Join us

जेवणाआधी की नंतर, कोणती आहे पाणी पिण्याची योग्य वेळ? सायन्स आणि आयुर्वेद काय सांगतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:26 IST

Right Time To Drink Water: काही लोक असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी पिऊ नये. अशात ही वेगवेगळी उत्तर ऐकून अनेकांच्या मनात येत असेल की, पाणी प्यावं तर कधी प्यावं? याबाबत अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदातही वेगळी मतं आहेत.

Right Time To Drink Water: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? या प्रश्नाची वेगवेगळी उत्तर आहेत. वेगवेगळ्या गोष्टींचे संदर्भ देऊन लोक वेगवेगळी उत्तरं देतात. कुणी सांगतं की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर कुणी सांगतं की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काही लोक असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी पिऊ नये. एक असाही सूर ऐकायला मिळतो की, जेव्हा तहान लागेल ती पाणी पिण्याची योग्य वेळ. अशात ही वेगवेगळी उत्तर ऐकून अनेकांच्या मनात येत असेल की, पाणी प्यावं तर कधी प्यावं? याबाबत अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदातही वेगळी मतं आहेत. अशात दोघांचा सल्ला समजून घेऊ आणि पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घेऊ.

काय आहे पाणी पिण्याची योग्य वेळ?

अ‍ॅलोपॅथीनुसार पाणी पिण्याची योग्य वेळ

काही डॉक्टर सल्ला देतात की, जेवण आणि पाणी पिण्याचा आपसात काहीच संबंध नाही. मॉडर्न मेडिसिनमध्ये अशी काही मान्यता नाही. एक्सपर्टनुसार, एक व्यक्ती साधारणपणे २५० ग्रॅम ते ३५० ग्रॅम इतकं जेवण करते. आपल्या पोटाची कॅपेसिटी यापेक्षा जास्त असते. त्यामुळे पोटात पाण्यासाठी भरपूर जागा असते. जेव्हा अन्नानं पोट भरतं आणि फुगतं तेव्हा मेंदुला संकेत मिळते की, आता कॅपेसिटी पूर्ण झाली आहे. तेव्हा मेंदू हा संकेत देतो की, आता जेवण बंद केलं पाहिजे. या स्थितीनंतरही १०० ते २०० मिली प्यायल्यावर काही फरक पडत नाही.

आयुर्वेद काय सांगतं?

जेवणाआधी किंवा नंतर पाणी पिण्याबाबत आयुर्वेदात वेगळा सल्ला दिला गेला आहे. आयुर्वेदात असं सांगितलं आहे की, जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. तसेच असंही सांगण्यात आलं आहे की, जेवणाआधी प्यायलेलं पाणी अमृत असतं. जेवणादरम्यान जर गरज पडली तर थोडं पाणी पिता येतं. या पाण्यानं आनंद मिळतो. पण जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिणं काही लोकांसाठी विषासारखं असतं. त्यामुळे जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानं पाणी प्यावं.

जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे नुकसान

आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. कारण जेवण झाल्यावर अन्न पचनासाठी तयार झालेली अग्नि लगेच पाणी प्यायल्यानं शांत होते. ज्यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे अशा समस्या होतात. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पचन तंत्रावर जो प्रभाव पडतो, त्यामुळे लवकर भूक लागू शकते. पुन्हा पुन्हा खाल्ल्यानं लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो. असंही मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच पाणी प्याल तर अन्नातून मिळालेलं न्यूट्रिशन योग्यपणे अब्जॉर्ब होत नाही. 

पाणी पिण्याची योग्य पद्धत

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, जेवणानंतर सामान्यपणे अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं. हा अंतर एक तासाचं असेल तर अधिक फायदा होईल. सोबतच पाणी एक एक घोट घेत प्यावं. ढसाढसा पाणी पिऊ नये. पाणी खाली बसून प्यावं. तेव्हा त्यातील मिनरल्स शरीराला मिळतील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य