Join us   

Summer Care Tips : उन्हाळ्यात घामाने त्वचेवर रॅश लाल पुरळ येते, खाज सुटते? 4 सोपे घरगुती उपाय, त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 6:11 PM

Summer Care Tips : रॅशेसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य ते उपाय केले तर ते वाढणार नाहीत.

ठळक मुद्दे दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करा आणि काखेत, ब्रेस्टच्या खाली, जांघेत पावडर लावा.डॉक्टरांकडे जाण्याआधी काही सोपे घरगुती उपाय करुन पाहायला हवेत.

उन्हाळा म्हटला की घाम आणि सतत होणारी चिकचिक यामुळे अंग ओले होणे, घाम त्वचेवर वाळून गेल्याने त्याठिकाणी खाज येणे, घामाचा वास येणे, रॅशेस येणे अशा विविध समस्या उद्भवतात. तळपता सूर्य डोक्यावर असल्यावर या सगळ्याला पर्याय नाहीच. पाऊस पडायच्या आधी हे सगळे जास्तच वाढते. पाऊस पूर्णपणे सुरू व्हायला अजून जवळपास एक महिना आहे. घाम आलेल्या ठिकाणी पाण्याने धुतल्यास घाम निघून जाण्यास मदत होते. पण आपल्याला सतत पाण्याने आंघोळ करणे शक्य नसते. महिलांना साधारणपणे काखेत, ब्रेस्टच्या खालच्या भागात, मांड्यांच्या मधल्या भागात घामामुळे हे रॅशेस येतात (Summer Care Tips). एकदा ऱॅश यायला सुरुवात झाली की याठिकाणी बारीक पुरळ येणे, खाज येणे अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा हे रॅश वाढले तर याठिकाणी त्वचेचे फंगल इन्फेक्शन होण्याचे प्रमाणही वाढते. अनेकदा हे रॅश इतके वाढतात की त्याठिकाणी खाज येऊन जखमा होतात आणि मग डॉक्टरांकडे जायची वेळ येते. पण रॅशेसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य ते उपाय केले तर ते वाढणार नाहीत. यासाठी लगेचच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी यावर इलाज होऊ शकतो. आता रॅशेस घालवण्यासाठीचे घरगुती उपाय कोणते ते पाहूया...

(Image : Google)

१. कोरफड 

कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे कोरफडीच्या पानातील गर काढून ज्याठिकाणी रॅशेस आणि खाज येत आहे अशा ठिकाणी हा गर लावावा. यामुळे आग होत असलेल्या भागाला थंडावा मिळण्यास मदत होते. रॅश आलेल्या ठिकाणी कोरफडीचा गर लावायचा. अर्धा ते पाऊण तास तो तसाच ठेवायचा आणि वाळल्यानंतर गार पाण्याने धुवून टाकायचा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. 

२. खोबरेल तेल 

नारळाचे तेल औषधी आणि सौंदर्याच्यादृष्टीने अतिशय चांगले असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. नारळाच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवर येणारी खाज, सूज, पुरळ, जळजळ कमी होण्यास मदत होते. नारळाचे तेल हातावर घेऊन ज्याठिकाणी रॅशेस आले आहेत त्याठिकाणी हळूवारपणे लावा. यामुळे रॅशेसची समस्या कमी होण्यास मदत होईल. त्वचेला आग होत असेल तर कापसाने तेल लावले तरी चालेल. तसेच हे तेल लावल्यानंतर ते त्वचेमध्ये मुरणे आवश्यक आहे, त्यामुळे ते लगेच धुवू नका. दररोज एकदा हा उपाय केल्यास आठवडाभरात तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. 

३. कपड्यांबाबत काळजी 

आपण अनेकदा घट्ट कपडे घालतो, मात्र त्यामुळे घामाचे किंवा रॅशेसचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेसियर, अंडरवेअर पुरेशी सैल असेल याची काळजी घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांत कायम सुती कपडे वापरा. त्यामुळे घाम कपड्यात शोषला जाईल आणि आपल्याला रॅशेसचा त्रास होणार नाही. 

(Image : Google)

४. इतर काळजी 

ओल्या अंगावर कपडे घालू नका, घाम पुसत राहा कारण घाम त्याठिकाणी राहिल्याने अंगावर रॅशेस येऊ शकतात. ब्रा लायनर, स्वेट पॅडस यांचा वापर करा म्हणजे घाम शोषण्यास मदत होईल. दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करा आणि काखेत, ब्रेस्टच्या खाली, जांघेत पावडर लावा. ज्याठिकाणी खाज येते तिथे खाजवणे टाळा, त्याऐवजी तेल, पावडर, कैलास जीवन, अमृत मलमसारखे एखादे क्रीम लावा. त्यामुळे रॅशेस वाढणार नाहीत. फंगल इन्फेक्शन वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल