Heart Disease : जगभरात हृदयरोगामुळे सगळ्यात जास्त जीव जातात. हृदरोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण जास्तीत जास्त केसेसमध्ये यांची माहिती उशीराच मिळते. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढतं किंवा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा लोक खडबडून जागे होतात. पण ही लक्षणं दिसण्याआधीच एक असं लक्षण दिसतं, जे हृदयरोगाचा संकेत देतं. पण त्याकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात.
एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, हृदयरोगाची लक्षणं दिसण्याआधीच तो शरीरात काही वर्षाआधीच विकसित होऊ लागतो आणि याचा संकेतही देतो. चांगली बाब ही आहे की, जर हे संकेत आधीच ओळखले गेले तर हृदयरोग वाढण्यापासून रोखला जाऊ शकतो. अशात हृदयरोगाचा संकेत काय असतो हे पाहुयात.
हृदयरोगाचा पहिला संकेत
जामा नेटवर्क जर्नलवर प्रकाशित रिसर्चनुसार, ज्या लोकांना पुढे जाऊन हृदयासंबंधी समस्या जसे की, हार्ट अॅटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेलिअर झाला, त्यांची फिजिकल अॅक्टिविटी जवळपास १२ वर्षांआधीच कमी होऊ लागली होती. याचा अर्थ हृदयरोगांचा धोका वाढण्याच्या एक दशकाआधीच शरीरात बदल होणं सुरू होतो.
या रिसर्चमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त वयस्कांचं त्यांच्या २० ते ३० वयापासून ट्रॅकिंग करण्यात आलं. यातून असं आढळून आलं की, ज्या लोकांना पुढे जाऊन हृदयरोग झाला, त्यांची फिजिकल अॅक्टिविटी इतरांच्या तुलनेत खूप आधीपासूनच कमी होऊ लागली. खासकरून आजाराची माहिती मिळण्याच्या जवळपास २ वर्षाआधी फिजिकल अॅक्टिविटी वेगानं कमी होते.
हृदयरोगाचे सुरूवातीचे संकेत
- जर एखादं सामान्य काम केलं तरी थकवा, कमजोरी जाणवते, पायऱ्या चढताना श्वास भरून येत असेल तर हा हृदय कमजोर झाल्याचा संकेत असू शकतो.
- छातीत नेहमीच जडपणा, दबाव, जळजळ किंवा वेदना जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये.
- जर हृदयाचे ठोके अचानक वाढले असतील किंवा अनियमित होत असतील हा हृदयरोगाचा इशारा असू शकतो.
- जेव्हा हृदय योग्यपणे रक्त पंप करू शकत नसेल तर पायांवर सूज येते.
- कमी वेळात अचानक वजन जास्त वाढलं असेल तर हा हृदयात बिघाड असल्याचा संकेत असू शकतो.
हृदय निरोगी कसं ठेवाल?
- रोज किमान ३० ते ४५ मिनिटं व्यायाम करा. त्यात सायकलिंग, रनिंग, वॉकिंग यांचा समावेश करू शकता.
- आहारात ताजी फळं, पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश करा. प्रोसेस्ड फूड आणि जास्त मीठ टाळा.
- हृदय जर निरोगी आणि फिट ठेवायचं असेल तर स्ट्रेस कमी घ्या. यासाठी मेडिटेशन, योगाची मदत घेऊ शकता.
- ३० वयानंतर नियमितपणे कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हलची टेस्ट करा.