Join us   

२-३ महिने पाळी येत नाही? PCOS-PCOD असल्याने अनियमित पाळीचा त्रास आहे? डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 9:41 AM

Reasons and solution behind irregular Menstrual cycle, PCOS-PCOD : मासिक पाळी अनियमित असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

मासिक पाळी म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारे बिजांड फुटणे आणि ठराविक कालावधीने त्याचा निचरा होणे. या काळात शरीर संबंध आले तर हे अंडे फलित होते आणि गर्भधारणा होते. पण अंडे फलित झाले नाही तर मात्र वयात आलेल्या मुलींना साधारणपणे २८ ते ३० दिवसांत मासिक पाळी येते. पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया असून ती वेळच्या वेळी येणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगले असते. पण या चक्रात काही अडथळा निर्माण झाला असेल तर मासिक पाळी पुढे-मागे होण्याची शक्यता असते. २ ते ४ दिवस पाळी पुढे-मागे झाली तर ठिक आहे. पण काही मुलींना २-३ महिने पाळी येतच नाही तर काहींना दर १० ते १५ दिवसांनी पाळी येते. काही जणींना एकदा पाळी आली की ती १० ते १२ दिवस चालूच राहते (Reasons and solution behind irregular Menstrual cycle, PCOS-PCOD). 

(Image : Google)

याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन सांगतात...

शरीरात हार्मोन्समध्ये झालेले असंतुलन हे यामागील मुख्य कारण असून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या २ हॉर्मोन्सवर पाळीचे नियंत्रण अवलंबून असते. या हार्मोन्सचे तुलनात्मक प्रमाण, त्यांचा रेशो आणि शरीरात हे हॉर्मोन्स तयार होण्याची वारंवारीता यावरुन पाळीची नियमितता ठरते. गर्भाशयाच्या भोवती एक अस्तर किंवा आवरण तयार करण्याचे काम इस्ट्रोजन करते. मात्र गर्भधारणा न झाल्यास या अस्तराची वाढ थांबवणे आणि या अस्तराचे विघटन करणे ही क्रिया मासिक पाळीच्या रुपाने होत असते. म्हणूनच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची योग्य प्रमाणात आणि योग्य क्रमाने निर्मिती होणे आवश्यक असते. भविष्यात गर्भधारणा होण्यासाठी हे पाळीची सायकल व्यवस्थित असणे  अतिशय आवश्यक असते. 

(Image : Google)

ओव्हरीजमध्ये गाठी तयार होणं किंवा पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच पीसीओडी यांसारख्या समस्या गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. पाळी नियमित नसण्यामागे या गोष्टी कारणीभूत असतात. त्याचबरोबर अतिरीक्त वजन, ताणतणाव, रक्ताची कमतरता किंवा अॅनिमिया, अशक्तपणा या गोष्टींमुळेही पाळी अनियमित होऊ शकते. हार्मोन्सचे संतुलन तात्पुरते बिघडले असेल आणि नंतर ते पुन्हा पूर्वपदावर आले तर पाळी पुन्हा नियमित होण्याची शक्यता असते. पण असे झाले नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच योग्य ते उपचार घ्यावे लागतात. लघवी, रक्ताच्या तपासण्या आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून ओव्हरीजची अवस्था तपासली जाते. याशिवाय हॉर्मोन्सच्या तपासण्या, थायरॉईड यांसारख्या तपासण्याही करण्यास सांगितले जाते. यावरुन नेमकी अडचण लक्षात घेऊन डॉक्टर औषधोपचार करतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यलाइफस्टाइलपीसीओएसपीसीओडी