Diabetes in Children : साधारणपणे आपणा सगळ्यांना माहीत आहे की, डायबिटीस असेल किंवा हृदयरोग असतील हे वयाने मोठ्या लोकांना होणारे आजार मानले जात होते. पण अलिकडे डायबिटीस तरूणांमध्ये वाढल्याचे अनेक रिपोर्ट समोर येत असतात. आता तर त्याहून एक धक्कादायक बाब संशोधकांना आढळून आलीये. ती म्हणजे जेमतेम सहा महिन्यांच्या बाळांमध्येही डायबिटीसचा एक नवीन प्रकार आढळला आहे. हा आजार सामान्य कारणांनी होत नाही, तर बाळांच्या डीएनएमध्ये झालेल्या बदलांमुळे होतो.
जीनमध्ये लपलेलं आहे आजाराचं रहस्य
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमने शोधून काढले की, नवजात बाळांमध्ये होणाऱ्या सुमारे 85% डायबिटीसच्या केसेसमागे त्यांच्या जीनमधील गडबड कारणीभूत असते. या नव्या संशोधनात TMEM167A नावाच्या जीनचा या आजाराशी थेट संबंध आढळून आला. या जीनमध्ये बदल झाल्यास बाळाच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया विस्कळीत होते.
डॉ. एलिसा डे फ्रॅन्को आणि त्यांच्या टीमने सांगितले की या अभ्यासामुळे आपल्याला इन्सुलिन कसं तयार होतं आणि ते शरीरात कसं कार्य करतं याची नवी दिशा मिळाली आहे. त्यांना हेही आढळलं की, TMEM167A जीनमध्ये बदल झाल्यास केवळ डायबिटीसच नाही, तर मिर्गी आणि मायक्रोसेफली म्हणजेच डोक्याचा आकार लहान राहणं अशा न्यूरोलॉजिकल आजारांचाही धोका वाढतो.
कसं केलं संशोधन?
संशोधकांनी सहा बाळांचा अभ्यास केला. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व बाळांमध्ये जन्मानंतर काही महिन्यांतच डायबिटीजची लक्षणं दिसू लागली होती. जेव्हा त्यांच्या डीएनएची तपासणी करण्यात आली, तेव्हा TMEM167A जीनमध्ये अनोखे बदल आढळले.
यानंतर प्रयोगशाळेत सामान्य आणि बदललेल्या जीन असलेल्या स्टेम सेल्सना इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्समध्ये बदलण्यात आलं. याचा रिझल्ट चकित करणारा होता. ज्या सेल्समध्ये TMEM167A जीन बदललेला होता, त्या इन्सुलिन तयार करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या.
या शोधाचं महत्त्व काय?
हा अभ्यास फक्त नवजात बाळांमधील डायबिटीस समजण्यासाठी नाही, तर इन्सुलिन तयार होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठीही महत्त्वाचा आहे. जर हा नवीन जीन पूर्णपणे समजला, तर भविष्यात जीन पातळीवरूनच आजारावर नियंत्रण ठेवणारी औषधे तयार करता येऊ शकतात.
डॉ. फ्रॅन्को सांगतात की, “हा शोध आपल्याला फक्त नवजात डायबिटीस समजण्यासाठीच नाही, तर सर्वसाधारण टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीसच्या गुंतागुंती समजण्यासाठीही मदत करेल.”
आता संशोधक TMEM167A जीनचं कार्य आणि त्याचा इतर आरोग्यावरील परिणाम याचा आणखी सखोल अभ्यास करणार आहेत.