महिलांचे शरीर हार्मोन्स, जीवनशैली आणि जबाबदाऱ्यांमुळे अनेक बदलांना सामोरे जाते. त्यामुळे काही आजार महिलांमध्ये तुलनेने जास्त प्रमाणात दिसून येतात. वेळेवर लक्ष दिले आणि योग्य काळजी घेतली तर हे आजार टाळता येऊ शकतात किंवा नियंत्रणात ठेवता येतात. (These 5 diseases are the biggest enemies of women - they can occur at any time, it is in your hands to be careful, know the symptoms)मुलींनी आणि महिलांनी कायम लक्ष द्यायला हवेत असे हे पाच कॉमन आजार पुढीलप्रमाणे आहेत.
१. पहिला आजार म्हणजे अॅनिमिया (रक्ताची कमतरता). मासिक पाळी, चुकीचा आहार आणि सततची धावपळ यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची समस्या फार सामान्य आहे. यामुळे चक्कर येणे, थकवा, केस गळणे आणि चेहरा फिकट दिसणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, गूळ, खजूर यांचा समावेश करणे आणि वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
२. दुसरा कॉमन आजार म्हणजे थायरॉईडचा त्रास. वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, सतत थकवा, केस गळणे, चिडचिडेपणा, मासिक पाळी अनियमित होणे ही त्याची लक्षणे असू शकतात. महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे थायरॉईडची समस्या जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करुन घ्यावी.
३. तिसरा महत्त्वाचा आजार म्हणजे पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम). आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक तरुण मुलींमध्ये हा त्रास दिसतो. मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स, केस गळणे किंवा जास्त केस येणे ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. वेळेवर जीवनशैलीत बदल, संतुलित आहार आणि व्यायाम केल्यास हा त्रास नियंत्रणात राहू शकतो.
४. चौथा आजार म्हणजे युरिन इन्फेक्शन. स्वच्छतेकडे दुर्लक्ष, कमी पाणी पिणे किंवा जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे यामुळे महिलांना युरिन इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. लघवी करताना जळजळ, वेदना, वारंवार लघवी लागणे ही त्याची लक्षणे आहेत. स्वच्छता, भरपूर पाणी आणि वेळेवर उपचार खूप महत्त्वाचे ठरतात. हा त्रास साधा वाटत असता तरी तो भयंकर ठरु शकतो.
५. पाचवा आणि अत्यंत गंभीर आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. महिलांमध्ये हा कॅन्सर सर्वाधिक आढळतो. छातीत गाठ जाणवणे, आकारात बदल, वेदना किंवा स्त्राव होणे ही लक्षणे असू शकतात. नियमित स्वतःची तपासणी, आरोग्य तपासण्या आणि जागरुकता ठेवल्यास हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो.
एकूणच, महिलांनी आपल्या शरीराचे संकेत ओळखणे, लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे आणि नियमित आरोग्य तपासण्या करणे फार गरजेचे आहे. योग्य आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर हे कॉमन आजार टाळणे किंवा वेळेत नियंत्रणात ठेवणे नक्कीच शक्य आहे.
