Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पायात गोळे येतात? सोनल चौहान सांगतेय एक सोपा उपाय

मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पायात गोळे येतात? सोनल चौहान सांगतेय एक सोपा उपाय

मासिक पाळीचा त्रास म्हणजे अनेक जणींसाठी दर महिन्याची डोकदुखी. पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानने सांगितलेला उपाय करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 03:05 PM2021-09-16T15:05:49+5:302021-09-16T15:06:53+5:30

मासिक पाळीचा त्रास म्हणजे अनेक जणींसाठी दर महिन्याची डोकदुखी. पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानने सांगितलेला उपाय करून बघा.

Menstrual cramps, leg cramps? actress Sonal Chauhan says a simple solution | मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पायात गोळे येतात? सोनल चौहान सांगतेय एक सोपा उपाय

मासिक पाळीत खूप पोट दुखतं, पायात गोळे येतात? सोनल चौहान सांगतेय एक सोपा उपाय

Highlightsउच्चरक्तदाबाचा त्रास किंवा अतिचंचलता असणाऱ्यांना वज्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील नियमितपणे वज्रासन करावे.

पाळीचे ते चार दिवस अनेक जणींसाठी प्रचंड त्रासदायक असतात. अविवाहित तरूण मुलींना तर पाळीचा भयंकर त्रास होतो. ओटीपोटात होणाऱ्या तिव्र वेदना, पोटऱ्यांमध्ये येणारे गोळे, कंबरदुखी, मळमळ, डाेकेदुखी, उलट्या, अपचन असे वेगवेगळे त्रास या काळात महिलांना सहन करावे लागतात. या सगळ्या त्रासासोबतच अनेक जणींना पाळीमध्ये खूप जास्त ब्लिडिंगदेखील होते. हा त्रास कमी करण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान हिने एक सोपा उपाय सांगितला आहे. अगदी घरातल्या घरात करता येणारा हा उपाय जाणून घ्या आणि पाळीतला त्रास कमी करा.

 

पाळीमध्ये पोट का दुखते ?
पाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच महिलांच्या शरीरात वेगवेगळे बदल होण्यास सुरूवात होते. प्रत्यक्ष पाळी येऊन जेव्हा रक्तस्त्राव सुरु होतो, तेव्हा गर्भाशयाच्या भिंतींचे स्नायू संकुचित होत जातात आणि त्यामुळे पोटदुखी सुरू होते. अनेक महिलांना हा त्रास खूप तिव्र स्वरूपाचा जाणवतो. पाळीचे सुरुवातीचे २ दिवस त्या अतिशय अत्यवस्थ असतात. शिवाय काही जणींना तर पाळी येण्याच्या १- २ दिवस आधीपासूनच हलकी ते मध्यम स्वरूपाची पोटदुखी, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे किंवा पचनकार्य बिघडणे, कंबर दुखणे असे त्रास सुरु झालेले असतात. 

 

पाळीचा त्रास कमी करण्यासाठी सोनल चौहान काय करते?
बहुतांश स्त्रियांना पाळीदरम्यान वेगवेगळ्या त्रासांचा सामना करावाच लागतो. यापैकीच एक आहे बॉलीवुड अभिनेत्री सोनल चौहान. सोनलने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचे कपडे घातले असून ती योगा करताना दिसते आहे. योगासनांपैकी वज्रासन किंवा डायमंड पोज हे आसन तिने केले असून यामध्ये तिची भावमुद्रा अतिशय शांत दिसते आहे. सोनलने या पोस्टद्वारे वज्रासन करण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि त्यामुळे शरीराला होणारे वेगवेगळे फायदे अशी सगळी सविस्तर माहिती दिली आहे. मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी हे वज्रासन अतिशय उपयुक्त् असून ज्या महिलांना या काळात तिव्र स्वरूपाच्या वेदना सहन कराव्या लागतात, त्यांनी नक्कीच हे आसन करून पहावे, असेही तिने सांगितले आहे. 

 

सोनल सांगते की तुमच्या शरीराला मजबूती देण्यासाठी हे एक सर्वोत्तम आसन आहे. आसन करण्याची पद्धत देखील अतिशय सोपी आहे. मन एकाग्र करण्यासाठी आणि ध्यानधारणा करण्यासाठी ही एक अतिशय चांगली आसनस्थिती आहे, असे देखील सोनलला वाटते. वज्रासन केल्यामुळे ओटीपोटाच्या स्नायुंचा व्यायाम होत असल्याने मासिक पाळीसोबतच प्रसुती कळांचा त्रास कमी करण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त ठरते, असे सोनम म्हणते. जेवण झाल्यावर लगेचच कोणतेही आसन करणे योगशास्त्रानुसार वर्ज्य आहे. पण वज्रासन हा या नियमाला एकमेव अपवाद असून वेटलॉससाठीदेखील वज्रासन केले पाहिजे असे सोनम सांगते.

वज्रासन करण्याचे इतर फायदे 
१. वेटलॉससाठी महत्त्वाचे

वज्रासनातून वेटलॉस कसा काय शक्य आहे, असे वाटणे अगदी साहजिक आहे. पण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि शरीर सुडौल बनविण्यासाठी वज्रासन अतिशय उपयुक्त ठरते. जेवण झाल्यावर दररोज १० ते १५ मिनिटे वज्रासनात बसावे. किंवा सगळा व्यायाम करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वज्रासन करून मेडिटेशन करावे. हे आसन नियमितपणे केल्यास महिनाभरातच बॉडी टोनमध्ये कमालीचा फरक जाणवू लागतो. 

 

२. पचनक्रिया सुधारते
पचन क्रियेसंबंधी अनेक आजार दुर करण्यासाठी आणि पचनकार्य सुधरविण्यासाठी वज्रासन अतिशय उपयुक्त ठरते. वज्रासन केल्यामुळे चयापचय क्रिया चांगली होते. जेवण झाल्यावर वज्रासनात बसल्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. पोटाकडे रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होऊन अन्नातील पोषक घटक संपूर्ण शरीराला मिळतात. नियमित वज्रासन केल्यामुळे बद्धकोष्ठता तसेच गॅसेसचा त्रासदेखील कमी होतो. 

 

३. पाठदुखी, कंबरदुखी कमी होते
वज्रासन करताना आपल्या पाठीची जी स्थिती होते, ती पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. वज्रासनात पाठीचा कणा अगदी ताठ राहतो. हल्ली पाठदुखीचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. बसण्याची चुकीची पद्धतदेखील पाठदुखीसाठी जबाबदार आहे. त्यामुळे पाठदुखी टाळण्यासाठी किंवा पाठीला बाक येऊ नये, म्हणून वज्रासन नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो.  

 

४. मनावरचा ताण कमी करण्यासाठी
ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करण्यासाठी वज्रासनाची आसनस्थिती अतिशय उपयुक्त मानली जाते. वज्रासन केल्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. या स्थितीमध्ये श्वासोच्छवास अतिशय लयबद्ध आणि सुरळीत झालेला असतो. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि मनावरचा ताण हलका होऊ लागतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाचा त्रास किंवा अतिचंचलता असणाऱ्यांना वज्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील नियमितपणे वज्रासन करावे. नियमितपणे वज्रासन केल्यास निद्रानाशाचा त्रास देखील कमी होतो. 

 

Web Title: Menstrual cramps, leg cramps? actress Sonal Chauhan says a simple solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.