Join us   

प्रत्येक चारपैकी ३ महिलांना होतो पाळीपूर्वी खूप त्रास! PMS साठी ५ उपाय, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 2:06 PM

विविध कारणांमुळे पाळीपूर्वी महिलांना/ मुलींना त्रास (premenstrual syndrome) होतो. या त्रासावर नैसर्गिक उपाय केल्यास हा त्रास कमी होतो आणि कायमचा थांबतोही. यासाठी ( How to reduce premenstrual syndrome symptoms ) आयुर्वेत तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय वाचा!

ठळक मुद्दे मासिक पाळी येण्याच्या दहा दिवस आधीपासून आहारातील साखरेचे पदार्थ खाणं कमी करावं/ टाळावं.नियमित व्यायामानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. शांत पुरेशी झोप हा अनेक समस्यांवरचा उपाय आहे. 

मासिक पाळी येण्यापूर्वी अनेक महिला आणि मुलींना त्रास होतो. या त्रासाला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (premenstrual syndrome)  असं म्हणतात. शारीरिक आणि मानसिक पातळीवर  होणाऱ्या या त्रासात मूड  स्विंग होणे, स्तन हुळहुळे होणं किंवा खूपच जड पडणं, सतत खावंसं वाटणं, थकवा येणं,  चिडचिड होणं, उदास वाटणं अशा समस्यांचा समावेश आहे. मायो क्लिनिकनं केलेला अभ्यास सांगतो की पाळी येणाऱ्या 4 पैकी 3 महिलांना प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा त्रास होतो. पाळीपूर्वी हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाल्यानं, मेंदूतील सेरोटोनिन हे हार्मोन कमी जास्त झाल्यास, डिप्रेशन या कारणांमुळे पीएमएसचा त्रास होतो. हा त्रास प्रत्येक महिला आणि मुलीमध्ये वेगवेगळा असू शकतो. या त्रासावर योग्य उपाय  (how to reduce premenstrual syndrome symptoms ) केल्यास  त्रास थांबतोही.

Image: Google

आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी नैसर्गिक उपायांद्वारे पीएमएसचा त्रास कमी करता येतो.  मासिक पाळी येण्याआधीपासून हे उपाय सुरु केल्यास मासिक पाळी पूर्वी त्रास कमी करता आणि थांबवताही येतो. यासाठीचे उपाय अगदी सोपे आणि सहज करता येण्यासारखे आहेत. 

1. रोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या मनुका आणि 4 भिजवलेले बदाम खावेत. आतड्यांना थंडावा देण्यासाठी रात्री धणे पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी उठल्यावर गाळून प्यावं. मासिक पाळी येण्याच्या 2 आठवडे आधीपासून आहारात आंबट, तळलेले , प्रोसेस्ड फूड खाणं टाळावं.

2. मासिक पाळी येण्याच्या 2 आठवडे आधी आरोग्यदायी बियांचं सेवन सुरु करावं. पहिला आठवड्यात प्रत्येकी 1 चमचा सूर्यफुर्लाच्या आणि  भोपळ्याच्या बिया खाव्यात तर दुसऱ्या आठवड्यत 1 चमचा तीळ खावेत.

Image: Google

3. मासिक पाळीच्या काळात चयापचय क्रिया चांगली ठेवण्यासाठी, हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी चवीला गोड असणारे फळं खावीत. गाईचं तूप, ऑलिव्ह तेल, सुका मेवा आणि आरोग्यदायी बिया यांचं सेवन नित्यनेमानं करावं. आहाराचे नियम पाळताना साखर आणि तेल यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. प्रक्रियायुक्त साखर जास्त खाल्ल्यानं वजन वाढतं, शरीरावर सूज येते. यामुळे चयापचय क्रिया मंद होते. त्यामुळे पाळी येण्याच्या दहा दिवस आधी साखरेचे गोड पदार्थ खाणं एकदम कमी करायला हवं किंवा टाळायला हवं. 

4. पाळीपूर्वी होणारा त्रास टाळण्यासाठी रोज व्यायाम करणं, ध्यानधारणा करणं आवश्यक आहे. काॅर्टिसाॅल या हार्मोनमुळे पीएमएसचा त्रास होतो. हे हार्मोन तणाव निर्माण करण्यासही कारणीभूत ठरतं. या हार्मोनचा प्रभाव कमी करण्यासाठी रोज कमीत कमी 40 मिनिटं व्यायाम करायला हवा. चालणं, फिरणं, पळणं, सायकल चालवणं असा कोणताही व्यायाम केला तरी चालतो. तसेच रोज 15-20 मिनिटं ध्यान धारणा करणं, श्वासोच्छवासाचे व्यायाम करणं अर्थात प्राणायम करणं आवश्यक आहे.  व्यायाम करताना खूप थकवा येईल इतका व्यायाम करु नये. यामुळे शरीरात वात वाढतो आणि पाळीदरम्यान शरीरात वेदना होतात. हलका फुलका व्यायाम पण रोज करणं आवश्यक आहे. 

Image: Google

5. हार्मोन्सचं संतुलन बिघडू नये यासाठी रोज पुरेशी झोप झालेली असणं आवश्यक आहे. रात्रीची जागरणं टाळावी. कारण यामुळे शरीरातील वात वाढतो. रोज ठरलेल्या वेळी, लवकर झोपल्यास, झोप पुरेशी घेतल्यास दिवसभर उत्साही वाटतं. हार्मोन्स संतुलित राहातात, चयापचय क्रिया योग्य वेगानं काम करते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. पुरेशी झोप हा अनेक आजारांवरचा सोपा उपाय आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यआहार योजना