Women's Health : वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. वयाची पस्तीशी हा सगळ्यांसाठीच महत्वाचा टप्पा असतो. मग ते पुरूष असो वा महिला. खासकरून महिलांच्या शरीरात या वयात बरेच बदल होतात. ज्यांचा फार विचार केला जात नाही म्हणा किंवा त्यांकडे लक्ष दिलं जात नाही. महिलांच्या शरीरात हळूहळू काही बदल दिसू लागतात. हे बदल अचानक होत नाहीत, पण काळानुसार जाणवू लागतात. अनेकदा या गोष्टींबद्दल उघडपणे चर्चा होत नाही, त्यामुळे अनेक महिलांना शरीरात नेमके काय बदल होत आहेत हे समजत नाही. चला, या बदलांबद्दल जाणून घेऊया.
मूड बदलू लागतो
पस्तीशीनंतर महिलांच्या शरीरात सर्वप्रथम हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतो. शरीरातील अॅस्ट्रोजन हार्मोनचं प्रमाण थोडं कमी होऊ लागतं. त्यामुळे मासिक पाळी कधी वेळेवर येतात तर कधी उशिरा होतात. यामुळे मूड पटकन बदलू शकतो आणि कधी कारण नसताना राग किंवा निराशा जाणवू शकते.
वजन वाढू लागतं
या वयानंतर आधीसारखेच खाल्ले तरी वजन वाढू शकते. खासकरून पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते. याचं कारण म्हणजे शरीराची मेटाबॉलिज्म प्रक्रिया थोडी मंदावते. त्यामुळे या वयानंतर आहारावर विशेष लक्ष देणं आवश्यक ठरतं.
हाडं कमकुवत होऊ लागतात
३५ वर्षांनंतर हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम आणि व्हिटामिन डी मिळाले नाही तर सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
त्वचा सैल पडू लागते आणि केस गळू लागतात
वयानुसार त्वचा आणि केसांमध्येही बदल दिसू लागतो. त्वचा थोडी सैल किंवा निस्तेज वाटू शकते आणि केस आधीपेक्षा जास्त गळू शकतात. यामागे वाढते वय, हार्मोन्समधील बदल आणि ताणतणाव ही कारणे असू शकतात.
झोप कमी येते आणि थकवा वाढतो
या वयानंतर झोप आधीसारखी गाढ लागत नाही. अनेक महिलांना रात्री वारंवार जाग येण्याची समस्या जाणवते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो.
ताण वाढू शकतो
या काळात घर, मुलं आणि कामाच्या जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं कठीण होतं आणि ताण वाढू शकतो. मात्र घाबरण्याची गरज नाही, कारण काही साध्या सवयींनी हे बदल कमी करता येतात.
काय करावे?
रोज थोडा एक्सरसाईज करा
संतुलित आहार घ्या
दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात बसा
वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या
योग्य जीवनशैली ठेवल्यास ३५ नंतरही शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवणे शक्य आहे.
Web Summary : After 35, women experience hormonal shifts, weight gain, weakening bones, skin changes, and sleep disturbances. Managing stress, regular exercise, a balanced diet, and health checkups are crucial for well-being.
Web Summary : 35 के बाद महिलाओं को हार्मोनल बदलाव, वजन बढ़ना, हड्डियों का कमजोर होना, त्वचा में बदलाव और नींद की कमी का अनुभव होता है। तनाव प्रबंधन, नियमित व्यायाम, संतुलित आहार और स्वास्थ्य जांच कल्याण के लिए महत्वपूर्ण हैं।