First Period Celebration : दर महिन्यात महिलांना येणारी मासिक पाळी हा त्यांच्या जीवनाचा नॅचरल, महत्वाचा आणि तेवढाच वेदनादायी काळ असतो. मासिक पाळीबाबत (First Period) आजही अनेक गैरसमज आहेत. पण आपल्याला वाचून आनंद होईल की, जगातील अनेक देशांमध्ये हा क्षण मुलीच्या आयुष्यातील सेलिब्रेशन मोमेंट (First Period Celebration ) मानला जातो. कुठे खास पार्टी ठेवली जाते, तर कुठे संपूर्ण समाज या बदलाचा भाग होतो. अशाच काही परंपरा आज आपण पाहणार आहोत.
भारतातील काही भागातील परंपरा
दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुलीच्या पहिल्या पाळीच्या वेळी खास समारंभ आयोजित केला जातो. नवीन कपडे दिले जातात, नातेवाईकांना बोलावून मिठाई वाटली जाते आणि या बदलाचा सकारात्मकतेने उत्सव साजरा केला जातो.
जपानमधील परंपरा
जपानमध्ये पहिल्या पाळीच्या वेळी रेड बीन राईस (सेकिहान) बनवला जातो. ही डिश आनंद आणि शुभेच्छेचं प्रतीक मानली जाते. कुटुंबातील लोक एकत्र येऊन हे खातात, जेणेकरून मुलीला जाणवेल की हा एक आनंदाचा क्षण आहे.
आफ्रिकेतील अनोखा उत्सव
आफ्रिकेतील काही आदिवासी समाजांमध्ये मुलींच्या पहिल्या पाळीच्या वेळी त्यांना खास नृत्य समारंभात सहभागी केलं जातं. संपूर्ण गाव दाखवतं की ती आता स्त्रीत्वाकडे वाटचाल करत आहे आणि तिचं मनापासून स्वागत केलं जातं.
इटलीमध्ये 'यंग लेडी' होण्याचा उत्सव
इटलीमध्ये मुलीला नातेवाईक आणि कुटुंबिय तिला "Signora" म्हणजेच यंग लेडी म्हणून शुभेच्छा देतात. अनेक घरांमध्ये हा प्रसंग छोट्या समारंभासारखा साजरा केला जातो, जिथे संपूर्ण वातावरण सणासारखं असतं.
फिलिपिन्समधील परंपरा
फिलिपिन्समध्ये ही परंपरा थोडी विचित्र पण रंजक आहे. इथे मुलीला पहिली पाळी आल्यानंतर आई तिचे कपडे धुऊन ते पाणी मुलीच्या चेहऱ्यावर लावते. स्थानिक मान्यता आहे की यामुळे मुलीला मुरुम येत नाहीत आणि त्वचा स्वच्छ राहते. एवढंच नाही तर मुलीने तीन पायऱ्या उडी मारण्याची प्रथा आहे, ज्याचा अर्थ ती तीन दिवस या अवस्थेत राहील. या प्रसंगी कुटुंब आणि ओळखीचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.
आजकाल अनेक भारतीय कुटुंबंही हे छोटे सेलिब्रेशन म्हणून स्वीकारू लागली आहेत. सोशल मीडियावर अशा पालकांच्या गोष्टी व्हायरल होतात, जे आपल्या मुलीच्या पहिल्या पाळीला केक आणि गिफ्ट्स देऊन साजरा करतात.