हातापायाला अचानक मुंग्या सगळ्याच्याच येतात. त्यात काही फार गंभीर अशी गोष्ट नाही. काही वेळा क्षणभराची गोष्ट असते आणि आपोआप निघून जाते, काही वेळा जरा जास्त वेळ लागतो. नखावर जोर देऊन घालवावी लागते. पण ही गोष्ट वारंवार जाणवत असेल तर शरीर काहीतरी सूचक संकेत देत असते. (When you feel tingling in your hands and feet, do this simple exercise quickly. Tingling and heaviness can be signs of these problems )मुंग्या येण्यामागे नसांवर ताण येणे, रक्तपुरवठा नीट न होणे किंवा जीवनसत्त्वांची कमतरता या सारख्या सामान्य समस्या असतात. मात्र त्यांचे रुपांतर गंभीरमध्ये होण्यास वेळ लागत नाही.
अनेकदा आपण एका पोजिशनमध्ये खूप वेळ बसलो किंवा हातावर काहीतरी दाब पडला, तरी नसांवर तात्पुरता ताण येतो आणि त्या जागेतील रक्तपुरवठा कमी होऊन मुंग्या जाणवतात. ही तात्पुरती परिस्थिती असली तरी शरीरातील रक्ताभिसरण कसे चालू आहे याचा तो छोटासा इशारा असू शकतो. विशेषतः सतत संगणकावर काम करणारे, जास्त वेळ वाहन चालवणारे किंवा जास्त वेळ एकाच जागी बसणाऱ्यांना हा त्रास जास्त जाणवतो.
मुंग्या वारंवार येत असतील तर त्या काही अंतर्गत तक्रारींचे लक्षणही असू शकतात. जीवनसत्त्व B12 ची कमी असल्यास हातापायांत वारंवार मुंग्या येणे हे पहिले लक्षण दिसते. तसेच थायरॉईडचे असंतुलन, मधुमेहामुळे नसांवर होणारा परिणाम (न्यूरोपथी), किंवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे यामुळेही ही समस्या कायमस्वरूपी होऊ शकते. कधी कधी ताण, चिंता आणि झोपेची कमतरता यांसारख्या गोष्टीसुद्धा नसांना थकवून टाकतात आणि मुंग्या येऊ लागतात.
या त्रासावर योग्य ती काळजी घेतली तर मोठा फरक जाणवू शकतो. सर्वात आधी शरीर हालते-चालते ठेवणे हे महत्त्वाचे. खूप वेळ बसून काम करत असाल तर दर तासाला दोन मिनिटे का होईना, हात-पाय स्ट्रेच करणे गरजेचे. गरम पाण्याने शेक घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि नसांवरील ताण कमी होतो. आहारात बी १२, बी कॉम्प्लेक्स, लोह आणि ओमेगा-३ असलेले पदार्थ समाविष्ट केल्याने नसांची ताकद वाढते. दिवसातून पुरेसे पाणी पिणे, चालणे, योग आणि सवयींमध्ये हालचाल ठेवणे यामुळे हातापायातील बधीरपणा कमी होतो.
मुंग्या आल्यावर पायाच्या किंवा हाताच्या नखावर नखाने खरवडणे हा अगदी सोपा आणि सामान्य उपाय आहे. तसे करुन मुंग्या जातात. पण जर सारख्या मुंग्या जाणवत असतील तर वेळीच तपासून घ्या. अगदी सामान्य गोष्ट असली तरी शरीर असे संकेत देत असते.
