हातापायाला वारंवार सूज येणे ही अनेकांना भेडसावणारी त्रासदायक समस्या आहे. काहींना अशी सूज फक्त सकाळी उठल्यावरच काही तासांसाठी दिसते तर काहींना दिवसभर जडपणा जाणवतो. हाताची बोटे घट्ट वाटतात, पाय सुजल्यामुळे चपला घट्ट होतात, आणि चालताना अस्वस्थता जाणवते. (Swelling in hands and feet? It could be a sign of a serious illness)ही सूज कधी काही तास टिकते तर काहींना ती सतत राहते. अनेकांना वाटते की हा केवळ थकव्याचा परिणाम आहे, पण खरं पाहता सूज येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य नसेल, म्हणजेच आपण दिवसभर पुरेसे पाणी पित नसाल, तर शरीर तेवढं पाणी साठवून ठेवतं आणि त्यामुळे सूज येते. सुजलेला भाग फार मऊ लागतो. काही वेळा आपण अन्नात मीठ जास्त घेतो. मीठात असलेले सोडियम शरीरात पाणी साठवून ठेवते. त्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्याभोवती सूज दिसू लागते. दिवसभर बसून राहणे किंवा एका जागी उभे राहणे हेही सूज येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. रक्तप्रवाह योग्य न झाल्यास पायाला जडपणा येतो आणि सूज दिसते.
महिलांमध्ये मासिक पाळीपूर्वीच्या काळात, गर्भधारणेदरम्यानच्या काळात हार्मोन्सच्या बदलामुळेही अशी सूज येऊ शकते. काही वेळा ही सूज औषधांच्या दुष्परिणामामुळे येते. मधुमेह, रक्तदाब किंवा हार्मोनल औषधे घेत असताना हा त्रास काहींना जाणवतो. तर काही वेळा सूज ही मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताच्या आजाराची लक्षणे असू शकते. त्यामुळे वारंवार हाता-पायाला सूज येत असेल तर वेळीच वैद्य गाठावा.
हातापायाची सूज कमी करण्यासाठी काही साधे घरगुती उपाय उपयुक्त ठरतात. सर्वात पहिले म्हणजे शरीराला पुरेसे पाणी मिळणे गरजेचे आहे. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि सूज कमी होते. अन्नात मीठाचे प्रमाण कमी ठेवणे हेदेखील महत्त्वाचे आहे. जास्त मीठ, पापड, लोणचे, चिप्स यांसारखे पदार्थ टाळावेत.
थकलेल्या पायांना आराम देण्यासाठी गरम पाण्याचा शेक फायदेशीर ठरतो. पाच मिनिटे पाय कोमट पाण्यात आणि नंतर दोन मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी होते. झोपताना पायाखाली उशी ठेवून झोपल्यासही फायदा होतो, कारण त्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहतो. नियमित व्यायाम, चालणे किंवा योगासने केल्यानेही सूज कमी होते. शरीर हलते राहिल्याने द्रव साचत नाही आणि हातपाय हलके वाटतात. जर सूज वारंवार होत असेल, तिच्यासोबत वेदना, श्वास घेताना त्रास, त्वचेचा रंग बदलणे अशी लक्षणे दिसत असतील, तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
थोडक्यात सांगायचे झाले तर हातापायाला सूज येणे ही केवळ थकव्याची लक्षणे नाहीत. शरीरात काहीतरी असंतुलन झाले आहे याचा हा इशारा असतो. त्यामुळे योग्य आहार, पुरेसे पाणी, थोडा व्यायाम आणि विश्रांती घेतल्यास हा त्रास सहज कमी होऊ शकतो. निरोगी जीवनशैली स्वीकारल्यास हातपाय हलके राहतील आणि मनही प्रसन्न राहील.