- सायली शिर्के
प्रत्येकीच्या आयुष्यातले 'ते' चार दिवस... असह्य वेदनेचे, अस्वस्थतेचे, विश्रांतीची नितांत गरज असण्याचे, कोणीतरी समजून घेण्याचे, मनात सतत चलबिचल होण्याचे, मूड बदलण्याचे, डाग लागण्याच्या भीतीचे, मायेने कोणीतरी जवळ घ्यावं असं वाटण्याचे आणि दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीचे .... खरंतर मासिक पाळी हा शब्द आधी तसा वर्जच असायचा. विटाळ म्हणत लोक सहज टाळायचे पण हल्ली त्याबद्दल थोडं का होईना मोकळेपणाने बोललं जातं किंवा तसा किमान प्रयत्न तरी केला जातो. अशातच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनांनी मन ढवळून निघतं आणि विचारांचं काहूर माजतं.
ठाण्याजवळ शहापूर गावांत काही दिवसांपूर्वी लाजिरवाणा प्रकार समोर आला. शहापूरमधील एका शाळेत विद्यार्थिनींसोबत संतापजनक घटना घडली. बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळले म्हणून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना जबरदस्तीने कपडे काढायला लावण्यात आले आणि शिक्षकांनी त्यांची तपासणी केली. मासिक पाळीमुळे फरशी खराब झाली असावी असा शाळेला संशय असल्याने हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली. ज्यांच्यासोबत हे घडलं त्या मुलींना काय वाटलं असेल? नुकत्याच उमलणाऱ्या कळ्या काय विचार करत असतील, त्यांच्या मनावरील हा आघात पुसला जाईल का? मायेची फुंकर कितपत त्यांची जखम भरून काढेल? मनात सुरू असलेली तगमग कोण समजून घेईल? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? त्या चार दिवसांची त्यांना भीती वाटेल का, यातून मुली सावरतील का? असे असंख्य प्रश्न काळजात चर्र करताहेत.
जेव्हा पहिल्यांदा एखाद्या मुलीला मासिक पाळी येते, हे सर्व आपल्यासोबत घडतं तेव्हा खूप भीती वाटते, खूप रडू येतं, माझ्यासोबतच का असा प्रश्न हमखास पडतो, आपल्याच शरीराची घाण वाटू लागते. ते नाजूक फूल विचाराच्या चक्रात हरवून जातं. याच काळात कोणीतरी समजून सांगण्याची, जवळ घेण्याची नितांत गरज असते. पण आपल्या सर्वसामान्य घरात मुलीला पहिल्यांदा पाळी आली की, 'बाईचा जन्म म्हटल्यावर हे आलंच, वयात आल्यावर पाळी येते, मुलींसोबत असं घडतं' असं सांगून हा विषय हमखास टाळला जातो. या दिवसात कशी आणि कोणती काळजी घ्यायची, शरीरात काय बदल होतात हे सांगणारं कोणीच नसतं. ठाण्यातील प्रकार ताजा असतानाच मासिक पाळीच्या वेदना असह्य झाल्या म्हणून एक मुलीने आत्महत्या केल्याची भयंकर घटनाही समोर आली. मासिक पाळीबाबत मुलींना समजून सांगण्यात, त्यांचा त्रास कमी करण्यात, अर्थ समजवण्यात आपण खरंच कमी पडतोय याची अशावेळी प्रकर्षाने जाणीव होते.
रोजची दगदग, कामाचं टेन्शन, घरातील जबाबदारी, शरीरातील हार्मोनल बदल यामुळे मासिक पाळीचे चार दिवस वेळेवर यायचं सोडा. कधी लवकर तर कधी उशीराच येतात. त्यामुळे दर महिन्याला नेमकी पाळी कधी येणार याचा अंदाजच चुकतो. सणसमारंभाच्या वेळी तर अवघडच. काही जणी तर आधीच गोळ्या घेतात जेणेकरून पाळी पुढे ढकलता येईल पण हे सर्व शरीरासाठी अत्यंत घातक असल्याचं त्या सहज विसून जातात. सध्या इन्स्टाग्राम रीलची क्रेझ पाहायला मिळते. यात हल्ली एक रील विशेष लक्ष वेधून घेत ते म्हणजे 'बेबी पिरिएड' असं म्हटल्यावर बॉयफ्रेंड मॉलमध्ये जातो आणि त्याच्या लाडक्या गर्लफ्रेंडसाठी सॅनिटरी पॅड, चॉकलेट, फुलं आणि टेडीबीयर घेऊन येतो. गमतीचा मुद्दा सोडा पण या गोष्टी रील पुरत्या मर्यादित न राहता खऱ्या आयुष्यातही तुमच्या आयुष्यातील 'ती' ची काळजी घेतली तर तिच्यासाठी याहून दुसरी कोणतीच भारी गोष्ट नसेल.
Happy to Bleed ही चळवळ उभी राहीली ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर या चळवळीत आजच्या प्रतिभावान, कर्तृत्वान आणि खऱ्या अर्थाने सक्षम असलेल्या सर्व स्त्रिया सहभागी आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळेच विश्व निर्माण करण्याची ताकद त्या कोवळ्या कळ्यांना समजून सांगण्याची, धार्मिक गोष्टीची भीती दाखवून तिला अडकवून न ठेवण्याची, मोकळेपणाने तिला हवं तसं जगण्याची, तिच्यातल्या एक सुंदर बदलाची, शक्तीची जाणीव करून देण्याची, स्त्रीत्वाची नव्याने ओळख करून देण्याची आणि विशेषत: मासिक पाळीबाबत असलेले सर्व भुरसटलेले विचार कायमचे पुसून टाकण्याची वेळ आता आली आहे. मासिक पाळीला विटाळ म्हणणाऱ्यांना आता आपणच 'Weटाळ' म्हणजे टाळलं पाहिजे कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य करून प्रत्येकीला अभिमानाने जगत उत्तुंग भरारी घ्यायची आहे.