Join us

वटपौर्णिमा : वड पुजताना लक्षात ठेवा वडाविषयी ६ महत्वाच्या गोष्टी, जगण्याचं बळ आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2023 12:18 IST

Vatpornima Banyan Tree Vad Importance : धार्मिकतेबरोबरच शास्त्रीय कारणं समजून घ्यायला हवी...

वटपौर्णिमेला महिला भक्तीभावाने वडाची पूजा करतात. यामागे बऱ्याच दंतकथा असून या प्रत्येक कथेमध्ये या वृक्षाच्या पूजेचे महत्त्व सांगितले जाते. भारतीय परंपरेत वड अत्यंत महत्त्वाचा वृक्ष समजला जातो. कल्पतरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व देऊन त्याची पूजा यानिमित्ताने केली जाते. वड म्हटलं की, भलामोठा वृक्ष डोळ्यासमोर येतो. लांबलचक पारंब्या हे या वृक्षाचे वेगळेपण असल्याने तो ओळखणेही अतिशय सोपे असते (Vatpornima Banyan Tree Vad Importance).

पारंब्या म्हणजे वटवृक्षाची मुळेच असतात. ही मुळे जमिनीपर्यंत वाढतात आणि एखाद्या जाडसर खांबाप्रमाणे दिसतात. झाडाचे खोड ज्याप्रमाणे झाड आपल्या डोक्यावर घेऊन उभे असते त्याचप्रमाणे झाडा आधार देण्याचे काम ही मुळे करतात. या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन असे म्हटले जाते. त्याला हे नाव ब्रिटिशांनी दिले. व्यापारी लोक म्हणजे बनिया या झाडाखाली व्यापार करत असत, त्यामुळे या झाडाला बनियन असे नाव मिळाले. भारतीय परंपरेमध्ये या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. हा इच्छा पूर्ण करणारा अमरत्व देणारा वृक्ष असल्याची भावना भारतीय लोकांची आहे. त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. 

(Image : Google)

आरोग्यासाठी वडाच्या झाडाचे फायदे

१. भारतीय परंपरेतील प्राचीन वृक्ष असलेला वड हा सदाहरित भव्य दिव्य असा वृक्ष आहे. हा वृक्ष दिवसा आणि रात्रीही प्राणवायूचे उत्सर्जन करतो. हवेच्या शुद्धीकरणासाठी हे झाड अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे या झाडापाशी बसण्याला, वावरण्याला विशेष अर्थ आहे. ग्रामीण भागात आजही आवर्जून वडाच्या पारापाशी भेटण्याची रीत आहे.  

२. वडाच्या झाडाचे सर्वच भाग औषधी आहेत. झाडाची साल आणि पानांना फुटणाऱ्या चिकाचा उपयोग जुलाब थांबविण्यासाठी केला जातो. 

३. विविध कारणांनी स्नायू दुखण्याची समस्या उद्भवते. हे दुखणे कमी करण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग केला जातो.

४. उन्हाळ्याच्या काळात येणारे गळू, त्वचेचे विकार, अल्सर आणि दुखावलेल्या उतींवर औषध म्हणून या वृक्षाचा वापर होतो. 

५. वडाचे फळ सूज आलेल्या भागावर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते. किंवा वेदनांपासून आराम मिळण्यासाठी देखील वापरतात. वडाच्या कोवळ्या पारंब्या स्त्रियांच्या वंधत्व उपचारांवर अतिशय उपयुक्त आहेत. 

६. वडाच्या पारंब्यांनी दात घासले तर दात दुखी जाते आणि हिरड्यांचे विकार देखील दूर होतात. हल्ली अतिशय कमी वयात दातदुखीच्या समस्यांनी हैराण असलेली मुलं आपण पाहतो. पूर्वी अशाप्रकारे या पारंब्यांचा वापर केला जात असल्याने त्या लोकांचे दात जास्त मजबूत होते असे म्हटले जाते. 

(माहिती सौजन्य - श्रीकीशन काळे)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सइनडोअर प्लाण्ट्स