हिवाळ्यात बहुतेकवेळा गुलाबी थंडी आणि आल्हाददायक वातावरण असते. पण याच ऋतूत अनेकांना नकोसा वाटणारा किंवा सतावणारा त्रास म्हणजे सर्दी, खोकला आणि छातीत साचणारा कफ. बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मग औषधे घेऊनही लवकर आराम मिळत नाही. सतत छातीत कफ साचल्यास श्वास घेण्यास अडचण, घसा खवखवणे आणि अशक्तपणा जाणवतो. अशावेळी औषधांबरोबरच पारंपरिक घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. दिवसभर सतावणारा खोकला आणि घशात अडकलेला कफ घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करून थकले असाल तर, या समस्येवर 'ज्येष्ठमध' वरदानच ठरते(mulethi for cough to loosen mucus & soothe throat).
आजीच्या बटव्यातील 'ज्येष्ठमध' छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करते. छातीत साचलेला कफ कमी करण्यासाठी ज्येष्ठमधाची एक छोटी काडी चघळणे फायद्याचे ठरते. आयुर्वेदात ज्येष्ठमधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा कोरडा खोकला किंवा छातीत कफ जमा होण्याच्या तक्रारी वाढतात, तेव्हा ज्येष्ठमध एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. अनेकदा कफ साचल्यामुळे छातीत जडपणा येतो, अशा वेळी ज्येष्ठमधातील नैसर्गिक घटक कफ पातळ करून तो शरीराबाहेर काढण्यास (mulethi home remedy for cold & cough) मदत करतात. ज्येष्ठमधाची काडी चघळल्याने घशाला कसा आराम मिळतो आणि हा उपाय नेमका कसा करावा ते पाहूयात.
छातीत साचलेला कफ आणि खोकला दूर करण्यासाठी चघळा ज्येष्ठमध...
ज्येष्ठमध ही एक अत्यंत फायदेशीर आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विशेषतः खोकला, घशातील खवखव आणि सर्दी यावर याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
१. घशातील सूज आणि कोरडेपणावर गुणकारी :- ज्येष्ठमधातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे घशातील सूज कमी होण्यास मदत होते. जास्त खोकल्यामुळे जेव्हा घसा कोरडा पडतो, तेव्हा ज्येष्ठमध घशातील ओलावा टिकवून ठेवते आणि जळजळ कमी करते.
२. साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी फायदेशीर :- जर तुम्हाला कफयुक्त खोकला असेल किंवा छातीत कफ जमा झाला असेल, तर ज्येष्ठमधाची काडी चघळणे फायदेशीर ठरते. यामुळे छातीत साचलेला घट्ट कफ पातळ करून तो शरीराबाहेर काढण्याचे काम सहजपणे होते.
मसाल्याच्या डब्यांतील 'या' पानांचा प्या मॅजिकल चहा! वजन होईल झरझर कमी, दिसाल स्लिम ट्रिम...
३. कोरड्या खोकल्यापासून आराम :- ज्येष्ठमध कोरड्या खोकल्यामध्येही तितकेच उपयुक्त ठरते. यामुळे घशातील खवखव कमी होते आणि वारंवार येणारी खोकल्याची उबळ थांबते.
४. संसर्गापासून संरक्षण :- ज्येष्ठमधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराला विविध प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
तुम्ही ज्येष्ठमधाचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवून चघळलात, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. याशिवाय, आपण ज्येष्ठमधाचा काढा घेऊ शकता किंवा त्याचे चूर्ण (पावडर) मधासोबत घेतल्यानेही लवकर आराम मिळतो.
ज्येष्ठमध केवळ खोकल्यावरच नाही, तर सर्दी आणि पडशापासूनही संरक्षण देते. ज्येष्ठमध फुफ्फुसे स्वच्छ करण्यास मदत करते आणि घशात होणारी खाज किंवा खवखव दूर करते.
जरी ज्येष्ठमध खोकला आणि कफ कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असले, तरी त्याचा वापर मर्यादित प्रमाणातच केला पाहिजे. अति वापरामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे गरजेनुसार आणि योग्य प्रमाणातच त्याचा वापर करावा.
