छातीत जळजळ होणे हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अतिशय सामान्य त्रास झाला आहे. जळजळ होते म्हणजे नक्की काय ? ही समस्या Acidity किंवा Heartburn चा परिणाम असते. साधारणपणे पोटातील आम्ल (acid) मध्येच अन्ननलिकेत वरच्या दिशेने फिरते, असे अचानक पित्त वर आल्यामुळे ही जळजळ जाणवते. (verything causes heartburn? Avoid habits that increase acidity problems and try these home remedies)जेवणानंतर छातीच्या मध्यभागी किंवा घशापर्यंत जळजळ होणे हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. अशी जळजळ सतत जाणवली किंवा छातीत दुखायला लागले की घाबरायला होते. मात्र त्याचे कारण पित्तही असू शकते.
या समस्येची मुख्य कारणे म्हणजे अयोग्य आहार, चुकीच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली. अतितिखट, मसालेदार, तळलेले किंवा तेलकट पदार्थ वारंवार खाणे, जेवणाची वेळ चुकवणे, खूप उशिरा जेवणे, आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे या गोष्टींमुळे पचनावर परिणाम होतो. तसेच चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, मद्यपान, किंवा जास्त प्रमाणात फास्टफूड खाल्याने आम्लपित्त वाढवते. काही जणांना ताणतणाव, झोपेची कमतरता आणि धूम्रपान यामुळेही हा त्रास होतो. शरीरात तयार होणारे आम्ल जेव्हा अन्ननलिकेपर्यंत पोहोचते, तेव्हा छातीत त्रास सुरु होतो आणि त्यामुळे छातीत तीव्र जळजळ जाणवते. काही वेळा पोट फुगणे, ढेकर येणे, तोंडात आंबटपणा जाणवणे ही लक्षणेही दिसतात.
या त्रासावर काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
१. कोमट पाण्यात थोडा गूळ आणि एक चमचा साजूक तूप घालून प्यायल्यास आराम मिळतो.
२. थंड दूध, ताक किंवा बडीशेपेचे पाणी घेतल्याने आम्लपित्त कमी होते.
३. एक चमचा जिरे, ओवा आणि बडीशेप उकळून घ्ययाचे आणि ते पाणी दिवसातून दोनदा प्यायचे नक्की फायदा होतो.
४. आहारात केळी, सफरचंद, ओट्स, दही यांसारखे हलके पदार्थांचा समावेश करा.
५. जेवल्यानंतर लगेच आडवे पडू नये, किमान अर्धा तास चालणे किंवा बसून राहणे योग्य ठरते.
६. रात्री झोपण्यापूर्वी पचायला जड पदार्थ खाऊ नका. मसालेदार आणि तिखट पदार्थ टाळावेत. रात्री पचनास हलके असेच पदार्थ खा.
आहारातील आणि जीवनशैलीतील साधे बदल छातीत होणारी जळजळ कमी करतात आणि पचन सुधारते. वारंवार त्रास होत असल्यास मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण सतत आम्लपित्ताचा त्रास होणे हे मोठ्या आजाराचे लक्षणही असू शकते.