Join us
Daily Top 2 Weekly Top 5

चुकीच्या पद्धतीने ब्रश वापरणे पडते महागात, पाहा दात घासताना काय चुकते आणि काय करायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 19:07 IST

See what goes wrong while brushing your teeth and what to do, oral care tips : दात घासताना अजिबात करु नका या चुका.

दात घासणे ही दिवसाच्या सुरवातीची पहिली क्रिया आणि झोपण्याआधीची शेवटची क्रिया असावी असं तज्ज्ञ सांगतात. दात घासल्याशिवाय दिवसाची सुरवात होतच नाही. मात्र दात घासण्याची पद्धत अनेकांची फार चुकीची असते. त्यामुळे हिरड्यांतून रक्त येणे, ब्रश लागणे, सूज येणे किंवा दात संवेदनशील होणे असे त्रास निर्माण होतात. दात स्वच्छ ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते योग्य पद्धतीने घासणेही आवश्यक आहे. (See what goes wrong while brushing your teeth and what to do, oral care tips  )हिरड्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी दात घासण्याची योग्य पद्धत आणि ब्रशची योग्य निवड फार गरजेचे आहे. 

सर्वात आधी ब्रशची निवड योग्य असणे गरजेचे आहे. खूप कडक ब्रिसल्स असलेला ब्रश वापरल्यास हिरड्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे सॉफ्ट किंवा मीडियम ब्रश वापरणे अधिक सुरक्षित ठरते. ब्रशची टोकं झिजलेली असतील तर तो वेळेवर बदलणेही महत्त्वाचे आहे, कारण जुना ब्रश हिरड्यांवर जास्त जोरात घासावा लागतो. तसेच दर दोन महिन्यांनी ब्रश बदलणे तसे गरजेचेच आहे. 

दात घासताना खूप जोर लावण्याची गरज नसते. अनेकांना वाटते की जोरात घासले तरच दात स्वच्छ होतात, पण यामुळेच हिरड्यांतून रक्त येऊ शकते. हलक्या हाताने, गोलाकार हालचालींमध्ये ब्रश फिरवणे अधिक योग्य असते. ब्रश नेहमी दात आणि हिरड्यांच्या मधील जागेत जास्त सौम्यपणे फिरवावा. ती जागा संवेदनशील असते. पुढचे, मागचे आणि दातांच्या आतल्या बाजूचे भागही तितक्याच काळजीपूर्वक स्वच्छ करावेत.

टूथपेस्टचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. खूप जास्त पेस्ट लावण्याची गरज नसते, हरभऱ्याएवढी पेस्ट पुरेशी असते. फ्लोराईडयुक्त पेस्ट दातांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरते. तसेच दिवसातून दोन वेळा, सकाळी आणि झोपण्यापूर्वी  दात घासणे योग्य मानले जाते. त्यामुळे या वेळाही चुकवणे टाळा.

हिरड्यांतून वारंवार रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ते केवळ जोरात ब्रश केल्यामुळेच नव्हे, तर हिरड्यांच्या संसर्गामुळेही होऊ शकते. अशावेळी दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी ब्रशसोबत जीभ स्वच्छ करणे आणि गरज असल्यास माउथवॉशचा वापर करणेही फायदेशीर ठरते.

दात घासताना घाई न करता किमान दोन मिनिटे वेळ देणे आवश्यक आहे. योग्य सवयी लहानपणापासून लावल्यास पुढील आयुष्यात दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते. थोडी काळजी आणि योग्य पद्धत अवलंबली तर रक्त येणे, ब्रश लागणे यांसारखे त्रास टाळता येतात आणि हसरा, निरोगी चेहरा कायम ठेवता येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Brushing wrong way costs dearly: Right way for healthy teeth.

Web Summary : Incorrect brushing causes bleeding gums and sensitivity. Choose a soft brush, avoid applying too much pressure, and use fluoride toothpaste. Brush twice daily for two minutes, and consult a dentist for persistent issues.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्वच्छता टिप्सहोम रेमेडी