एकदा शिंका आली की थांबतच नाही पुन्हा येते असे तुम्हालाही होते का? सारख्या शिंका येणे साधारणपणे धुळीमुळे होते. वातावरणामुळे , मातीमुळे सारख्या शिंका येतात. सर्दीमुळे शिंका येतात. पण प्रत्यक्षात शिंक येण्यामागे फक्त धूळच कारणीभूत नसते. शरीरातील वेगवेगळ्या प्रतिक्रिया, वातावरणातील बदल आणि काही सवयी यामुळेही हा त्रास होऊ शकतो. ऍलर्जी हे वारंवार शिंका येण्यामागचे सर्वात सामान्य कारण आहे. (Two or three sneezes in a row? Don't ignore, it could be other illnesses such as these)धूळ, माती, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी किंवा घरातील इतरही काही प्राणी यामुळे नाकाच्या आतल्या भागाला त्रास होते. शरीर याला परक्या घटकांप्रमाणेच ओळखते आणि संरक्षणासाठी शिंक येते. अशा वेळी नाक खाजणे, पाणी येणे, डोळे पाणावणे ही लक्षणेही दिसतात.
हवामानातील बदल हेही मोठे कारण ठरु शकते. थंडी, अचानक उष्णतेतून एसीच्या गार हवेत जाणे किंवा पावसाळ्यातील दमट वातावरण यामुळे नाकातील श्लेष्मल त्वचा संवेदनशील होते. त्यामुळे कोणतीही ऍलर्जी नसतानाही शिंका येऊ शकतात. याला नॉन-ऍलर्जिक राइनायटिस असेही म्हणतात.
सर्दी, सायनस किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळेही शिंका येतात. शरीरातील जंतुसंसर्ग बाहेर टाकण्यासाठी ही नैसर्गिक प्रक्रिया असते. अशा वेळी घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोके दुखणे यासारखी लक्षणे दिसतात. हा त्रास काही दिवस टिकतो आणि नंतर कमी होतो. काही लोकांना तीव्र वासामुळे शिंका येतात. परफ्युम, अगरबत्ती, धूर, धूम्रपानाचा वास किंवा रसायनांचा गंध नाकाला त्रास देतो आणि त्यामुळे लगेच शिंक येते. हा त्रास ऍलर्जीमुळे नसतो, पण नाकाच्या संवेदनशीलतेमुळे होतो.
कोरडी हवा किंवा नाकातील कोरडेपणा हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हिवाळ्यात किंवा एसीच्या वापरामुळे नाकातील ओलावा कमी होतो. त्यामुळे नाकाची आतली त्वचा कोरडी पडते आणि लहानशा कणामुळेही शिंका येऊ लागतात. काही वेळा पचनाशी संबंधित कारणेही शिंका येण्यामागे असू शकतात. खूप तिखट, गरम किंवा जड अन्न खाल्ल्यानंतर काही लोकांना शिंका येतात. याला गस्टेटरी राइनायटिस म्हणतात. यात ऍलर्जी नसते, पण शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते. ताणतणाव आणि झोपेचा अभाव यामुळेही शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे नाक आणि श्वसनमार्ग जास्त संवेदनशील होतात आणि वारंवार शिंका येऊ शकतात.
वारंवार शिंका येत असतील आणि त्यासोबत नाक सतत वाहणे, डोळे सुजणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करु नये. योग्य कारण शोधून उपाय केल्यास हा त्रास नियंत्रणात येऊ शकतो. धूळ हे एक कारण असले तरी शिंका येण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
