Join us

National Nutrition Week 2025 special: भात खाण्याचे ५ फायदे- वजन, शुगर वाढेल म्हणून भात टाळता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2025 18:23 IST

National Nutrition Week 2025 special: लेख ६: योग्य प्रमाणात व योग्य प्रकारचा भात आहारात घेतल्याने तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.

ठळक मुद्दे दूध भात, ताक भात, दही भात रोज थोडेसे खाणे आरोग्यासाठी हितकारक असते.

भारतीय आहारपद्धतीमध्ये तांदूळ म्हणजेच भाताला खूप महत्त्व आहे. तांदूळ हा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. पण तरीही हल्ली कित्येक जण भाताला चुकीच्या चष्म्यातून बघतात आणि त्याचे फायदे लक्षात घेण्याऐवजी त्याच्यामुळे होणारे तब्येतीचे नुकसानच जास्त अधोरेखित करतात. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या प्रमाणात भात खाल्ला तर तब्येतीसाठी तो निश्चितच त्रासदायक ठरू शकतो. खरेतर भात हा भारतीय आहाराचा "आत्मा" आहे. योग्य प्रमाणात व योग्य प्रकारचा भात खाल्ल्यास तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो (benefits of eating rice). "भात आणि डाळ" ही संयुगात्मक जोडी पूर्ण प्रथिनांचा (complete protein) स्त्रोत आहे.(National Nutrition Week 2025 special)

 

भातामध्ये कार्बोहाइड्रसचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तसेच यात थोड्या प्रमाणात प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटामिन B देखील असतात. भात पचायला हलका असतो. लहान मुलं, वृद्ध व आजारी व्यक्तींसाठी तो उपयुक्त असतो. तसेच जर तुम्ही योग्य प्रमाणात योग्य प्रकारचा तांदूळ खाल्ला तर तो देखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तांदूळ मधूर, स्निग्ध, बलदायक, रुची उत्पन्न करणारा, वीर्यवर्धक, शरीर पुष्ट करणारा, थंड, पित्तनाशक, लघवी साफ होण्यास मदत करणारा तसेच कृमीनाशक आहे.

 

दूध भात, ताक भात, दही भात रोज थोडेसे खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. पांढऱ्या भातामध्ये (polished rice) तंतू म्हणजेच फायबर कमी असतात. त्यामुळे तो प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यास साखर व वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने योग्य प्रमाणातच भात खावा. हातसडीचा भात, ब्राऊन राईस, कमी पॉलिश केलेला इंद्रायणी, दूध मलाई, आंबेमोहर तसेच बासमती तांदूळ खाण्यासाठी अधिक उत्तम असतो. पातेल्यामध्ये जेव्हा तांदूळ शिजायला लावून भात केला जातो तेव्हा अनेकदा त्यावर आलेली पेज काढून टाकण्यात येते. परंतू पेज थंड, पौष्टिक असल्याने ती काढून टाकणं योग्य नाही.

शीतल मोगल (आहारतज्ञ आणि वर्कआउट प्लॅनर) 8605243534

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न