मुलींना आणि महिलांना होणारा त्रास अनेकदा शब्दात सांगणे कठिण आहे. खूप जास्त रक्तस्त्राव होणे, पोटातून कळा येणे, पाठ आणि पायांत प्रचंड वेदना होणे. यामुळे होणारी मळमळ, डोके जड होणे अशी लक्षणे महिलांमध्ये दिसू शकतात. या परिस्थितीत काम करणे सोपे नाही. यापुढे जाऊन काहींना अनियमित येणारी पाळी, जास्त दिवस रक्तस्त्राव होत राहणे, PCOS सारख्या समस्या यांसाठी सुट्टीची आवश्यकता असू शकते. तसेचठराविक अंतराने पॅड किंवा इतर कपडे बदलण्यासाठी जायचे असल्यास महिलांना ऑफीसमध्ये असताना अडचणीचे ठरु शकते. पण याबाबत मोकळेपणाने बोलले जात नसल्याने जास्त त्रास झाल्यास महिला पोटदुखी, डोकेदुखी, ताप अशी खोटी कारणे देत सुट्ट्या घेतात. वर्षाला पुरेशा सुट्ट्या नसतील तर या सुट्ट्यांचा पगारही अनेकदा कापला जातो. 

एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज उभी असल्याचे बोलले जात असताना तिला अशी विशेष सूट देणे योग्य की अयोग्य? याबाबत विविध क्षेत्रातील कंपन्यांचे तसेच महिलांचे आणि महिलांसोबत काम करणाऱ्या पुरुषवर्गाचे काय म्हणणे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दर महिन्याला अशाप्रकारे सुट्ट्या दिल्यास अनेक महिला या सुट्ट्यांचा गैरवापर करु शकतात अशी शंकाही या निर्णयाबाबत घेण्यात येत आहे. पण काही महिलांनी अशी सूट घेतली तरी त्यावरुन सर्रास महिला गैरफायदा घेतील असा तर्क काढणे चुकीचे ठरु शकते. पिरियड लिव्ह म्हणजे स्त्रीवादाबाबत एक पाऊल मागे जाणे नसून दहा पाऊले पुढे जाण्यासारखेच आहे. ज्यामुळे महिला कोणत्याही अडचणीशिवाय आपल्या कंपनीचा, कामाचा सहज भाग होऊ शकतात आणि अशा सुविधांमुळे त्यांना कामाच्या ठिकाणी कम्फर्टेबल वाटू शकते.  

( Image : Google)

महिलांना इतक्या सुविधा देऊन नोकरीवर घेण्यासाठी टाळाटाळ होऊ शकते का? असा प्रश्न याबाबत सातत्याने समोर येताना दिसतो. कारण आताही मुलीचे लग्न झाले की तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात या कारणामुळे महिलांना नोकरीवर घेण्यासाठी काही कंपन्या टाळाटाळ करताना दिसतात. पण असा निर्णय कंपनीसाठी तोट्याचा ठरु शकतो याचे कारण म्हणजे महिलांना समान संधी देणे अर्थकारणाच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरु शकते. महिलांमुळे होणारी उत्पादकता आणि आऊटपुट याचा योग्य पद्धतीने अभ्यास होण्याची गरज आहे. तर आपल्याला मासिक पाळीसाठी वेगळ्या सुट्ट्या दिल्या तर मॅनेजमेंटकडून किंवा इतर कर्मचाऱ्यांकडून याबाबत सातत्याने टोमणे मारले जाऊ शकतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सस्विगी