Liver Detox Tips : आपणं पाहिलं असेल की, सोशल मीडियावर वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट किंवा डॉक्टर लिव्हरसंबंधी भरपूर माहिती देत आहेत. वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओतून लिव्हरसंबंधी आजारांबाबत जागरूकता पसरवत आहेत. अचानकपणे लिव्हरसंबंधी सगळेच इतकं बोलायला लागण्याचं कारण म्हणजे अलिकडे लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या आजारांच्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे दारू न पिताही आपल्याला फॅटी लिव्हर (Fatty Liver), लिव्हर सिरोसिस या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी व शरीराची हालचाल न करणे यामुळे या आजारांचा धोका वाढतो.
वेगवेगळ्या कारणांनी आजकाल लिव्हरचं आरोग्य बिघडत आहे. याला जबाबदार आपणच असतो. जर लिव्हरवर चरबी जमा झाली आणि त्यात विषारी तत्व जमा झाले तर लिव्हर साफ करण्याची गरज असते. ज्याला लिव्हर डिटॉक्स असं म्हणतात. असं केल्यास लिव्हर आपलं काम योग्य पद्धतीनं करू शकतं. अनेकदा लिव्हरमध्ये काही गडबड झाल्यावर शरीर काही संकेत देतं. त्याकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. न्यूट्रिनिस्ट श्वेता शाह यांनी एका पोस्टमधून लिव्हरमध्ये विषारी तत्व जमा झाल्याच्या संकेतांबाबत आणि डिटॉक्सबाबत माहिती दिली आहे.
लिव्हरमध्ये टॉक्सिन जमा होण्याची लक्षणं
रात्री १ ते ३ वाजतादरम्यान झोपमोड होणे
जबडा किंवा गालांवर पुरळ
तोंडाची चव कडवट होणे
जिभेवर पिवळा थर
चिडचिडपणा किंवा निराशा
मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव
केस आणि डोक्याची त्वचा अधिक ऑयली होणं
लिव्हर डिटॉक्ससाठी काढा
वर सांगण्यात आलेल्या संकेतावरून आपण लिव्हरमध्ये विषारी तत्व जमा झाल्याची माहिती मिळवू शकता. जेणेकरून वेळीच लिव्हर डिटॉक्स करता येईल. यासाठी आपण एक खास काढा तयार करू शकता. चला पाहुयात कसा बनवाल...
साहित्य
१ छोटा चमचा पुनर्नवा, १/४ छोटा चमचा हळद, चिमुटभर काळी मिरी पूड, १/४ छोटा चमचा गुळवेल पावडर, ३ ते ४ तुळशीची पाने.
कसा बनवाल?
लिव्हर साफ करण्यासाठी हा काढा तयार करणं फार सोपं आहहे. यासाठी एक भांड्यात दोन कप पाणी टाका. या सगळ्या गोष्टी पाण्यात टाकून चांगल्या उकडा. जोपर्यंत पाणी १ कप शिल्लक राहत नाही तोपर्यंत उकडा. आपला काढा तयार आहे. हा काढा २१ दिवस रात्री जेवणाआधी कोमट प्यावा. या काढ्यानं पित्त संतुलित होतं, लिव्हर डिटॉक्स होतं आणि झोपेची क्वालिटी सुधारते.
लिव्हर हेल्दी ठेवण्याचे आयुर्वेदिक उपाय
झोपताना त्रिफळा चूर्ण घ्या
सकाळी आवळ्याचा रस प्या
जेवण झाल्यावर जिरे, बडीशेप आणि ओव्याचं पाणी प्या
सूर्यास्ताच्या आधी जेवण करा
दही पुन्हा गरम करून खाऊ नका
रिफाइंड तेल टाळा