सांधेदुखी, संधीवात या सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या समस्या. पण कालांतराने त्या गंभीर रुप धारण करतात आणि रोजचं जगणं अवघड करतात. वयोमानामुळे सांधे झिजल्याने होते ती सांधेदुखी पण संधीवात हा कोणत्याही वयात कोणत्याही व्यक्तीला विविध कारणांमुळे होऊ शकतो. रुमाटोईड आर्थरायटीस हा असाच संधीवाताचा १ प्रकार असून अगदी कमी वयातील व्यक्तींनाही ही समस्या उद्भवते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा संधीवात होण्याचे प्रमाण जास्त असून त्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप सांगता येत नाही. सांधेदुखी मोठ्या सांध्यांना त्रासदायक असते. मात्र हा संधीवात लहान सांध्यांना आधी लक्ष्य करतो.
यामध्ये हातापायाची बोटे, खांदे, गुडघे सुजतात आणि आखडतात. दैनंदिन हालचाली करणे अवघड होत असल्याने हा आजार त्रासदायक असतो. ही समस्या उद्भवण्यामागे आनुवंशिकता, धूम्रपान यांसारखी काही कारणे सांगता येतात. हा अटोइम्युन आजार आहे, म्हणजेच काही कारणांमुळे आपले शरीर आपल्याच शरीरातील पेशींविरुद्ध काम करायला लागते.सुरुवातीला कमी प्रमाणात असणारी सूज हळूहळू वाढत जाते. यावर वेळीच उपचार न केल्यास किंवा दुर्लक्ष झाल्यास त्वचा व रक्त वाहून नेणाऱ्या नलिका, यकृत, फुफ्फुसे, मेंदू ह्यांवरही या आजाराचा परीणाम होतो.
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राजीव जोशी सांगतात...
त्यामुळे हा संधीवात केवळ हाडांशी संबंधित नसून शरीरातील विविध यंत्रणांवर तो आघात करतो. पूर्वी तरुणांना होणाऱ्या संधीवातासाठी स्टीरॉईडस वापरली जायची मात्र आता प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे देण्यात येतात. हे औषधोपचार तुलनेने महाग असल्याने बहुतांश रुग्ण हे उपचार मधेच बंद करतात. सांधेदुखी आणि संधीवात यामध्ये बराच फरक असून यामध्ये एकापेक्षा जास्त आणि लहान सांध्यांना सूज येण्यासारखी समस्या उद्भवते.