Lokmat Sakhi >Health >Menopause > मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

रजोनिवृत्ती आलेल्या अनेक महिलांना बर्निंग माउथ सिंड्रोम अर्थात तोंडात जळजळ होण्याची समस्या जाणवते. या समस्येनं घाबरुन न जाता डाॅक्टर या समस्येबद्दल काय म्हणतात हे समजून घेणं महत्त्वाचं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 09:10 PM2022-01-08T21:10:40+5:302022-01-10T11:59:24+5:30

रजोनिवृत्ती आलेल्या अनेक महिलांना बर्निंग माउथ सिंड्रोम अर्थात तोंडात जळजळ होण्याची समस्या जाणवते. या समस्येनं घाबरुन न जाता डाॅक्टर या समस्येबद्दल काय म्हणतात हे समजून घेणं महत्त्वाचं !

Burning Mouth Syndrome Occurs in Menopausal Women .Is It a Serious Illness? What do experts say Narika | मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

मेनोपाॅज आलेल्या महिलांन होतो बर्निंग माउथ सिंड्रोम.. हा गंभीर आजार आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

Highlightsबर्निंग माउथ सिंड्रोम ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमधे अधिक जाणवते.रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमधे काही विशिष्ट  हार्मोन्सची पातळी कमी झाल्यानं ही समस्या जाणवते.बर्निंग माउथ सिंड्रोमचे दोन प्रकार आहे. या प्रकारांप्रमाणे या समस्येवर उपचार केले जातात. 

'अमेरिकन ॲकॅदमी ऑफ ओरल मेडिसिन' या संस्थेने केलेला अभ्यास सांगतो, की तोंडाची जळजळ ( ज्याला स्थानिक भाषेत तोंड येणं असं म्हणतात) आणि वैद्यकीय भाषेत 'बर्निंग माउथ सिन्ड्रोम ही समस्या एकूण लोकसंख्येच्या  प्रमाणात 2 टक्के लोकांमधे आढळतो. महिलांच्या बाबतीत ही समस्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळते. गुणोत्तरीय भाषेत हे प्रमाण 7: 1 आहे. तोंडाच्या आतील पातळ त्वचेवर होणारी जळजळ, आग ही बर्निंग माउथ सिन्ड्रोम या नावाने ओळखली जाते. 

स्त्रियांच्या बाबतीत ही समस्या विशेषत: रजोनिवृत्तीच्या काळात/ रजोनिवृत्तीनंतर विशिष्ट हार्मोन्सची पातळी कमी झाल्यानं तोंडात लाळ स्त्रवण्याचं प्रमाण् कमी झाल्यामुळे जाणवते. यामुळे तोंडात धातूसारखी चव ( खारट स्वरुपाची) असते आणि तोंडाच्या आतील भागात आग होण्याची जाणीव होते. रजोनिवृत्ती आलेल्या काही महिलांच्या बाबतीत त्यांच्यातील वेदनांची जाणीव तीव्र झालेली आढळते. तोंडात जळजळ होण्याची जाणीव ही मध्यम किंवा तीव्र स्वरुपात जाणवते.  या जाणिवेचं वर्णन काहीजणी एकदम तिखट खाल्ल्यानंतर जसं तोंड भाजतं किंवा  तोंडात अगदी गरम पदार्थ खाल्ल्यानंत जी तोंड भाजल्याची जाणीव  होते या शब्दात करतात.  हा त्रास ज्यांना मध्यम स्वरुपात जाणवतो त्यांच्याबाबतीत तोंडात सुन्नपणा जाणवतो.  हा त्रास प्रामुख्याने 50 ते 70 च्या वयोगटातील स्त्रियांना जाणवतो. 

Image: Google

प्राथमिक स्वरुपाचा बर्निंग माउथ सिंड्रोम

ही समस्या अपरिहार्य/ अनाकलनीय म्हणून ओळखली जाते. या प्रकारात तोंडात जळजळ का होते याचं कारण शोधता येत नाही. तोंडाची आग होणं हे अनेक समस्या किंवा आजरांचं लक्षण असतं. 

का होते तोंडाची आग?

तोंडाची आग होण्याच्या कारणाचं निदान करणं हे गुंतागुंतीचं ठरतं. नेमक्या कारणाचं निदान होण्यासाठी डाॅक्टर काही तपासण्या करण्यास सांगतात.
 * रक्त तपासणी सीबीसी, रक्तातील ग्लुकोज, थायराॅइड 

* तोंडातील द्राव तपासणी

* ॲलर्जी टेस्ट 

* लाळ स्त्रवण्याची तपासणी

या तपासण्यातून जर एखाद्या अवयवासंबंधीशी निगडित, स्थानिक किंवा शरीरातील यंत्रणेशी संबंधित कारण आढळलं नाही तर तोंडातील ही जळजळ ही समस्या म्हणजे प्राथमिक स्वरुपाचा बर्निंग माउथ सिंड्रोम आहे असं निदान केलं जातं. 

Image: Google

रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमधील तोंडाची जळजळ

रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमधील 18 ते 33 टक्के महिलांमधे ही तोंडाची जळजळ होण्याची  समस्या जाणवते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे तोंडात जळजळ होण्याची समस्या महिलांमधे जाणवते. इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी झाल्याने तोंडात लाळ कमी स्त्रवते. धातुसारखी खारट आंबट अशी मिश्र चव तोंडात घोळत असते आणि तोंडातील आतील भागात जळजळ जाणवते. यासोबतच काहीजणींची वेदनांची संवेदनशीलता वाढते.  

प्रामुख्याने प्राथमिक बर्निंग माउथ सिंड्रोममधे जीभेच्या टोकावर, ओठांना, जिभेच्या कडांना आणि टाळूला आग जाणवते. सकाळच्या वेळी तोंडात जळजळ कमी जाणवते. पण जेवल्यानंतर आणि जसजसा दिवस सरतो, संध्याकाळ होते तशी तोंडातील आगीची समस्या जास्त जाणवते. ही समस्या गरम पदार्थ खाल्ल्याने, जास्त बोलल्याणे आणि ताण जास्त घेतल्याने वाढते. रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमधे जाणवणाऱ्या या समस्येवर हार्मोनल रिप्लेसमेण्ट थेरपी करुन हा त्रास कमी करता येऊ शकतो. पण त्याबाबत आणखी संशोधन होण्याची गरज असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. 

Image: Google

तोंडातील जळजळीच्या समस्येची दुय्यम कारणं

या प्रकारच्या तोंडाच्या जळजळीच्या समस्येत कारण नेमकं काय आहे हे सांगता येतं. 

* हार्मोन्स बदलणं

* तोंड कोरडं पडणं

* विशिष्ट औषधं घेणं

* शरीरात लोह, झिंक किंवा ब जीवनसत्त्व यासारख्या  पोषण घटकांची कमतरता 

* तोंडातील संसर्ग

* पित्त वाढणं

* लिचेन प्लानस हा तोंडातील बुरशीजन्य आजार

या दुय्यम स्वरुपाच्या तोंडाच्या जळजळीवर उपचार करताना नेमकं यामागचं कारण काय आहे हे बघून औषधं दिली जातात. उपचार सूचवले जातात. तोंडाच्या जळजळीला तोंडातील कोरडेपणा हे कारण कारणीभूत असल्यास तोंडात लाळ जास्त स्त्रवण्यासाठी म्हणून जीवनास्त्त्वांच्या सप्लीमेण्टस दिल्या जातात. पित्त वाढणं हे कारण असल्यास पोटातील आम्ल हे सामान्य पातळीवर आणण्यासाठी म्हणून औषधं दिली जातात.  बुरशीजन्य संसर्ग हे कारण असल्यास मलम अथवा बुरशीविरोधी औषधं दिली जातात.  

रजोनिवृत्तीत होणाऱ्या तोंडाच्या जळजळीवर उपाय काय?

1. बर्फाचे तुकडे चोखणे

2. थंड पाणी आणि घरगुती सरबतांसारखे थंडं द्रवपदार्थ पिणे.

3. एकदम गरम आणि अतिशय तिखट पदार्थ खाणं टाळणं.

4. ज्या पदार्थात आणि पेयांमधे ॲसिडचं प्रमाण जास्त असतं ते पदार्थ आणि पेय टाळणे. जसे आंबट फळं, साॅफ्ट ड्रिंक्स आणि काॅॅफी .

5. अल्कोहोल आणि तंबाखूयुक्त् पदार्थ टाळणं.

6. ज्या औषधांमधे अक्लोहोल असतं अशी औषधं न घेणं.

Image: Google

उपचार काय?

रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमधे जाणवणाऱ्या तोंडाच्या जळजळीवर जसे काही उपाय तज्ज्ञ सूचवतात तसेच काही उपचारही केले जातात. 

1.  तोंड कोरडं पडणार नाही म्हणून तोंडात लाळ निर्माण करणारी औषधं दिली जातात.

2.  लोह, झिंक आणि ब जीवनसत्त्वांची कमतरता भरुन काढण्यासाठी सप्लिमेण्टस दिल्या जातात. 

3. तोंडातील आग कमी होण्यासाठी मलम दिले जातात.

4. ताण आणि भिती या मानसिक समस्येंवरची औषधं देऊन तोंडातील आग कमी केली जाते.

5. टूथपेस्ट बदलण्यास सांगितलं जातं किंवा तोंड धुतांना बेकिंग सोड्याचा उपयोग करायला सांगितलं जातं. 

6. ताण घालवण्यासाठी योग करण्यास सूचवलं जातं. 

जर डाॅक्टरांना तोंडातील जळजळीमागे काही विशिष्ट कारण आहे असं वाटल्यास वर सांगितलेल्या उपचारांव्यतिरिक्त ते उपचार आणि औषधं यात बदल करु शकतात.
तोंडात जळजळ होणे हे खूप घातक, गंभीर नसतं त्याचा  कर्करोगाशी संबंध नसतो त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ या समस्येत रुग्णांना घाबरुन न जाण्याचा सल्ला देतात. तोंडातील जळजळ का होते हे बघून डाॅक्टर औषधं देतात आणि ही औषधं घेऊन हा त्रास कमी होतो. 

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार: डाॅ. प्रीती देशपांडे एम.एस. (OBGY), एफआयसीओजी, एन्डोस्कोपी ट्रेनिंग IRCAD (फ्रान्स) 


 

Web Title: Burning Mouth Syndrome Occurs in Menopausal Women .Is It a Serious Illness? What do experts say Narika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.