Join us

रोज रात्री उशीरा झोपता, ही सवय तुमच्या जीवावर बेतणार आहे! अकाली मृत्यू ओढावण्याचंही भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 15:10 IST

आपण रोज रात्री जागरण का करतो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं स्वत:ला द्यायला हवं.

ठळक मुद्दे सारं समजूनही दुर्लक्ष करणंच सध्या अनेकांना बरं वाटतं.. त्याची झोप उडेल, जाग येईल तोवर उशीर होऊ नये म्हणजे मिळवलं!

मी अमूक बिंज केलं, तमूक वेबसिरिज मी एका रात्रीत पाहून टाकली. डेडलाइन होती पहाटेपर्यंत काम केलं हे सगळं आपण किती कौतुकानं एकमेकांना सांगतो. अनेकदा तर जी माणसं रात्री जागून काम करतात, कमी झोप घेतात त्यांचं फार कौतुक हाेतं आपल्याकडे! पण रात्री शांत झोपणं ही आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि ती नसेल तर आपलं शरीराचं घड्याळच बिघडून जाईल हे अनेकदा लक्षातच येत नाही. आणि येतं तेव्हा हजार प्रकारचे आजार छळू लागलेले असतात.

हल्ली आपण नक्की जागरणं करतो कशासाठी? खरं बोलायचं तर आपण आपला स्क्रीन टाईम वाढवत झोपेचं खोबरं करत असतो. सूर्य मावळला की शरीराला कळू लागतं की आपण आता कामांचा वेग कमी करायचा आहे. पण आपण शरीराचं ऐकत नाही. अंधार पडत चालला की ऊत येतो. मग स्क्रीनवर सिनेमे लाव, रात्री उशिरा जेवणं कर, रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्या असं सगळं सुरु होतं. दिवस मावळला की जणू अनेकांना उजाडतं. आपल्याला रात्रीच उशिरापर्यंत मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलायचं असतं. राहून गेलेली एकेक कामं रात्रीच आठवायला लागतात.  त्याने झोपेचं खोबरं झालंच. रात्री जास्त जागरण झालं, तर सकाळी उशिरा उठायची सूट त्यातून मिळवून घेतो. कधी कधी तर अनेक दिवसांची झोप एकदाच कधी काढून घेऊ, असे प्लॅन्स करत बसतो. जसं आपल्याला रोजची रोजच भूक लागते आणि ती रोजची रोजच भागवावी लागते, तसंच झोपेचं देखील असतं. ती रोजची रोजच घ्यावी लागते. तिचा दर्जा जितका चांगला तितकं आपलं आरोग्य उत्तम असायची शक्यता जास्त.

 

पण हे आता आपण समजूनच घेत नाही. नाही त्या गोष्टी ग्लोरीफाय करण्याच्या नादात जगण्यासाठी आवश्यक गोष्टीच आता आपण विसरुन चाललेले आहोत. आणि त्याचा परिणाम म्हणून ऐन तारुण्यात मृत्यू, दमलेलं शरीर, फर्टिलिटीचे प्रश्न असे अनेक जीघेणे त्रास आपल्याा वाट्याला येऊ लागलेले आहेत. पण सारं समजूनही दुर्लक्ष करणंच सध्या अनेकांना बरं वाटतं.. त्याची झोप उडेल, जाग येईल तोवर उशीर होऊ नये म्हणजे मिळवलं!

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलालाइफस्टाइल