अनेक शारीरिक त्रास आहेत जे फार कॉमन असतात. सगळ्यांनाच कधी ना कधी उद्भवतात. ताप सर्दी खोकला तसेच इतर काही संसर्गजन्य आजार प्रत्येकाला होत असतात. काहींना पित्ताचा त्रास असतो तर काहींना अपचनाचा. असेही अनेक त्रास आहेत. पोटाचे विकार सगळ्यांनाच उद्भवतात. अशीच एक अत्यंत सामान्य समस्या म्हणजे गॅस. पनचसंस्थेतील काही त्रुटींमुळे पोटात गॅस होतात. घरगुती उपायांनी ते बरेही होतात. मात्र कधी कधी पोटातील गॅस जास्त वाढतो आणि त्यामुळे छातीवर ताण येतो. छातीचा त्रास म्हटल्यामुळे आपण लगेच घाबरतो मात्र घाबरु नका जाणून घ्या नक्की काय त्रास होतो. काही वेळा गॅसेसमुळे छातीवर ताण येणे ही एक सामान्य परंतु जरा त्रासदायक समस्या आहे. पचनसंस्थेतील वायूचा साठा वाढल्यामुळे छातीत जरा अस्वस्थता जाणवते. जळजळ व्हायला लागते. त्यामुळे छातीत दुखायला लागते.
या त्रासाला अनेक घटक कारणीभूत असतात. विविध प्रकारच्या बिया, राजमा, कोबी, कांदे, पावटा असे पदार्थ आणि कार्बोनेटेड्स असलेली पेये यामुळे गॅस जास्त प्रमाणात तयार होतो. तसेच अति खाल्यामुळे ते पचत नाही. अपचनामुळे गॅस तयार होतो. तो गॅस छातीच्या दिशेने जातो आणि त्यामुळे छातीत त्रास जाणवतो. श्वास घेताना काही तरी जड छातीत अडकल्यासारखे जाणवते. दुग्धजन्य पदार्थ पचवण्यास जर अडचण आली तर गॅस होतात.
केअरहॉस्पिटल्स या साईटवर सांगितल्यानुसार,गॅसेसमुळे छातीत प्रेशर येणे सामान्य असले तरी ते टाळता येते. योग्य आहार, जीवनशैलीतील योग्य बदल आणि घरगुती उपायांनी या समस्येवर नियंत्रण ठेवता येते. मात्र लक्षणे तीव्र असतील आणि सतत उद्भवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर छातीत वेदना डाव्या बाजूला व डाव्या खांद्यावर होत असतील आणि हातापर्यंत पसरत असतील तर काही तरी मोठी समस्या असण्याची शक्यता असते. श्वास घेण्यास त्रास होत असेल, उगाच घाम आला किंवा चक्कर येत असेल तर हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते. गॅसमुळे जर फारच ताण पडला तर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे गॅस वाढवणारे वातूळ पदार्थ खाणे टाळा.