धुळीची अँलर्जी ही आजकाल अनेकांना त्रास देणारी समस्या झाली आहे. घरातील धूळ, रस्त्यावरील प्रदूषण, गादी-उशांमधील सूक्ष्म डस्ट माइट्स, जुने कपडे, पडदे किंवा साचलेली माती यामुळे ही अँलर्जी उद्भवते. तसेच जागोजागी सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. ( Sneezing and stuffy nose? Try simple and easy home remedies, dust allergies can be treated easily )ज्यांची प्रतिकारशक्ती संवेदनशील असते, त्यांच्या शरीरात धूळ गेल्यावर रोगप्रतिकारक यंत्रणा तिला शत्रू समजून प्रतिक्रिया देते आणि त्यामुळे विविध लक्षणे दिसू लागतात.
धुळीची अँलर्जी झाली की सतत शिंका येणे, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे, डोळे लाल होऊन खाज येणे, घशात खवखव, कोरडा खोकला, छातीत घट्टपणा, दम लागणे अशी लक्षणे जाणवतात. काही जणांना डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे किंवा त्वचेवर खाज आणि पुरळही येऊ शकते. हा त्रास विशेषतः सकाळी उठल्यावर, साफसफाई करताना, प्रवासात किंवा धुळीच्या ठिकाणी गेल्यावर वाढतो.
धुळीच्या अँलर्जीपासून बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवणे. घरात धूळ साचू नये यासाठी रोज ओल्या कपड्याने फरशी पुसणे, फक्त झाडू मारण्याऐवजी ओलसर फडक्याचा वापर जास्त फायद्याचा असतो. नियमित अशी साफसफाई करणे उपयुक्त ठरते. पडदे, चादरी, उशांची आवरणे आठवड्यातून किमान एकदा धुवावीत. गादी-उशा उन्हात ठेवणेही फार फायद्याचे असते, कारण त्यामुळे डस्ट माइट्स नष्ट होतात.
घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. खूप बंदिस्त वातावरण अँलर्जी वाढवते. शक्य असल्यास घरात इनडोअर झाडे ठेवावीत, मात्र त्यात पाणी साचणार नाही याकडे लक्ष द्यावे. धूळ जास्त उडणाऱ्या वस्तू, जुनी वर्तमानपत्रे, नको असलेली कागदपत्रे साठवून ठेवणे टाळावे. साफसफाई करताना मास्क वापरणे अॅलर्जी असलेल्यांसाठी खूप गरजेचे आहे. बाहेर पडतानाही तोंडाला फडके बांधा.
धुळीची अँलर्जीअसलेल्यांनी बाहेर जाताना, विशेषतः रस्त्यावर किंवा प्रदूषित भागात, नाक-तोंड झाकणे आवश्यक आहे. घरी आल्यानंतर हात-पाय, चेहरा नीट धुणे, नाकात साचलेली धूळ पाण्याने स्वच्छ करणे उपयोगी ठरते. नियमित कोमट पाण्याच्या वाफा घेतल्याने नाकातील मार्ग मोकळा होतो आणि शिंक-नाक वाहणे कमी होते. आहारातही काही बदल केल्यास अँलर्जीचा त्रास आटोक्यात राहतो. कोमट पाणी पिणे, हळद-आलं-तुळस यांचा समावेश करणे, जीवनसत्त्व सी भरपूर असलेली फळे खाणे प्रतिकारशक्ती वाढवते. फार थंड पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, जास्त कफ वाढवणारे पदार्थ टाळणे चांगले. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळेही शरीराची अँलर्जीविरुद्धची ताकद वाढते. जर धुळीच्या अँलर्जीचा त्रास वारंवार होत असेल, दम्याचा झटका येत असेल किंवा औषधांशिवाय आराम मिळत नसेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
