आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यात व्हाइट ब्लड सेल्स म्हणजेच पांढर्या रक्तपेशींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. शरीरात जंतुसंसर्ग, विषाणू, बॅक्टेरिया किंवा कोणतेही घटक शिरले की त्यांच्याशी लढण्याचे काम व्हाइट सेल्स करतात. त्यामुळे व्हाइट सेल्स कमी झाल्या की वारंवार आजारी पडणे, थकवा जाणवणे, जखमा उशिरा भरणे अशा तक्रारी वाढतात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेक महिलांमध्ये आणि पुरुषांमध्येही व्हाइट सेल्स कमी होण्याचे प्रमाण वाढताना दिसते.
व्हाइट सेल्स म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. रक्तामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात. त्यातील व्हाइट ब्लड सेल्स किंवा WBC हे शरीराचे संरक्षण करणारे सैनिक मानले जातात. न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, ईओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स असे त्यांचे प्रकार असून प्रत्येकाचा वेगवेगळा कार्यभाग असतो. (What causes low white blood cells and is it life-threatening if they decrease? See the unknown truth about white blood cells)हे सेल्स बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि शरीरातील संसर्ग ओळखून त्यावर हल्ला करतात.
व्हाइट सेल्स वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संतुलित आणि पोषणयुक्त आहार. आहारात प्रथिने पुरेशा प्रमाणात असणे अत्यावश्यक आहे, कारण पेशींची निर्मिती प्रथिनांवर अवलंबून असते. डाळी, कडधान्ये, हरभरा, चणे, मूग, राजमा, दूध, दही, पनीर यांचा समावेश केल्यास व्हाइट सेल्सच्या निर्मितीस मदत होते. महिलांनी प्रथिनांचे स्रोत जाणीवपूर्वक वाढवणे आवश्यक असते.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा पुरवठाही तितकाच गरजेचा आहे. व्हिटॅमिन सी हे व्हाइट सेल्सची कार्यक्षमता वाढवते. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरु, टोमॅटो यांचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन ए आणि इ हे अँटी ऑक्सिडंट्स म्हणून काम करुन पेशींना संरक्षण देतात. गाजर, भोपळा, हिरव्या पालेभाज्या, बदाम, सूर्यफुलाच्या बिया यांचा आहारात समावेश करावा. झिंक आणि आयर्नसारखी खनिजेही व्हाइट सेल्ससाठी महत्त्वाची असतात. तीळ, भोपळ्याच्या बिया, डाळी, बीट, डाळिंब यामधून ही खनिजे मिळतात.
पचनसंस्थेचे आरोग्य चांगले असेल तरच शरीर पोषकद्रव्ये योग्यरीत्या शोषून घेते. त्यामुळे दही, ताक, लोणच्याचे पाणी यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते. साखर, जंक फूड, प्रोसेस्ड पदार्थ यांचे अतिसेवन टाळणे गरजेचे आहे, कारण ते व्हाइट सेल्सची कार्यक्षमता कमी करू शकतात.
मानसिक ताणतणाव सतत राहिल्यास शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढते, जे व्हाइट सेल्स कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ध्यान, श्वसनाचे व्यायाम, छंद जोपासणे या मार्गांनी ताण कमी ठेवणे गरजेचे आहे. तसेच धूम्रपान, मद्यपान यांसारख्या सवयी टाळल्यास प्रतिकारशक्ती अधिक मजबूत राहते.
शेवटी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्हाइट सेल्स कमी असण्यामागे कधी कधी गंभीर कारणेही असू शकतात. वारंवार ताप येणे, संसर्ग लवकर होणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्ततपासणी करणे गरजेचे आहे. योग्य आहार, आरोग्यदायी सवयी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास व्हाइट सेल्स नैसर्गिकरीत्या वाढवता येतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळ मजबूत ठेवता येते.
