बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक अडचणी वाढल्या आहेत. महिलांच्याआरोग्याच्यादृष्टिने अनेक बदल झाले आहेत. त्यापैकी एक समस्या म्हणजे पाळीची अनियमितता. पाळी वेळेवर येत नाही, PCOD, PCOS असे त्रास तर सामान्य झाले आहेत. त्यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळे येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अनेक उपाय-उपचार आहेत मात्र ते करणे म्हणजे फार हाल आणि शारीरिक मानसिक दुखणी सहन करावी लागतात. अनेकदा पाळी संबंधित अडचणी या स्वत:हून ओढवून घेतलेल्या असतात. आपल्याच काही सामान्य सवयी घातक ठरतात. या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे.
१. पाळी पुढे मागे करण्याच्या गोळ्या घेणे आता अगदी सामान्य झाले आहे. डॉक्टरही सांगतात की नैसर्गिक चक्राशी छेडछाड करणे चांगले नाही. ठरलेल्या वेळी पाळी येऊन जाणे फार गरजेचे असते. काही दिवस पुढे मागे होणे अगदीच नैसर्गिक आहे. पण आपण त्यासाठी उपाय करुन त्याचे चक्र बदलणे घातक ठरु शकते. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी पाळी पुढे-मागे करण्याच्या गोळ्या घेणे शक्यतो टाळाच.
२. आजकाल बॉडी पॉझिटीव्हिटीच्या नावाखाली ओबेसिटी म्हणजे आजार नाही किंवा वजन कमी करण्याची गरज नाही असे मानले जाते. स्थुलता आणि पाळी यांचा थेट संबंध आहे. वजन फार जास्त असेल तर पाळी, गर्भधारणा साऱ्याच गोष्टी अवघड होतात. त्यामुळे योग्य वजन असणं गरजेचं आहे.
३. धूम्रपान, मद्यपान आणि इतर काही व्यसने करणे हे ही एक वाढते कारण आहे. या सगळ्या गोष्टी शरीरातील उष्णता फार वाढवतात. पचनसंस्थेवर परिणाम करतात. व्यसनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वेळीच मर्यादा जाणून घ्या.
४. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीला ट्रॉमा समजून त्याचा अतिविचार करणे आणि मानसिक संतुलन बिघडवून घेणेही एक कारण आहे. जर मानसिक अस्थिरता असेल तर त्याचा परिणाम पाळीवर होतो. त्यामुळे वेळीच उपचार करा. शरीरासोबत मनालाही शांतता मिळेल याची काळजी घ्या.