वैद्य विनीता बेंडाळे ( आयुर्वेदतज्ज्ञ-संचालक द्युम्ना विमेन्स क्लिनिक, पुणे)
बऱ्याच काळानंतर त्या दिवशी रोहिणी दवाखान्यात आली होती. साधारण दहा वर्षापूर्वी ती पहिल्यांदा आली होती तिच्या पाळीशी निगडित काही तक्रारी घेऊन. तेव्हा २-३ महिन्यांमधे तिला पूर्ण आराम पडला होता. त्यानंतर तिचं येणं एक २-३ वेळा इतकंच झालं होतं काही तात्कालिक किरकोळ कारणांसाठी. त्या दिवशी आलेली रोहिणी मात्र कोणी वेगळीच व्यक्ती असावी इतके बदल तिच्यात जाणवत होते. नेहमी हसत खेळत, प्रसन्न चेहऱ्याने कॅबिनमधे येणारी, 'हाऊ आर यू डॉक्टर?’ अशी माझी प्रथम विचारपूस करणारी, अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व असणारी रोहिणी आज मात्र काही वेगळीच भासत होती. मुख्य म्हणजे आज एकटी न येता इतक्या वर्षात पहिल्यांदा नवऱ्याला बरोबर घेऊन आली होती. त्याहून आश्चर्य म्हणजे तिला होणाऱ्या त्रासांबद्दल ती कमी आणि नवरा अधिक बोलत होता.
“डॉक्टर केवळ तुमच्या समोर बसले आहे. पण मी तुमच्याशी काय बोलतेय हे सुद्धा मला कळत नाहीये. मन, मेंदू बधीर झाल्यासारखं वाटतंय. काय विचार करतेय हे समजत नाहीये. काही आठवत नाही. लक्ष केंद्रित करता येत नाही. मी हरवतेय असं वाटतंय.” -इति रोहिणी.
नवरा ही चांगलाच हादरला होता. “आम्हाला काही समजत नाहीये डॉक्टर. नोकरीमध्ये एवढ्या महत्त्वाच्या पदावर असतानाही घरामधील सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलणारी रोहिणी आताशा फार वेगळीच वागतेय. काल तर ती अचानक घरामधे इतकी रडायला लागली की माझे आई बाबाही घाबरले. तिला कधीच आम्ही अशी पाहिली नाहीये. म्हणून ताबडतोब आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो.”
रोहिणी कडे पाहून आणि त्या दोघांचे बोलणं ऐकत असतानाच गोष्टी माझ्या मनात उलगडत होत्या. तिच्या केस पेपरच्या पहिल्या पानावर गेले. वयाचा रकाना पाहिला. त्यावरील ४० या आकड्याने माझ्या मनातील आराखड्यांना भक्कम केलं.
रोहिणी तिच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या स्थित्यंतरातून जात होती आणि जगभरातील लाखो-करोडो स्त्रियांप्रमाणे ती याबद्दल अनभिज्ञ होती. हे स्थित्यंतर म्हणजे Perimenopause.
काय आहे हे Perimenopause ? Menopause शी त्याचा संबंध आहे का? आणि तो कसा आहे?
काय आहे हे Perimenopause ?
एखादी मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयांमधे(ovaries) स्त्री बीजांचा ठराविक साठा घेऊनच ती जन्माला येते. ही जी स्त्रीबीजं असतात, त्यांची एक विशिष्ट रचना असते. प्रत्येक स्त्रीबीजाभोवती एक कोष असतो ज्याला Follicle असं म्हणतात. मुलगी साधारण १२-१३ वर्षाची झाली की तिची मासिक पाळी सुरू होणं अपेक्षित असतं. त्या वेळेला दर महा साधारण ४-५ स्त्रीबीजं, त्यांच्या भोवतीचा कोष हे वाढायला लागतात. त्यापैकी साधारण एक स्त्रीबीज व कोष हे पूर्ण वाढते, कोष फुटतो आणि त्यातून स्त्रीबीज म्हणजे अंड बाहेर पडतं. या प्रक्रियेला ovulation असं शास्त्रीय भाषेत संबोधलं जातं. या काळात पुरुष बीजाचा संपर्क आल्यास गर्भधारणा राहण्याची संभावना असते. अन्यथा साधारण दोन आठवड्यांनी तिची पुढची पाळी सुरु होते.
या प्रक्रियेमधे आपण पाहिलं की जन्मापासून असणाऱ्या स्त्री बीजांच्या साठ्यामधे क्रमशः घट होत जाते. गर्भधारणा व त्या नंतरचा काही काळ, आजार असे अपवाद वगळता ही प्रक्रिया १२ व्या १३ व्या वर्षापासून अव्याहत सुरु असते. त्यामुळे एक काळ असा येतो की हा स्त्रीबीजांचा साठा संपतो. त्यामुळे ovulation होण बंद होतं आणि पर्यायाने पाळी येणंही बंद होतं. म्हणजे त्या स्त्रीची रजोनिवृत्ती (Menopause) होते.
एखाद्या स्त्रीला सलग १२ महिने पाळी आली नाही की त्यापुढील तेराव्या महिन्यात असं म्हणता येतं की तिचा मेनोपॉज झाला.
आपण पाहिलं की स्त्रीबीजांचा साठा हा हळू हळू कमी होत जातो. स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता चांगल्या दर्जाची असते, तिथून ती कमी होत जात पूर्णपणे संपणे हा जो स्थित्यंतराचा काळ आहे त्याला Perimenopause ही संज्ञा आहे.
पेरीमेनोपॉजशी संबंधित बदल हे प्रत्येक स्त्री मधे वेगवेगळ्या स्वरूपाचे आणि कमी अधिक काळ दिसून येतात. मेनोपॉजच्या आधी ४-५ वर्ष ते ८-१० वर्ष आधी असाही हा काळ असू शकतो. ५० व्या वर्षी साधारण मेनोपॉज असेल तर ४० व्या वर्षीही हे बदल सुरु होऊ शकतात. रोहिणीच्या बाबतीत हेच घडत होतं आणि याची काही कल्पना नसल्याने सगळा गोंधळ उडाला होता. पन्नाशीच्या आसपास मेनोपॉज होतो हे सर्वज्ञात असलं, तरी पेरीमेनोपाॅजमधील बदल हे इतक्या आधी होऊ शकतात याबाबतची जागरूकता त्यामानाने कमी आहे. मात्र प्रश्न असा की हे बदल जर स्त्री प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत, तर त्याचा रोहिणी मधे दिसणाऱ्या या मानसिक लक्षणांशी काय संबंध? या व्यतिरिक्त कोणती लक्षणे निर्माण होतात का? आणि कोणती ? असे स्वाभाविक प्रश्न मनात येऊ शकतात की जे राहिणीचे ही प्रश्न होते.
पेरीमेनोपॉजमध्ये नक्की होतं काय?
Ovulation च्या प्रक्रियेबद्दल जी माहिती आपण घेतली, त्या संबंधातील एक महत्त्वाचा तपशील असा आहे की (ovaries ) अंडाशयांमधे Estrogen, Progesterone या संप्रेरकांची निर्मिती ही या काळात होत असते. Perimenopause च्या काळात जसा ovulation च्या प्रक्रियेमधे खंड पडतो, तशी ही संप्रेरकाची निर्मितीही कमी होत जाते आणि रजोनिवृत्ति म्हणजे मेनोपॉजनंतर ती ओव्हरीजकडून निर्मिती होणं पूर्णतः थांबते.
महत्वाचा मुद्दा इथे असा आहे, की या संप्रेरकांचे, मुख्यतः Estrogen चे कार्य हे ovulation पुरते मर्यादित नसते. शरीरामधे अनेक ठिकाणी Estrogen चे receptors हे विविध पेशींमधे असतात. म्हणजे त्या विविध पेशींमधे, अवयवांमधे Estrogen पोहचणं अपेक्षित असतं जेणेकरून त्या अवयवांचं, Tissues च काम सुरळीत राहू शकतं Perimenopause, Menopause च्या काळात झालेल्या Estrogen च्या कमतरतेमुळे या विविध अवयवांच्या कार्यातही बिघाड होतो. त्यामुळे साधारणतः ३० पेक्षा अधिक लक्षणं स्त्रियांमधे निर्माण होऊ शकतात.
कुठे कुठे असतात हे Estrogen चे Receptors ? कुठे काम होणं अपेक्षित असतं ? उदाहरणादाखल पहायचं झालं, तर त्वचा मेंदू, हृदय,फुप्फुस, हाडं, तोंडाच्या आतील भाग (salivary glands) पचन संस्था, मुत्राशय, गर्भाशय, अंडाशय, स्तन अशा विविध ठिकाणी Estrogen चं काम होणं अपेक्षित असतं आणि Estrogen च्या निर्माण झालेल्या या कमतरतेमुळे शारीरीक आण मानसिक स्तरांवर ३० प्रकारची लक्षणं निर्माण होऊ शकतात.
आणि यासाऱ्यावर आयुर्वेदिक उपचार केल्यास आपण हे त्रास कमी करु शकतो. मात्र गरज असते ती योग्य माहितीची..
करायचं काय? वाचूया पुढच्या भागात..
(क्रमश:)
