जर तुम्हाला वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर ती फक्त खाण्याची सवय आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. एका नवीन रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, जास्त गोड खाण्याची इच्छा मानसिक आरोग्याशी, विशेषतः डिप्रेशन आणि एंग्जायटीशी संबंधित असू शकते.
जर्मनीच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल बॉन (UKB), युनिव्हर्सिटी ऑफ बॉन आणि युनिव्हर्सिटी हॉस्पिटल टुबिंगन येथील संशोधकांना असं आढळून आलं की, डिप्रेशनच्या रुग्णांना भूक कमी असते, परंतु ते कार्बोहायड्रेट्सकडे, म्हणजेच गोड पदार्थांकडे जास्त आकर्षित होतात.
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, जास्त कार्बोहायड्रेट खाण्याची इच्छा भूक वाढल्यामुळे होते, परंतु या रिसर्चने हा समज चुकीचा असल्याचं सिद्ध केलं. संशोधकांनी सांगितलं की गोड पदार्थांची तीव्र इच्छा डिप्रेशन आणि विशेषतः एंग्जायटीशी संबंधित आहे.
संशोधकांच्या मते, डिप्रेशनने ग्रस्त असलेले लोक त्यांचा मूड सुधारण्यासाठी गोड पदार्थ खातात. डिप्रेशनमध्ये लोक सहसा कमी किंवा जास्त खातात. अशा परिस्थितीत, कार्बोहायड्रेट्स आणि गोड पदार्थ त्यांचं मानसिक संतुलन राखण्याचं साधन बनतात.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. तेजस लिमये यांच्या मते, डिप्रेशनने ग्रस्त असलेले लोक अन्नाला भावनिक आधार मानतात. पण ही एक धोकादायक सवय बनू शकते. अशा लोकांनी प्रक्रिया केलेली साखर न वापरता नैसर्गिक गोड पदार्थ जसं की फळं आणि सुकामेवा खा.
साखर मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमला सक्रिय करते, ज्यामुळे आपल्याला थोड्या काळासाठी बरं वाटतं. पण जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत असंतुलन निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे मानसिक आरोग्य आणखी बिघडू शकते. हे शरीरात ट्रिप्टोफॅन नावाच्या घटकाचे प्रमाण वाढवतं, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्स रिलीज करतं आणि झोप कंट्रोल होते.