लसूण आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पण औषधी गुणधर्मांनी भरलेले एक महत्वाचा घटक आहे. आहारात लसूण असावा. फोडणी, भाजी, आमटी आदी करताना त्यात आपण लसूण घालतोच. मात्र लसणाचे तेल किंवा ठेचलेला कच्चा लसूण खाणेही आरोग्यासाठी फायद्याचे असते. (Use a clove of garlic in this way, you will get quick relief from cold and cough , home remedies )लसणामध्ये अलिसिन नावाचे एक विशेष घटक असते, लसणाला येणारा तीव्र वास याच घटकाचा असतो. आरोग्यासाठी तो घटक फार फायद्याचा असतो. याशिवाय जीवनसत्त्व 'सी', अँटी ऑक्सिडंट्स, सल्फर संयुगे आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म लसणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला संक्रमणाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते.
खोकला आणि सर्दीवर लसूण अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यातील प्रतिजैविक गुणधर्म विषाणू आणि जीवाणूंना नष्ट करण्यात मदत करतात. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा कालावधी कमी होतो. लसूण श्वसनमार्गात अडकलेला कफ विरघळवतो, घशातील खवखव कमी करतो आणि श्वसनास मदत करतो. गरम तुपात परतलेला लसूण खाल्ल्यास खोकला आटोक्यात येतो. गरम पाण्यात लसूण उकळून त्याचा वाफ घेतल्यास श्वसननलिका स्वच्छ होते व श्वास घेण्यास सोपे जाते. सर्दी झाल्यावर एखादा लसूण चाऊन खा. जरा तिखट लागतो मात्र त्यामुळे सर्दी विरघळायला मदत होते. लसणातील उष्णता सर्दी खोकल्यावर प्रभावी ठरते. हा उपाय नक्की करुन पाहा.
लसणाचे फायदे केवळ सर्दी-खोकल्यापुरते मर्यादित नाहीत. तो हृदयाचे आरोग्य सुधारतो, रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. लसूण वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतो. ज्यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात. पचनक्रियेसाठी तो उपयुक्त ठरतो कारण भूक वाढवतो. अपचन व गॅस कमी करतो. त्वचेसाठीही लसूण फायदेशीर असून त्यातील जंतुनाशक गुणधर्म त्वचेवरील संसर्ग रोखतात आणि त्वचा निरोगी ठेवतात.
लसूण आरोग्यासाठी अमूल्य ठरतो, परंतु त्याचा वापर मर्यादेत केला पाहिजे. अति खाल्ल्यास आम्लपित्त, पोटदुखी किंवा तोंडाला दुर्गंध येऊ शकतो. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरल्यास लसूण खरोखरच खोकला, सर्दी आणि इतर अनेक आजारांवर प्रभावी उपाय ठरतो.