हल्ली फॅटी लिव्हर म्हणजेच लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याचा किंवा लिव्हरला सूज येण्याचा त्रास अनेकांना होतो आहे. सुरुवातीला हा आजार लक्षात येत नाही. पण नंतर मात्र पोटात दुखणे, थकवा येणे, भूक लागणे, त्वचा पिवळसर होणे अशी लक्षणं दिसू लागतात. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लठ्ठपणा, मधुमेह, बीपी, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड नेहमीच वाढलेलं असणं, मद्यपानाचं वाढलेलं प्रमाण यामुळे हा त्रास वाढतच चालला आहे. याशिवाय आणखीही एक कारण आहे ज्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास खूप जास्त होत आहे (remedies to get relief from fatty liver). ते कारण नेमकं काेणतं याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(reasons and symptoms of fatty liver)
फॅटी लिव्हरचा त्रास वाढण्यामागचं महत्त्वाचं कारण...
आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की बहुतांश लोकांना अशी सवय असते की जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचं किंवा एखादा आवडीचा पदार्थ समोर आला आहे, म्हणून लगेच तो पोटभर खायचा.
असं जे भूक नसताना खाणं आहे त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास वाढतो आहे. कोणताही पदार्थ खाताना किंवा जेवण करताना आपल्याला खरोखरच भूक लागली आहे का? हा प्रश्न एकदा स्वत:ला विचारा आणि त्यानंतरच जेवणाची सुरुवात करा.
कारण जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्या शरीरात अनेक डायजेस्टीव्ह ज्यूस तयार होत असतात. त्यामुळे मग अन्नपचन सोपं होतं. पण भूक लागलेली नसताना जेव्हा आपण विनाकारण काहीतरी पोटात टाकतो तेव्हा ते अन्न पचण्यासाठी आपल्या पचनसंस्थेला, लिव्हरला जास्तीची मेहनत घ्यावी लागते.
यामुळे मग लिव्हरवर ताण येऊन फॅटी लिव्हरचा त्रास वाढत जातो. त्यामुळे ना दिवसातून दोनदा ठरवून जेवायचं ना सतत दोन- दोन तासांनी काहीतरी खायचं.. फक्त १ पथ्य पाळायचं आणि ते म्हणजे भूक लागेल तेव्हाच आणि तेवढंच जेवायचं, असा सल्ला मंजिरी कुलकर्णी देतात..
