डॉ. तनुजा रवींद्र ब्राह्मणकर
MBBS MD Community Medicine.
“मी फक्त साधा खोकला असेल म्हणून दुर्लक्ष केलं, पण जेव्हा माझं वजन झपाट्याने कमी होऊ लागलं, रात्री घाम येऊ लागला आणि सतत थकल्यासारखं वाटू लागलं, तेव्हा डॉक्टरांकडे गेलो. तिथे कळलं की माझ्या फुफ्फुसांमध्ये टीबी आहे!” – हा अनुभव आहे एका तरुणाचा. जो आज बरा झाला आहे, पण फक्त योग्यवेळी निदान आणि उपचार घेतल्यामुळेच! ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही. भारतात दरवर्षी लाखो लोकांना टीबी होतो. योग्य उपचार आणि जनजागृती केल्यास आपण हा आजार पूर्णपणे नष्ट करू शकतो. यासाठीच २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.(Know all about symptoms, causes, risks and treatment options for tuberculosis)
टीबी म्हणजे काय?
क्षयरोग (टीबी) हा एक संसर्गजन्य रोग आहे जो Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होतो. मुख्यतः तो फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण शरीराच्या इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. टीबी मुख्यतः हवेच्या माध्यमातून पसरतो. जर एखादा संसर्गित व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर टीबीचे जीवाणू हवेत पसरतात आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात.
टीबीची लक्षणे कोणती?
१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येणे
२. वजन झपाट्याने कमी होणे
३. रात्री घाम येणे आणि ताप येणे
४. थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
५. भूक न लागणे आणि छातीमध्ये वेदना होणे
ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या!
टीबीचे निदान कसे करावे?
१. CBNAAT चाचणी: टीबीचे जलद आणि अचूक निदान करणारी चाचणी, जी औषध-प्रतिरोधकतेची माहिती देखील देते.
२. Truenat टेस्ट: ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणारी टीबी निदान चाचणी.
३. एक्स-रे आणि स्पुटम टेस्ट: पारंपरिक पण अद्यापही महत्त्वाच्या चाचण्या.
टीबी निर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?
१. लवकर निदान आणि उपचार घ्या.
२. औषधोपचार पूर्ण करा, कोर्स अर्धवट सोडू नका.
३. सार्वजनिक ठिकाणी खोकताना / शिंकताना तोंड झाका.
४. योग्य पोषण आणि स्वच्छतेची काळजी घ्या.
५. टीबीविषयी जनजागृती करा आणि ‘निक्षय मित्र’ बना.
क्षयरोगावर प्रभावी उपचार
🔹 DOTS (Directly Observed Treatment, Short-course): WHO मान्यताप्राप्त उपचार पद्धती, ज्यात रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली औषध दिले जाते, जेणेकरून उपचार नियमित होतील आणि टीबी पूर्ण बरा होईल.
🔹 MDR-TB साठी नवीन औषधे: बेडाक्विलिन आणि डेलामानिड या नवीन औषधांमुळे औषध- प्रतिरोधक टीबीवर प्रभावी उपचार शक्य.
टीबी निर्मूलनासाठी भारत सरकारचे प्रयत्न
१. निक्षय पोषण योजना: टीबी रुग्णांना दरमहा ₹५०० आर्थिक मदत, जेणेकरून ते पौष्टिक आहार घेऊ शकतील.
२. निक्षय मित्र योजना: सामान्य नागरिक, संस्था किंवा उद्योगसमूहांनी टीबी रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे.
३. १००-दिवसीय टीबी निर्मूलन मोहीम: सक्रिय प्रकरण शोध, जनजागृती आणि समुदाय सहभाग वाढवण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम.
२०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत – एक संकल्प
भारताने २०२५ पर्यंत टीबी मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सरकार, आरोग्य क्षेत्र आणि नागरिकांच्या सहभागातूनच हे साध्य होऊ शकते. चला, टीबीमुक्त भारतासाठी हातात हात घालून पुढे जाऊया!
'टीबी हरेल, भारत जिंकेल!'