Frequent Stomach Pain Cause In Women's : आपण पाहिलं असेल की, सामान्यपणे मासिक पाळी असेल किंवा गर्भधारणा असेल अशा स्थितीत महिलांना पोटात तीव्र वेदना होतात. पण या स्थिती नसताना सुद्धा महिलांच्या पोटात अनेकदा वेदना होतात आणि कळा येतात. पण यामागचं कारण जाणून घेण्याचा फार कुणी प्रयत्न करत नाहीत. नेहमीच पोटात दुखत असेल तर ही बाब सामान्य आहे की यामागे काही खोल कारण दडलेले आहे? अनेक वर्षे मेडिकल क्षेत्रासाठी हा एक गूढ प्रश्न होता की गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजेच आतडीशी संबंधित वेदना महिलांमध्येच अधिक का दिसतात? पण आता शास्त्रज्ञांनी या रहस्यावरून पडदा उठवला आहे. एका नव्या संशोधनात असं बायोलॉजिकल कारण समोर आलं आहे, जे महिलांमधील पोटदुखी अधिक तीव्र होण्यास कारणीभूत ठरतं.
एस्ट्रोजेन हार्मोनची महत्त्वाची भूमिका
या अभ्यासात असं स्पष्ट झालं आहे की महिलांमधील तीव्र पोटदुखीमागे मुख्य कारण म्हणजे ‘एस्ट्रोजेन’ हार्मोन. संशोधनानुसार, एस्ट्रोजेन आतडीमधील काही हार्मोन्सचा स्राव वाढवतात. या प्रक्रियेमुळे सेरोटोनिन या रसायनाचं उत्पादन वाढतं. सेरोटोनिन थेट त्या नसांना अधिक संवेदनशील बनवतं, ज्या वेदनेचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात. अशात महिलांना वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात.
संशोधन कसं करण्यात आलं?
हा महत्त्वाचा शोध दक्षिण ऑस्ट्रेलियन हेल्थ अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ येथील संशोधकांनी संयुक्तपणे केलाय. या अभ्यासासाठी नर आणि मादी उंदरांवर तुलनात्मक संशोधन करण्यात आलं. संशोधनात असा एक ‘एस्ट्रोजेन-आधारित मार्ग’ सापडला, जो आतडीना विषारी उत्तेजनांबाबत अधिक संवेदनशील बनवतो.
वेदनांमागील शास्त्रीय प्रक्रिया
संशोधक स्टुअर्ट ब्रिअरली यांनी ही प्रक्रिया सोप्या शब्दांत स्पष्ट केली आहे. एस्ट्रोजेन आतडीमधील एका विशिष्ट मार्गाला सक्रिय करते. यामुळे आतडीमध्ये ‘पीवायवाय’ नावाच्या हार्मोनचा स्राव वाढतो. हे पीवायवाय आजूबाजूच्या सेरोटोनिन तयार करणाऱ्या पेशींना उत्तेजित करतात. अशात सेरोटोनिनचं उत्पादन वाढतं आणि वेदनेचा संदेश मेंदूकडे नेणाऱ्या नसां संवेदनशील होतात.
पचन आणि आतडीतील बॅक्टेरियांचा प्रभाव
या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आपल्या पोटातील बॅक्टेरिया जेव्हा अन्न पचवतात, तेव्हा ‘शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड्स’ तयार होतात. एस्ट्रोजेनच्या उपस्थितीमुळे महिलांची आतडी या आम्लांवर अधिक तीव्र प्रतिक्रिया देतात, ज्यामुळे वेदनेची जाणीव वाढते.
हा अभ्यास मेडिकल विश्वासाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आतापर्यंत महिलांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांशी संबंधित वेदनांचे नेमके कारण स्पष्टपणे समजले नव्हते. या संशोधनामुळे भविष्यात महिलांसाठी अधिक प्रभावी आणि लक्ष केंद्रित उपचार विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
