मानदुखी ही आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे. ऑफिसमध्ये तासन्तास संगणकासमोर बसणे, सतत मोबाइल वापरणे, चुकीच्या उशा वापरणे किंवा ताणतणाव यामुळे मान आखडते आणि वेदना सुरू होतात. सुरुवातीला हलकी जरी वाटली तरी दुर्लक्ष केल्यास ती वाढू शकते. म्हणूनच मानदुखीची कारणे, त्यावरचे सोपे उपाय आणि शरीरातील कमतरता यांची माहिती असणे गरजेचे आहे. मानदुखीचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीचे पोस्चर. (Neck pain relief , do these home remedies - see how to get rid of the pain )मोबाइल पाहताना सतत खाली मान, लॅपटॉप चुकीच्या उंचीवर ठेवणे किंवा वाकून बसणे यामुळे मानेला अतिरिक्त ताण येतो. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्याने स्नायू आखडतात. चुकीची उशी वापरणेही कारणीभूत ठरते, खूप उंच किंवा खूप पातळ उशीमुळे मानेला योग्य आधार मिळत नाही. ताणतणाव हा देखील महत्त्वाचा घटक आहे. मानसिक तणावामुळे खांदे आणि मान येथील स्नायू ताणले जातात, त्यामुळे वेदना वाढू शकतात. काही वेळा अचानक झटका बसणे, चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा व्यायामात झालेली दुखापत यामुळेही मानदुखी होते.
काही पोषक घटकांची कमतरता देखील मानदुखीशी संबंधित असू शकते. व्हिटामिन डी ची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे वेदना वाढतात. व्हिटामिन B12 ची कमतरता असल्यास नसांशी संबंधित वेदना किंवा मुंग्या येणे जाणवू शकते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असल्यास स्नायूंचे आकुंचन वाढते आणि वेदना जाणवू शकतात. मानदुखीवर काही सोपे उपाय करता येतात. सर्वप्रथम, योग्य पोस्चर राखणे अत्यंत आवश्यक आहे. संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या समोरच्या उंचीवर असावी आणि मोबाइल वापरताना मान खाली वाकवणे टाळावे. दर ३०-४० मिनिटांनी उठून हलकी स्ट्रेचिंग करावी. गरम पाण्याची पट्टी लावल्यास स्नायूंना आराम मिळतो. काही वेळा थंड पट्टीही सूज कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. हलके मानेचे व्यायाम, जसे की मान हळूहळू डावीकडे-उजवीकडे फिरवणे किंवा पुढे-मागे वाकवणे, नियमित केल्यास स्नायू लवचिक राहतात.
आहारात प्रथिने, दूध-दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि सूर्यप्रकाश यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटामिन डी किंवा B12 तपासणी करून घ्यावी. जर मानदुखी सतत वाढत असेल, हाताला मुंग्या येत असतील, चक्कर येत असेल किंवा वेदना अनेक दिवस टिकत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकंदरीत, मानदुखी ही जीवनशैलीशी निगडित समस्या आहे. योग्य सवयी, संतुलित आहार आणि नियमित हलका व्यायाम यामुळे ही समस्या टाळता येऊ शकते.
Web Summary : Neck pain is common due to poor posture, stress, and nutritional deficiencies. Correct posture, stretch regularly, and use hot/cold packs. Ensure adequate vitamin D, B12, calcium intake. Consult a doctor if pain persists.
Web Summary : गलत मुद्रा, तनाव और पोषण की कमी से गर्दन का दर्द आम है। सही मुद्रा बनाए रखें, नियमित रूप से स्ट्रेच करें और गर्म/ठंडे पैक का उपयोग करें। पर्याप्त विटामिन डी, बी12, कैल्शियम का सेवन सुनिश्चित करें। दर्द बने रहने पर डॉक्टर से सलाह लें।