महिलांच्या आयुष्यात दर महिन्याला येणारा PMS म्हणजेच Premenstrual Syndrome हा स्त्रीशरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांचा एक नैसर्गिक भाग असला तरी त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. (PMS bother all women before menstruation, These are the changes that occur in a woman's body every month.)अनेक महिलांना हा काळ अत्यंत तणावाचा वाटतो, तर काहींना फक्त किरकोळ बदल जाणवतात. पण या सगळ्यामागे शरीरातील इस्ट्रोजन-प्रोजेस्टरॉन या हार्मोन्सची होणारी चढ-उतार हीच प्रक्रिया मुख्य कारणीभूत असते.
पीरियड्स येण्याच्या काही दिवस आधी शरीरातील ही रासायनिक हालचाल वाढते आणि त्यामुळे मनःस्थिती अस्थिर होणे, चिडचिड वाढणे, अचानक राग येणे किंवा मानसिक थकवा आणि नैराश्य येणे अशी लक्षणे दिसू लागतात. काही महिलांना पोट फुगल्यासारखे वाटते, पोटात पाणी साठते. छातीत दुखते, डोकेदुखी, पाठदुखी, अंग जड जाणवणे यांसारखे त्रास भेडसावतात. कधीकधी झोप नीट न लागणे, जास्त भूक लागणे किंवा गोड खायची इच्छा वाढणे हेही PMS चेच भाग असू शकतात. या सर्व गोष्टींमुळे दिवसातील लहानसहान कामेही कठीण वाटू शकतात आणि मानसिक ऊर्जा कमी होते.
तरीही या अवस्थेला घाबरण्याची गरज नसते, कारण योग्य काळजी घेतली तर PMS चा त्रास बराच कमी करता येतो. सर्वप्रथम जीवनशैलीत थोडे बदल करणे उपयुक्त ठरते. हलका पण नियमित व्यायाम जसे चालणे, स्ट्रेचिंग, योगसने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि मन शांत करते. कॅफीन, जास्त मीठ, तळलेले पदार्थ कमी घेतल्यास सूज व पोटफुगी कमी होते. भरपूर पाणी पिणे, फळे-भाज्या यांसारखे पदार्थ खाणे, ताजा आहार घेतल्यास शरीर हलके वाटते आणि ऊर्जा टिकून राहते. ताण कमी ठेवण्यासाठी ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा काही वेळ स्वतःसाठी शांत बसणेही फारच फायदेशीर ठरते.
कधी त्रास जास्त होत असल्यास गरम पाण्याची पिशवी पोटावर किंवा पाठीत ठेवल्यास स्नायू सैल होतात. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी६, ओमेगा-३ यांसारखी पोषणतत्त्वे असलेला आहार घेतल्याने मूड स्विंग्स नियंत्रित राहण्यास मदत होते. काहींना गरम हर्बल टी किंवा कोमट दूधही आराम देते. मात्र जर PMS चा परिणाम जीवनावर गंभीर पातळीवर होत असेल, सतत उदासी जाणवत असेल किंवा कामात मन लागत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच योग्य.
PMS म्हणजे फक्त एक “महिन्याचा त्रास” नसून शरीरातील होणाऱ्या नैसर्गिक बदलांची प्रतिक्रिया आहे. या काळात महिलांना थोडी अधिक समज, आराम आणि आधार मिळणेही महत्वाचे असते. योग्य आहार, शांत मनस्थिती आणि साधे घरगुती उपाय अंगीकारल्यास PMS चे लक्षणे कमी होऊन हा काळ अधिक सहज, संतुलित आणि सहन करण्याजोगा होऊ शकतो.
