हिवाळा सुरु झाला की अनेकांच्या पोट साफ न होणे, शौचास जोर लावावा लागणे, पोटात दुखणे आणि दिवसभर पोट जड वाटणे अशा समस्या वाढतात. थंडीत पाणी कमी पिणे, हालचाल कमी होणे आणि पचनक्रिया मंदावणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत. (Stomach problem? Check out 4 home remedies, try these for better digestion )मात्र काही सोपे घरगुती उपाय आणि आहारातील बदल केल्यामुळे ही समस्या सहज नियंत्रणात येते.
थंडीत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कोमट पाणी नियमित पिणे. सकाळी उठताच एक मोठा ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल वाढते आणि पोट मोकळे होण्यास मदत होते. दिवसभरही थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाणी घेतल्याने पचन सुधारते. थंडीच्या दिवसात आहारात फायबरयुक्त अन्न जसे की ओट्स, मुगाची खिचडी, गाजर, बीट, सफरचंद, पपई, केळी, हिरव्या भाज्या आणि सूप यांचा समावेश करावा. रात्री जड, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ टाळावेत.
पचन सुधारण्यासाठी घरच्या घरी करता येणारा एक सोपा उपाय म्हणजे आलं–जिरे–ओवा काढा. एक कप पाण्यात थोडे आले किसून घालायचे. अर्धा चमचा जिरे घालायचे. चिमूटभर ओवा घालून उकळायचे. हा काढा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी कोमट पाण्यातून प्यायल्यास पचनक्रिया वेगाने सुधारते आणि शौचास साफ होण्यास मदत होते.
याशिवाय ठेचा किंवा चटणीही पोट साफ करण्यासाठी उत्तम असते. कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे, लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घालून केलेली हिरवी चटणी जेवणासोबत खाल्ल्यास पचन सुधारते आणि गॅस–अँसिडिटी कमी होते. लसूण आणि आलं हे दोन्ही उष्ण असल्यामुळे थंडीत पोटातील चयापचय वाढवतात.
कधी कधी शौचास अजिबात साफ न झाल्यास एरंडेल तेल (Castor oil) हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक चमचा एरंडेल तेल पिणे हा एक जुना आणि सुरक्षित घरगुती उपाय मानला जातो. सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. मात्र हा उपाय वारंवार न करता फक्त कधीकधी आवश्यकता भासल्यास वापरावा.
थंडीत व्यायामाचं प्रमाण घटल्याने पचन मंदावते, म्हणून सकाळी १०–१५ मिनिटे चालणे, हलका स्ट्रेचिंग, पोटाभोवती मसाज करणं किंवा गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवणं यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते.
हे सर्व उपाय नियमितपणे केल्यास थंडीमुळे होणारी बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि शौचास जोर लावण्याची समस्या बरीच कमी होते. गरम पाणी, योग्य आहार, हलकी हालचाल आणि काही घरगुती काढे यांचा समतोल साधला तर हिवाळ्यातही पोट व्यवस्थित साफ राहते.
