Wilson Disease Sign and Cause : हॉलिवूड अभिनेता - गायक निक जोनासची बालपणीची मैत्रीण आणि मानलेली बहीण माया किबेलचं वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी निधन झालंय. इतक्या कमी वयात मायाच्या जाण्याने कुटुंबियांसोबत अनेकांना धक्का बसलाय. अशात मायाला कोणता आजार झाला होता आणि त्याची कारणं काय? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे मायाला कोणता आजार होता, त्याची लक्षणं काय आणि कारणं काय हे आपण समजून घेणार आहोत.
विल्सन डिजीज (Wilson Disease) म्हणजे काय?
गेल्या अनेक वर्षांपासून माया 'विल्सन डिजीज' (Wilson Disease) नावाच्या एका दुर्मिळ जेनेटीक आजाराशी झुंज देत होती. विल्सन डिजीज हा एक दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. सामान्यपणे आपले शरीर अन्नातून मिळालेलं जास्तीचं तांब बाहेर फेकून देतं. मात्र, या आजारात शरीर तांबे बाहेर काढू शकत नाही. परिणामी, लिव्हर, मेंदू, डोळे आणि इतर अवयवांमध्ये तांबे साचू लागते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हे अवयव निकामी होऊन मृत्यूचा धोका संभवतो.
आजाराची मुख्य लक्षणे
हा आजार जन्मापासून असला तरी, शरीरात तांब्याचे प्रमाण वाढल्यानंतरच त्याची लक्षणे दिसू लागतात. यात सतत थकवा जाणवणे आणि भूक न लागणे, स्वभावात किंवा मूड स्विंग्स होणे, शरीराला थरथरी सुटणे किंवा हालचालींमधील संतुलन बिघडणे यांचा समावेश आहे.
डोळ्यांमधील बदल
कीजर-फ्लेशर रिंग्स : डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती तांबे जमा झाल्यामुळे एक रिंग किंवा कडे तयार होते.
सनफ्लॉवर मोतीबिंदू : डोळ्याच्या लेन्समध्ये तांबे जमा झाल्यामुळे फुलासारखा आकार दिसू लागतो.
डोळ्यांची हालचाल : मेंदूवर परिणाम झाल्यास डोळे वरच्या बाजूला वळवण्यास त्रास होऊ शकतो.
कावीळ : लिव्हरवर परिणाम झाल्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी पडू शकते.
त्वचा आणि नखांमधील बदल
शरीरात तांबे साचल्यामुळे हाताची किंवा पायाची नखे निळी पडू शकतात. पायाच्या खालच्या भागातील त्वचा काळवंडू शकते.
हा आजार का होतो?
विल्सन आजाराचे मुख्य कारण 'ATP7B' नावाच्या जीनमध्ये होणारा बदल हे आहे. हा एक आनुवांशिक आजार आहे, जो पालकांकडून मुलांकडे येतो. यामुळे लिव्हरची शरीरातील अतिरिक्त तांबे बाहेर काढण्याची क्षमता संपते.
उपचार काय आहेत?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, यावर काही खास औषधे आणि 'झिंक'च्या मदतीने उपचार केले जातात. मात्र, हा आजार पूर्णपणे बरा होत नाही; लिव्हर निकामी होऊ नये म्हणून रुग्णाला आयुष्यभर उपचार आणि औषधे घ्यावी लागतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते.
