आजच्या मोबाइल, संगणक आणि लॅपटॉप रोजच्या रोज तासंतास वापराव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे झाले आहे. डोळे हा पाहण्यासाठी आणि मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणारा अतिशय नाजूक अवयव आहे.(What do you do to keep your eyes healthy? Neglecting it is not right, you must keep your eyes healthy) योग्य सवयी, संतुलित आहार आणि थोडी काळजी घेतली तर डोळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. चष्मा लागणार नाही तसेच दृष्टी कायम मजबूत राहील.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवणे. सतत मोबाइल किंवा लॅपटॉपकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडतात, जळजळ होते आणि दृष्टी धूसर होऊ शकते. पण त्याचा वापर टाळणे सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे काम करताना दर वीस मिनिटांनी वीस सेकंद दूर पाहण्याची सवय लावावी. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि थकवा जाणवत नाही. सलग स्क्रिन पाहू नका. योग्य प्रकाशात वाचन किंवा काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फार कमी किंवा फार जास्त प्रकाशात वाचन केल्यास डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांवर थेट प्रकाश न पडता बाजूने उजेड येईल याची काळजी घ्यावी. रात्री मोबाइल वापरताना स्क्रीनचा ब्राइटनेस कमी ठेवावा.
डोळ्यांसाठी पोषक आहार घेणे अत्यावश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, गाजर, भोपळा, आंबा, पपई यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते, जे दृष्टीसाठी उपयुक्त आहे. बदाम, अक्रोड, जवस, तीळ यामधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स डोळ्यांचा कोरडेपणा कमी करतात. आवळा, संत्री, लिंबू यांसारखी व्हिटॅमिन सीयुक्त फळे डोळ्यांचे संरक्षण करतात. पुरेसे पाणी पिणेही डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डोळे कोरडे पडतात आणि जळजळ होऊ लागते. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरुन डोळ्यांतील ओलावा टिकून राहील.
डोळ्यांची स्वच्छता राखणे ही एक महत्त्वाची सवय आहे. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. धूळ, धूर किंवा प्रदूषण जास्त असलेल्या ठिकाणी जाताना चष्मा वापरणे फायदेशीर ठरते. काजळ, आयलाइनर किंवा इतर सौंदर्यप्रसाधने वापरताना ती स्वच्छ आणि दर्जेदार असावीत याची खात्री करावी. पुरेशी झोप घेणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांची आग, लालसरपणा आणि सूज दिसू शकते. दररोज किमान सात ते आठ तासांची शांत झोप घेतल्यास डोळ्यांना आवश्यक आराम मिळतो. डोळ्यांसाठी साधे व्यायाम करणेही उपयुक्त ठरते. डोळे काही वेळ बंद करून खोल श्वास घेणे, वर-खाली आणि उजवी-डावीकडे डोळे फिरवणे, दूर आणि जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करणे यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात.
नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणेही महत्त्वाचे आहे, विशेषतः डोकेदुखी, डोळ्यांत जळजळ, पाणी येणे किंवा अस्पष्ट दिसणे असे त्रास जाणवत असतील तर. वेळेवर तपासणी केल्यास मोठे आजार टाळता येतात. एकूणच, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत थोडे बदल, संतुलित आहार, योग्य झोप आणि स्क्रीन वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या सवयी अंगीकारल्यास डोळे दीर्घकाळ निरोगी, तेजस्वी आणि कार्यक्षम राहू शकतात.
