Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Menopause : होतं असं म्हणत सहन करु नका, आयुर्वेदिक उपचारांची मदत मेनोपॉजचा काळ करते सुसह्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 15:48 IST

menopause and perimenopause : आयुर्वेदिक उपचार-जीवनशैलीत बदल हा टप्पा सुखरुप पार पडायला मदत करतात.

ठळक मुद्दे Menopause ला आयुर्वेदामधे ‘रजोनिवृत्ती ' ही संज्ञा आहे. स्त्री जीवनातल्या विविध टप्यांचं वर्णन आणि त्याबद्दलची सखोल शास्त्रीय माहिती, त्यामधे निर्माण होऊ शकणारे विविध आजार, त्यावरील चिकित्सा आयुर्वेदामधे वर्णन केली आहे.

वैद्य विनीता बेंडाळे ( आयुर्वेदतज्ज्ञ-संचालक द्युम्ना विमेन्स क्लिनिक, पुणे)

रोहिणी तिच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या स्थित्यंतरातून जात होती. पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज. सगळेच तिला सांगत होते की असं होतंच, यावर काही इलाज नाही. सहन कर. जगभरातील लाखो-करोडो स्त्रियांना सगळे हेच सांगतात. पण रजोनिवृत्ती अर्थात पेरीमेनोपॉजच्या या त्रासावर आयुर्वेदात उपचार आहे. यासंदर्भात आयुर्वेद काय सांगतो हे आता आपण समजून घेऊ. (perimenopause and ayurveda treatment)

Perimenopause नेमका असतो काय? अचानक ‘ती’ रडते-चिडते-हरवून का जाते जगणे आनंदाने..?

Menopause ला आयुर्वेदामधे ‘रजोनिवृत्ती ' ही संज्ञा आहे. स्त्री जीवनातल्या विविध टप्यांचं वर्णन आणि त्याबद्दलची सखोल शास्त्रीय माहिती, त्यामधे निर्माण होऊ शकणारे विविध आजार, त्यावरील चिकित्सा आयुर्वेदामधे वर्णन केले आहे.  पुनरुत्पादन क्षमता कमी होत जाऊन रजोनिवृत्ती म्हणजे Menopause होणे या टप्यामधील स्त्रीचा ‘अधिरुढा’ असा संदर्भ आयुर्वेदामधे आहे. याचे साधर्म्य पेरीमेनोपॉज या टप्याशी दिसून येते. तसंच पाळी पूर्णपणे बंद होणं याला रजोनिवृत्ती ही संज्ञा आहे. 

गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित सर्व कार्यावर म्हणजे ओव्हल्यूशन प्रक्रियेवरही मुख्यतः वात दोषाचा प्रभाव असतो. म्हणजेच प्रजनन संस्थेचे कार्य हे मुख्यतः वात दोषाच्या अखत्यारित येते. तसेच सर्वसाधारणप‌णे मनुष्याच्या जीवनाची वयोगटानुसार विभागणी केल्यास बाल वयामधे कफ दोषाचे, तारुण्यामध्ये पित्त दोषाचे आणि त्यानंतरच्या काळात वात दोषाचे प्राबल्य असते. म्हणजे स्त्रियांमध्ये या काळात वयोमानानुसार येणारे वात दोषाचे प्राबल्य, तसेच रजोनिवृत्ती च्या काळात प्रजनन संस्थेमधे होणाऱ्या कार्यातील बदलांमधील वात दोषाचा संबंध हे लक्षात घेतल्यास हे स्पष्ट होते की पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज या स्त्री जीवनामधील नैसर्गिक टप्प्यांमधे वात दोषाचा प्रबल असा प्रभाव असतो. 

प्रजनन संस्थव्यतिरिक्तही जी लक्षणं या काळात निर्माण होतात त्यांचा संबंधही वात दोषाच्या कार्याशी निगडित असतो. स्वाभाविकरित्याच या काळात वात दोषाच्या कार्यामधे बिघाड होण्याची संभावना ही मोठी असते. त्यामुळे त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यांमधे बिघाड होण्याची संभावनाही तितकीच मोठी असते.  जसं Estrogen चं कार्य हे वेगवेगळ्या ठिकाणी होणं अपेक्षित असतं आणि त्याच्या कमतरतेमुळे विविध कार्यांमधे बिघाड होतात, तसंच वात दोषाचे संतुलन बिघडल्याने त्याच्या अखत्यारित येणाऱ्या विविध अवयवांच्या कार्यामधे बिघाड होऊन हाडे ठिसूळ होणे, थकवा जाणवणे, झोपेचे चक्र बिघडणे , चिडचिड, मूड स्विंग्ज, स्मरणशक्ती, विचार शक्ती कमी होणे, योनी भागी कोरडेपणा जाणवणे, मूत्रप्रवृत्तीशी संबंधित तक्रारी निर्माण होणे यासारखी लक्षणं निर्माण होतात.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक स्तरावर माहिती घेऊन चिकित्सा योजना केली असता या पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या टप्प्यांमधे होणाऱ्या बदलांवर, लक्षणावर उत्तम प्रकारे उपाय योजना करता येऊ शकते. या टप्पयांशी निगडित आवश्यक तपासण्या करून घेणंही महत्वाचे असतं.  ते उपचार सुरु केलं तर नक्की आपला हा टप्पा सुसह्य होऊ शकतो. रोहिणीने हे सारं समजून उपचार घेतले.

रोहिणीला आणि तिच्या नवऱ्याला , दोघांनाही, हे बदल का होतायत हे सविस्तर समजावून सांगण्यात आलं आणि काही काळ चिकित्सेची मदत घ्यावी लागेल हे सुद्धा स्पष्ट केलं.  दोन आठवड्यांनी पहिल्या फॉलोअपला जेव्हा रोहिणी आली तेव्हा तिच्या लक्षणांमधे साधारण ६०% सुधारणा झाल्याचं तिने सांगितलं. आता साधारण दोन महिने होत आले आहेत तिची चिकित्सा सुरू करून. पुढच्या फॉलोअपपासून तिची औषधे कमी करून काही काळात बंद करायची योजना आहे. तेव्हाही तिचा हात एकदम न सोडता या पुढील टप्प्यामधे तिने स्वतःची काळजी कशी घ्यायची या बाबत तिला सज्ञान करून तिच्या दैनंदिन आयुष्यात, लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल ठेवायचे आहेत आणि त्यामधे आयुर्वेदाची अंतर्भाव कसा ठेवायचा आहे याचा कानमंत्र दिला. या टप्प्यामधील आमच्याबरोबर असलेल्या इतर स्त्रियांप्रमाणेच स्वतःच्या आरोग्याबाबत स्वावलंबी करायचे आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ayurveda offers relief for menopause symptoms; don't just endure it.

Web Summary : Ayurveda provides solutions for perimenopause and menopause symptoms, addressing hormonal imbalances with personalized treatments. It focuses on balancing Vata dosha to alleviate issues like mood swings, sleep disturbances, and bone health, promoting overall well-being and empowering women to manage their health through lifestyle adjustments.
टॅग्स : जागतिक महिला दिन 2026आरोग्यमहिला