Join us

World No Tobacco Day 2025 : संसार मोडू शकते तंबाखू आणि सिगरेट, लैंगिक क्षमताही होते कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 18:18 IST

World No Tobacco Day 2025 : : केवळ श्वसनाचे आजार नाही तर लैंगिक समस्याही तंबाखू आणि सिगरेटच्या व्यसनाने होतात.

ठळक मुद्दे पहिल्यांदा मौज म्हणून नंतर सवय म्हणून खात असलेली तंबाखू किंवा ओढत असलेली सिगरेट सोडा. कायमची!

डॉ. रोहित गणोरकर

दोन महिन्यांपूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये एक ४० वर्षाचे गृहस्थ आले होते. काय त्रास होतोय विचारल्यावर म्हणाले कमजोरी वाटते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहता त्यांना भरपूर सांगायचं तर आहे पण सांगताही येत नाही असं भासत होतं. पण संभाषण सुरु झालं आणि ते अर्धा तास त्यांच्या लैंगिक समस्या व त्यामुळे वैवाहिक जीवनात झालेला त्रास याबद्दल व्यक्त झाले. काही महिन्यांपासून लिंग ताठर होतच नाही. त्यामुळे जडीबुटी ते मार्केटमधील जाहिरातीतल्या औषधी हे सर्व वापरून झालं हे त्यांनी सांगितलं. अर्थातच या सोबत न सांगता येणारं नैराश्य म्हणजे डिप्रेशनची सुद्धा काही लक्षणे होती. योग्य तपासण्या लिहून देताना मी त्यांना तंबाखू सेवनाबद्दल विचारले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते रोज ३- ४ वेळा तंबाखू खात होते आणि मित्रांसोबत १ ते २ सिगारेट ओढत होते. अर्थातच शनिवार व रविवारी सिगरेट ४- ६ होत होत्या आणि कामाचा ताण आला की तंबाखू दिवसातून ६- ७ वेळा तर व्हायचीच!

 

लिंगाची ताठरता कमी होण्यासाठी म्हणजेच Erectile Ddysfunction करता तंबाखू सिगरेट कारणीभूत आहे! हे सांगितल्यावर, पहिल्यांदा तर त्यांना विश्वासच बसला नाही. मी त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नाचिन्ह ओळखले. इतर रुग्णांची रांग पाहून अगदी क्षणाचाही विलंब न करता त्यांना टेबलावरील आकृती दाखवून बोललो की ‘लैंगिक उत्तेजनेनंतर पुरुषाच्या लिंगामध्ये मासपेशींमध्ये ( Corpora Cavernous ) होणाऱ्या अधिक रक्त प्रवाहामुळे लिंगामध्ये ताठरता येत असते. तंबाखूमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्त पुरवठा कमी होतो व ताठरता कमी होते. निकोटीनमुळे, तंबाखू, धूम्रपानामुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढते व रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे लहान रक्तवाहिन्या, जसे की लिंगातील रक्तवाहिन्या, सर्वात आधी प्रभावित होतात. तंबाखू टेस्टोस्टेरोन हार्मोनची पातळी कमी करू शकतो, ज्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. हे सांगून त्यांच्या जुन्या रक्ताच्या रिपोर्ट्सकडे बघत होतो. आणि अशा कितीतरी कमजोरी तंबाखूमुळे आल्या असतील हा विचार करत होतो.

 

आता हे गृहस्थ त्यांच्या तंबाखू सेवनावर विचार करत होते. कॉलेजमध्ये केलेली मौज ते विरंगुळा म्हणून वाढत गेलेली सिगरेट कमी करायची का? अवघड जाईल म्हणून प्रयत्नसुद्धा करू नये ही दुविधा. गृहस्थ तेव्हा याच विचारावर थांबले. चांगली बाब म्हणजे पुढच्या भेटीमध्ये ते स्वत:हून या उपचारासाठी तयार झाले. औषध उपचार, समुपदेशन यामुळे गेली एक महिना तंबाखू व सिगरेटपासून दूर आहेत असं मला ते चार दिवसापूर्वीच्या भेटीमध्ये सांगत होते. कधी कधी सिगरेट घेण्याची आठवण येते व ती कमी कण्यासाठी जुन्या मित्रांना फोन करून बोलण्याचा सल्ला उपयोगी पडतो असे त्यांनी सांगितले.

असे कितीतरी रुग्ण श्वासाचे आजार ते लैंगिक समस्येने पिडीत असतात. तंबाखूचे सेवन हे अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. तंबाखूच्या कळत न कळत फॅशन म्हणून आपल्यावर होणाऱ्या जाहिरातींच्या माऱ्यापलिकडे स्वत:चं आयुष्य जपता येईल का? पहिल्यांदा मौज म्हणून नंतर सवय म्हणून खात असलेली तंबाखू किंवा ओढत असलेली सिगरेट सोडा. कायमची!

(लेखक नायर रुग्णालय मुंबई येथे मानसोपचार विभागामध्ये पदव्योत्तर शिक्षण घेत आहेत.)    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सतंबाखू बंदीलैंगिक आरोग्य