काहीही खाल्ले तरी पोट बिघडते? अशी तक्रार आजकाल अनेक जण करताना दिसतात. थोडेसे तेलकट, तिखट, बाहेरचे किंवा कधी कधी साधे घरचे अन्न खाल्ले तरी जुलाब, पोटदुखी, गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा जाणवतो. ही समस्या केवळ अन्नामुळेच नसून शरीराची पचनशक्ती, जीवनशैली आणि मानसिक अवस्था यांच्याशीही संबंधित असते. त्यामुळे यामागची कारणे समजून घेणे आणि योग्य उपाय करणे गरजेचे आहे. पोट वारंवार बिघडण्यामागचे एक मुख्य कारण म्हणजे पचनशक्ती कमकुवत होणे. (Stomach upsets no matter what you eat? There are many reasons, not just indigestion, try simple home remedies)अपचन, आम्लपित्त, गॅस किंवा आतड्यांची जळजळ असल्यास अन्न नीट पचत नाही आणि पोट बिघडते. अनियमित जेवणाच्या वेळा, उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे, फार उशिरा जेवणे किंवा सतत बाहेरचे अन्न खाणे यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. यामुळे आतड्यांचे कार्य बिघडते.
अनेक वेळा फूड इंटॉलरन्स किंवा अॅलर्जी हेही कारण असू शकते. दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ काही लोकांना चालत नाहीत, त्यामुळे पोटदुखी किंवा जुलाब होतात. ग्लुटेन, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थांमुळेही काही जणांना त्रास होतो. असे पदार्थ खाल्ले की लगेच पोट बिघडत असेल तर त्या पदार्थांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक ताण, चिंता आणि अस्वस्थता यांचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. सततचा ताण असल्यास ‘इरिटेबल बाउल सिंड्रोम' सारखे त्रास होऊ शकतात, ज्यामध्ये थोडेसे अन्न खाल्ले तरी पोट बिघडते, जुलाब किंवा बद्धकोष्ठता होते. झोप पूर्ण न होणे आणि अस्वस्थ दिनचर्या हेही यामागचे कारण ठरु शकते. अस्वच्छ पाणी किंवा दूषित अन्न खालल्यामुळे आतड्यांमध्ये संसर्ग होतो. त्यामुळे काहीही खाल्ले तरी पोट बिघडत राहते. याशिवाय अँटीबायोटिक्स किंवा काही औषधांच्या जास्त वापरामुळे आतड्यांमधील चांगले जंतू नष्ट होतात आणि पचन बिघडते.
या समस्येवर उपाय करण्यासाठी सर्वात आधी आहार आणि दिनचर्या सुधारणे गरजेचे आहे. जेवण वेळेवर आणि शांतपणे घ्यावे. फार तिखट, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि बाहेरचे अन्न टाळावे. हलके, घरचे, ताजे अन्न खाल्ल्यास पचनसंस्था सुधारते. तांदूळ, वरण, भाजी, ताक, भाताची पेज यांसारखे पदार्थ पोटाला आराम देतात. पचन सुधारण्यासाठी ताक, दही, आंबवलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतल्यास आतड्यांतील चांगले पोषक घटक वाढतात. आलं, जिरे, ओवा, हिंग यांसारखे पचनासाठी उपयुक्त पदार्थ आहारात वापरावेत. कोमट पाणी पिण्याची सवय लावावी, थंड पाणी किंवा खूप थंड पदार्थ टाळावेत.
मानसिक ताण कमी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ध्यान, प्राणायाम, हलका व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे पचनावर होणारा ताण कमी होतो. जेवणानंतर लगेच झोपणे किंवा धावपळ करणे टाळावे. जर पोट सतत बिघडत असेल, वजन कमी होत असेल, रक्त पडणे, तीव्र पोटदुखी किंवा ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. काही वेळा गंभीर आजार, संसर्ग किंवा अन्न न सहन होण्याच्या समस्या तपासणीतून समोर येतात. एकूणच, काहीही खाल्ले तरी पोट बिघडते, ही समस्या दुर्लक्षित न करता तिच्यामागची कारणे ओळखणे आवश्यक आहे. काही वेळा हा त्रास गंभीर आजाराचे लक्षण असू शकतो. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्याा.
