थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. (Winter means joint pain, remember these 5 rules, your body will not get stiff at all)या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावतो. यामुळे सांध्यांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही, त्यामुळे स्नायू, लिगामेंट्स आणि जोडणारे ऊतक घट्ट आणि ताठर होतात. याच अवस्थेला 'सांधे आखडणे' असं म्हणतात. थंड हवेत शरीरातील नैसर्गिक स्नेहन द्रव म्हणजेच joint fluid घट्ट होतो, त्यामुळे सांध्यांची हालचाल सुरळीत होत नाही आणि दुखणे जाणवते. परिणामी, चालताना किंवा उठबस करताना वेदना होतात. थंड वातावरणामुळे लोक कमी हालचाल करतात, व्यायाम टाळतात, ज्यामुळे स्नायू अधिक कमकुवत होतात आणि दुखण्याची तीव्रता वाढते.
थंडीमध्ये सांधेदुखी वाढण्यामागे अनेक कारणं असतात. रक्ताभिसरण कमी होणं, स्नायू ताठ होणं, पाण्याचं प्रमाण घटणं आणि शरीरात उष्णता टिकवण्याच्या प्रयत्नात ऊर्जा खर्च होणं ही प्रमुख कारणं आहेत. काही वेळा जुन्या इजा, संधिवात, किंवा हाडांतील झीज यामुळेही हिवाळ्यात वेदना वाढतात. शरीराच्या स्नायूंना आणि हाडांना पुरेसा उबदारपणा मिळाला नाही, तर हालचाल करताना प्रत्येक सांधा जणू जड वाटू लागतो. यावर उपाय म्हणून सर्वात पहिले शरीर उबदार ठेवणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत गरम कपडे वापरा, विशेषतः गुडघे आणि हात झाकून ठेवा. रात्री झोपताना अंगावर चादर घ्या, पाय झाकलेले ठेवावा. सकाळी उठल्यावर हलका व्यायाम करा. चालणे, योगासनं, स्ट्रेचिंग यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू सैल होतात.
गरम पाण्याने अंघोळ करणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. गरम पाण्यामुळे स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होते. काहींना गरम पाण्याची पिशवी ठेवण्यानेही आराम मिळतो. मात्र सांध्यांमध्ये सूज असेल तर थंड पट्टी उपयोगी ठरते. आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांचा समावेश असणारे पदार्थ घ्या. दूध, दही, तीळ, बदाम हे पदार्थ सांध्यांना बळकटी देतात. थंडीत तहान कमी लागते, पण पाणी पुरेसं पिणं विसरू नका. शरीरातील द्रव कमी झाल्यास सांध्यांतील स्नेहन द्रव घट्ट होतो आणि वेदना वाढतात.
