शरीरात जीवनसत्त्व ‘के’ (Vitamin K) कमी असल्यास त्याचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत, पण हळूहळू काही ठळक लक्षणे जाणवू लागतात. हे जीवनसत्त्व रक्त गोठण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची कमतरता दुर्लक्षित केली तर गंभीर त्रास होऊ शकतो. शरीरात जीवनसत्त्व के कमी असल्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे रक्तस्त्राव लवकर होणे. छोट्या जखमेतूनही रक्त जास्त वेळ वाहत राहते किंवा लगेच थांबत नाही. काही वेळा नाकातून वारंवार रक्त येणे, हिरड्यांतून रक्तस्राव होणे किंवा दात घासताना रक्त येणे अशी लक्षणे दिसतात.
त्वचेवर कारण नसताना निळसर डाग (ब्रूजेस) पडणे हेही या कमतरतेचे संकेत असू शकतात. अगदी हलक्या धक्क्यानेही अंगावर डाग दिसू लागतात आणि ते बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. अंगावर डाग उठले की ते जाता जात नाहीत. महिलांमध्ये अतिरिक्त मासिक पाळीतील रक्तस्राव हे एक लक्षण असू शकते. तसेच पाळी जास्त दिवस चालणे किंवा अचानक रक्तस्राव वाढणे यामागेही जीवनसत्त्व के कमतरता कारणीभूत असू शकते.
हाडांच्या बाबतीत पाहिले तर जीवनसत्त्व के कमी असल्यास हाडे कमकुवत होणे सुरु होते. वारंवार कंबरदुखी, सांधेदुखी जाणवणे किंवा लहान वयातच हाडे ठिसूळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात. दीर्घकाळ कमतरता राहिल्यास फ्रॅक्चरचा धोका वाढतो. पचनसंस्थेशी संबंधित काही संकेतही दिसू शकतात. पोटातील आतड्यांमधून रक्तस्राव झाल्यास मल काळपट दिसणे किंवा उलटीत रक्ताचे अंश आढळणे ही गंभीर लक्षणे मानली जातात.
काही लोकांमध्ये थकवा, अशक्तपणा किंवा चक्कर येणे ही लक्षणे दिसू शकतात, कारण सतत होणाऱ्या सूक्ष्म रक्तस्रावामुळे शरीरातील रक्ताची पातळी कमी होऊ शकते. जीवनसत्त्व के ची कमतरता प्रामुख्याने पचनाचे विकार, दीर्घकाळ अँटी बायोटिक्सचा वापर, यकृताचे आजार किंवा अति फॅट कमी असलेला आहार यामुळे दिसून येते. अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. रक्ततपासणी जीवनसत्त्व के ची पातळी तपासून योग्य उपचार आणि आहारातील बदल केल्यास ही कमतरता सहज भरून काढता येते.
