Symptoms Of Silent Heart Attack : हार्ट अटॅक ही गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही जीवघेणी समस्या आता केवळ जास्त वयाच्या लोकांमध्येच दिसते असं नाही तर कमी वयातही हार्ट अटॅकनं अनेकांचा जीव जात आहे. त्यात सायलेंट हार्ट अटॅक तर कित्येकदा लोकांना येऊन जातो आणि कळतही नाही. सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशन (Silent Myocardial Infarction) किंवा एसएमआय (SMI) असं म्हटलं जातं. हा एक असा अटॅक आहे जो अस्वस्थता आणि छातीत वेदनेपासून सुरू होतो. एक अशी मेडिकल कंडीशन ज्याची ओळख पटवणं अवघड काम आहे. तरीही सतर्क राहून यापासून बचाव करता येऊ शकतो. अशात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं
१) छातीमध्ये दबाव
कॉमन हार्ट अटॅकमध्ये छातीत खूप वेदना होतात, पण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीत अस्वस्शता जाणवते. जर थांबून थांबून छातीत दाटलेपणा किंवा हलकी वेदना होत असेल हा सायलेंट हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
२) श्वास घेण्यास अडचण
जर तुम्हाला पायऱ्या चढताना किंवा हलकी फिजिकल अॅक्टिविटी करताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा चांगला संकेत नाही. हे सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशनचं लक्षण असू शकतं.
३) थकवा
जर तुम्हाला कमी फिजिकल अॅक्टिविटी आणि ८ तासांची झोप घेतल्यावरही थकवा जाणवत असेल तर हा सायलेंट हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवला तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४) अचानक घाम येणं
मेहनतीचं काम केल्यावर आणि उन्हामुळे घाम येणं सामान्य आहे. पण थंडीच्या दिवसात आणि सामान्य वातावरणातही तुम्हाला घाम येत असेल तर हा सायलेंट हार्ट अटॅकचा इशारा असू शकतो.
५) झोप न लागणं
सायलेंट हार्ट अटॅकच्या लक्षणामुळे तुम्हाला चांगली झोप लागत नाही. यात स्लीपिंग पॅटर्न डिस्टर्ब होतो, ज्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा जाग येते आणि झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप लागत नाही.
६) चिंता-तणाव
सायलेंट हार्ट अटॅक आपल्या मानसिक आरोग्यासाठीही चांगला नसतो, जर तुम्हाला चिंता, तणाव जास्त जाणवत असेल तर ही गंभीर बाब आहे. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.