Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका

सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका

दरवर्षी उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. काही जीव दगावतात, हे टाळता येईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 18:50 IST2025-04-15T18:46:31+5:302025-04-15T18:50:08+5:30

दरवर्षी उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. काही जीव दगावतात, हे टाळता येईल!

summer Heatstroke - dehydration, Symptoms and causes and treatment, 6 mistakes to avoid | सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका

सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका

Highlights लगेच थांबा, थंड जागी बसा, पाणी - ओआरएस घ्या आणि गंभीर वाटलं तर डॉक्टरांकडे जा.

- डाॅ. प्रज्ञावंत देवळेकर (जनरल प्रॅक्टिश्नर आणि समाज माध्यमात आरोग्य शिक्षक)


उन्हाळा आला की, सगळं कसं चकाकतं पण त्याचबरोबर येतात त्या उष्माघाताच्या, निर्जलीकरणाच्या गोष्टी. दरवर्षी लोकं त्याच त्याच चुका करतात आणि मग बोंबलत फिरतात, ‘अरे यार, यावर्षी ऊन जरा जास्तच आहे. पण नेमकं काय चुकतं? कुठे घोटाळा होतो? उन्हाळ्यात काय चालतं? उन्हाळ्यात सुरजदादा फुल फॉर्ममध्ये असतात. अनेक ठिकाणी तापमान ४० डिग्रीच्याही पुढे जातं. हवेतली आर्द्रता कधी चिकट, कधी कोरडी आणि अशात आपला शरीराचा ‘थर्मोस्टॅट’ डगमगतो.

थर्मोस्टॅट म्हणजे अशी एक यंत्रणा जिचं काम तापमान नियंत्रित करणं आहे. जसं घरातला एसी किंवा फ्रिज यांचं तापमान ठरलेलं ठेवतं अगदी तसं. आपल्या शरीराचंही एक ‘थर्मोस्टॅट’ असतं ते म्हणजे मेंदूतलं हायपोथॅलमस जे शरीराचं तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करतं.
घाम येणं, थरथरणं, ही सगळी त्याचीच किमया पण उन्हाळ्यात जास्त उष्णता आली की, संतुलन बिघडतं आणि मग गडबड होते.

शरीर थंड तर राहायला पाहिजे पण आपणच त्याला तसं वागू देत नाही. उष्माघात (हिट स्ट्रोक) आणि निर्जलीकरण (डीहायड्रेशन) हे दोन मोठे व्हिलन नेमके याचवेळी डोकं वर काढतात.
उष्माघात म्हणजे शरीराचं तापमान इतकं वाढतं की, मेंदू, हृदय, स्नायू सगळं गडबडायला लागतं.
निर्जलीकरण म्हणजे शरीरात पाणी आणि मीठ कमी होऊन आपली सिस्टीम क्रॅश व्हायला लागते.
पण हे होतं कसं? लोक काय चुका करतात?
मित्रांनो, उन्हाळा हा मजा करायचा ऋतू आहे, पण थोडं स्मार्ट व्हायला हवं. साध्या चुका टाळल्या तर उष्माघात, निर्जलीकरण यांना अगदी सहज दूर ठेवता येतं!

उन्हाळ्यात लोकं नेमक्या काय चुका करतात?

चूक १
पाणी पिण्याचा कायम विसर पडणं.
सगळ्यात मोठी चूक म्हणजे पाण्याला गृहित धरणं.
लोकं म्हणतात, ‘अरे, तहान लागली की पिऊ.’ पण तहान लागणं ही तर शरीराची शेवटची वॉर्निंग असते.
उन्हाळ्यात घामावाटे पाणी आणि सोडियम, पोटॅशियमसारखी मिनरल्स बाहेर पडतात.
तुम्ही ऑफिसात बसलात, बाहेर फिरताय किंवा जिम मारताय, पाणी पित राहणं गरजेचं.
पण बऱ्याच जणांचा मूडच नसतो. कधी म्हणतात, ‘पाणी आणलंच नाही, वेळच मिळत नाही.’ मग काय? डोकेदुखी, थकवा, चक्कर.
काही नग तर दूषित पाण्याच्या भीतीने चक्क कोल्ड्रिंक किंवा चहावर जगतात, पण त्यातली साखर आणि कॅफिन डीहायड्रेशनला अजून बूस्टच देतं.
उपाय : म्हणून या दिवसात अधूनमधून पाणी पित राहावे, खूप तहान लागेपर्यंत थांबू नये.

चूक २


भर दुपारी हिरोगिरी!
दुपारी १२ ते ३ ही वेळ म्हणजे सुरजदादांचा पीक स्टंट. पण आपले काही भाईलोक याचवेळी बाहेर पडतात.
कधी कामासाठी कर कधी वेळ आहे म्हणून, काही लोक तर चक्क फिरायला बाहेर पडतात.
अरे, थांब जरा! यावेळी सूर्याची किरणं थेट अंगावर येतात आणि शरीराचं तापमान वाढतं. घाम येतो पण हवेत आर्द्रता जास्त असेल तर तो सुकत नाही. मग उष्माघाताचा धोका वाढतो.
लक्षणं काय? डोकं दुखणं, चक्कर येणं, हृदयाचं ठोके वाढणं आणि गंभीर झालं तर बेशुद्ध पडणं.
सोल्यूशन?
उपाय : भरदुपारी बाहेर जाणे टाळा अन् जर जायचंच असेल तर टोपी, छत्री, हलके कपडे वापरा आणि पाण्याची बाटली हातात ठेवा.

चूक ३


कपड्यांचा गोंधळ : उन्हाळ्यात काय घालावं? याचंही काही जणांना भान नसतं, काही जण टाईट जीन्स, काळे कपडे घालून फिरतात जणू फॅशन शो आहे. काळे कपडे उष्णता शोषतात आणि टाईट कपडे घामाला अडवतात मग शरीर थंड कसं राहणार?
उपाय : हलके, सैल, सुती कपडे घालावे, पांढरे किंवा फिके रंग निवडावे. टोपी किंवा स्कार्फ सोबत असावा. ज्यामुळे त्वचा सूर्यापासून वाचते आणि तुम्ही कूलही दिसता.

चूक ४


खाण्याचा बेजबाबदारपणा : उन्हाळ्यात खाण्याकडेही दुर्लक्ष होतं. काही जण फक्त तळलेलं, मसालेदार खातात, काही तर डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंगच्या नादात जेवणच टाळतात. अरे पण शरीराला एनर्जी हवी ना?
उपाय : फळं, भाज्या, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यासारखं हलकं पण पोषक खावं. खरबूज, टरबूज, काकडी यात पाण्याचं प्रमाण जास्त आणि व्हिटॅमिन्सही मिळतात. पण फक्त स्वच्छ धुवून खावं.

चूक ५


सिग्नल्सकडे दुर्लक्ष : सगळ्यात मोठी चूक म्हणजे शरीराचे सिग्नल्स वाचायला न शिकणं.
तहान लागणं, थकवा येणं, त्वचा कोरडी पडणं, लघवी गडद होणं ही सगळी डीहायड्रेशनची लक्षणं.
डोकं गरगरणं, घाम येणं थांबणं, त्वचा लाल होणं ही उष्माघाताची लक्षणं. पण लोकं म्हणतात, ‘अरे, थोडं सहन करू.’
सहन करणं म्हणजे स्वतःशी वैर करणं.
उपाय : ही लक्षणं दिसली की, लगेच थांबा, थंड जागी बसा, पाणी - ओआरएस घ्या आणि गंभीर वाटलं तर डॉक्टरांकडे जा.

चूक ६


मुलं आणि वृद्धांकडे दुर्लक्ष : आपण तरुण आहोत, आपल्याला काय होणार? असं अनेकांना वाटतं. पण घरातली मुलं आणि वृद्ध मंडळी यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांचं शरीर उष्णता आणि निर्जलीकरणाला लवकर बळी पडतं.
उपाय : मुलांना बाहेर खेळायला सोडलं तर पाणी प्यायला सांगा. आजी-आजोबांना अधूनमधून लिंबूपाणी, नारळपाणी देत राहावं. कारण यातले अनेकजण लघवीच्या भीतीनं त्यांना तहान लागली तरी सांगत नाहीत.

उन्हाळ्यात ‘एवढं’ तरी करा!

१. नियमित पाणी पित राहावं.
२. ओआरएस, लिंबूपाणी, नारळपाणी यांनाही प्राधान्य द्यावं.
३. शक्यतो दुपारी बाहेर जाणं टाळावं.
४. सैल, हलके, फिक्या रंगांचे कपडे घालावे.
६. स्वच्छ फळं, ताज्या भाज्या, हलकं जेवण, तळलेलं, मसालेदार टाळावं.
७. शरीराचे सिग्नल्स वाचायला शिकत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी.
८. योग्य तापमानावर एसी-पंखे वापरावे. शक्य झाल्यास दोनदा थंड पाण्याने आंघोळ करावी.

(लेखक जनरल प्रॅक्टिश्नर आणि समाज माध्यमात आरोग्य शिक्षक)
drpradnyawantdeolekar03@gmail.com

Web Title: summer Heatstroke - dehydration, Symptoms and causes and treatment, 6 mistakes to avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.